भारतातील सवर्णांची मानसिकता
विशेषत: अमेरिकेमध्ये अश्वेत लोकांच्या अधिकारासाठी होणा-या संघर्षामध्ये श्वेत लोकांचा मोठ्या प्रमाणात असणारा सहभाग ही काही नवीन गोष्ट नाही. १९ व्या शतकामध्ये अमेरिकेच्या दक्षिणी प्रांतांत मानवी गुलामगीरीची प्रथा समाप्त करण्यासाठी झालेल्या नागरी युद्धामध्ये श्वेत सैनिकच लढले होते आणि १० लाखापेक्षा जास्त श्वेत सैनिक त्यात मारले गेले होते. याचाच अर्थ अश्वेत लोकांना गुलामगिरीतुन मुक्त करण्यासाठी श्वेत लोकांनी आपल्या प्राणांची आहुति दिली होती.
अमेरिकेतील श्वेत लोक अश्वेत लोकांच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुति देत आहेत या गोष्टीचा प्रभाव भारतात महात्मा ज्योतिराव फुल्यांवर पडला. ज्योतिबांच्या लक्षात आले की भारतात शूद्रांची स्थिति अमेरिकेतील गुलामांसारखीच आहे. त्यांनी आपला 'गुलामगिरी' हा ग्रंथ अमेरिकेतील त्या चांगल्या श्वेत लोकांना समर्पित केला जे तेथील मानवी गुलामगिरी प्रथेच्या विरुद्ध लढत होते.
अमेरिकेत वर्णभेद संपला नाही तो लढा पुढे सुद्धा सुरु राहिला. अश्वेत लोकांचा मताधिकार, नागरी अधिकारांचा लढा ब-याच काळ चालला. या सर्व लढ्यात तेथील श्वेत लोक मोठ्या प्रमाणात होते. श्वेत लोकांचा अश्वेतांच्या लढ्यातील हा सहभाग आजसुद्धा दिसुन येत आहे.
प्रश्न हा निर्माण होतो की सवर्ण उच्चजातीत जन्म घेतलेले लोक भारतात होणारे जातीय अत्याचार आणि भेदभाव याविरुद्ध होणा-या संघर्षात सामील होतील? जातिमुक्त भारत निर्माण करण्यासाठी सामोर येतील आणि त्यासाठी त्यांना मिळणारे विशेष अधिकार त्यागण्यास तयार होतील?
भारतातील काही उच्चजातीय सवर्ण सेलेब्रिटी आणि बुद्धिजीवी अमेरिकेतील अश्वेत लोकांसाठी न्याय मागत आहेत. दिशा पाटनी, प्रियंका चोपड़ा पासून गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सुद्धा #BlackLivesMatter साठी सहभाग नोंदवला आहे. परंतु त्यांच्याकडून आणि इतर उच्चजातीय सवर्णांकडून ही अपेक्षा करु शकतो का की जेंव्हा भारतात जातीय द्वेषातून एखाद्या दलित महिलेची हत्या किंवा बलात्कार केला जातो, किंवा विद्यापीठात एखाद्या शिक्षकाकडून होणारा जातीय भेदभाव या कारणामुळे एखाद्या दलित किंवा मागासवर्गीय विद्यार्थ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते, त्यावेळेस ते पिडितांचा पक्ष घेतील? काय भारतातील उच्चजातीय सवर्णामध्ये अशाप्रकारचे प्रगतिशील आणि उदार लोक असतील?
उच्चजातीय सवर्णांमधून असे लोक शोधून काढणे सोपी गोष्ट नाही.
१. महाराष्ट्रातील खैरलांजी येथे २००६ मध्ये एका दलित कुटुंबावर बलात्कार करुन संपूर्ण गावासमोर त्यांची हत्या करण्यात आली. त्यावेळेस झालेल्या आंदोलनात फ़क्त दलितांचाच सहभाग होता.
२. हैद्राबाद केंद्रीय विद्यापीठातील रोहित वेमुलाची संस्थानिक हत्या असो किंवा मुंबई मध्ये डॉ. पायल तडवी ने जातीय अत्याचारामुळे केलेली आत्महत्या असो किंवा गुजरातेत ऊना येथे दलितांना झालेली मारहाण असो किंवा गाई वरून दलितांची केलेली मॉबलिंचिंग, या सर्व प्रकरणात फ़क्त दलितांनाच आंदोलन करावे लागले.
३. हरियाणामधील भगाना येथे जातीय अत्याचाराच्या विरुद्ध भगाना गावातील लोक जवळपास एक वर्ष दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलनासाठी बसलेले होते, परंतु कुठल्याही सवर्ण नेत्याला किंवा सवर्ण वर्चस्व असलेल्या मिडियाला हा मुद्दा महत्वाचा वाटला नाही.
४. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने जेव्हा अट्रोसिटी कायदा दुबळा करण्यात आला होता त्याविरुद्ध दलितांनी मोठे आंदोलन केले होते. त्यावेळेस १२ लोक मृत्युमुखी पडले होते आणि ते सर्वच दलित होते.
५. दलितांना आरक्षणाचा लाभ मिळू नये यासाठी सवर्ण उच्चजातीकडून वेगवेगळ्या पातळयांवर सातत्याने प्रयत्न केले जातात. आरक्षणासाठीचा लढा नेहमीच फ़क्त अनुसूचित जाती, जनजाती आणि त्यांच्या संघटनेकडूनच लढले जातात.
६. बहुसंख्य सवर्ण उच्चजाती आरक्षण आणि दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांच्या सबलिकरणाचा विरोध करतात. परंतु जेव्हा केंद्र सरकारने सवर्णांना आर्थिक आधारावर १०% आरक्षण दिले, त्यावेळी तेच सवर्ण फ़क्त चुप बसले नाहीत तर अनेकांनी त्याचे समर्थन केले. सरकारच्या या प्रयत्नाने आरक्षणाच्या बाबतीत समाजाच्या प्रत्येक समुहाला प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे संविधानाचा हा उद्देशच दुबळा झाला.
७. भारतातील कित्येक सवर्ण बुद्धिजीवींनी जातीच्या प्रश्नाचा अभ्यास केला. अनेकांनी कित्येक पुस्तके लिहिली. परंतु एकाही सवर्ण बुद्धिजीवी व्यक्तिने जनगणना करताना जातीय आकडेवारी गोळा केली जावी ही मागणी केली नाही. त्यांचे जातीविषयी सर्व निष्कर्ष आकडेवारीशिवाय असतात.
आपल्याच देशातील आणि बहुतांश आपल्याच हिंदू धर्मातील अनुसूचित जाती, जनजाती यांच्यावर होणा-या जातीय अत्याचारविरुद्ध, त्यांच्या न्याय्य अधिकारासाठी होणा-या लढ्यात सवर्ण उच्चजातींचा सहभाग का नसतो? सवर्णांच्या ह्या मानसिकतेचे कारण काय?
याचे संभवतः दोन कारणे असू शकतात.
१. अमेरिकेत अश्वेत लोकांची संख्या फार कमी आहे. ती अमेरिकेतील एकूण लोकसंख्येच्या १४% पेक्षाही कमी आहे. याचाच अर्थ येणा-या कित्येक शतकात अमेरिकी लोकसंख्येत श्वेत लोकांचे प्रमाणच जास्त राहणार आहेत. यामुळे तेथील श्वेत लोकांना वाटते की आपले काही विशेषाधिकार सोडून दिले तरी त्यांच्या वर्चस्वावर फार काही फरक पडणार नाही. याउलट भारतात हिंदू सवर्णांची संख्या कमी आहे. दलित, आदिवासी आणि मागास जतींच्या तुलनेत त्यांची लोकसंख्या फार कमी आहे. परंतु त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत त्यांच्याकडे असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती आणि सत्ता मोठ्या प्रमाणात आहे. ही साधनसंपत्ती त्यांनी धर्माच्या आधारे इतरांना गुलामित ठेवून, त्यांचे हक्क आणि अधिकार नाकारून जमा केलेली आहे. जर ते उदार झाले तर त्यांचे वर्चस्व कमी होईल ही भीती त्यांना वाटते. त्यामुळेच अनुसूचित जाती, जनजाती आणि अन्य मागास जाती यांचा उत्कर्ष त्यांना बघवला जात नाही.
२. सामाजिक सुधारणेची सवर्णांना एवढी भीती का वाटते याचे काय कारण आहे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आले होते. आपला प्रसिद्ध ग्रंथ 'शुद्र पूर्वी कोण होते?' मध्ये ते विचारतात की, ब्राम्हणांमध्ये 'वोल्टेअर' सारखा व्यक्ति का होऊ शकत नाही, जो कॅथेलीक असून सुद्धा कॅथेलीक चर्चच्या सत्तेच्या विरुद्ध लढला. याचे उत्तर देतांना बाबासाहेब लिहितात की या प्रश्नाचे उत्तर प्रतिप्रश्न करुनच दिले जाऊ शकते. जसे तुर्किचे सुलतान इस्लाम जगतातील प्रचलित धर्म का समाप्त करु शकत नाही, किंवा पोप कॅथेलीक विचारसरणीचा विरोध का करत नाहीत? या प्रश्नाचे उत्तर देतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, कोणतीही व्यक्ति किंवा समूह यांचा स्वार्थ त्यांच्या बुद्धीला नियंत्रित करीत असतो.
भारतातील सवर्णांना माहीत आहे की त्यांचा स्वार्थ कशात आहे आणि म्हणूनच ते त्याचे रक्षण करतात.
( दिलीप मंडल यांच्या दिप्रिंट मधील लेखावरून)
सोमवार, १४ जून, २०२१
धार्मिक ग्रंथातील घालघुसडी
ईस्ट इंडिया कंपनीच्या आमदनीत एक खटला चालू होता. त्यातील वादीची बाजू खोटी असतांना खरी करण्याच्या हेतूने आणि वादीच्या बाजुला उपयोगी पडतील असे पुरावे तयार करण्यासाठी ब्राम्हणांनी एक नवी स्मृति संस्कृत भाषेत तयार केली होती हे मशहूर आहेच.
अशाप्रकारचे डावपेच खेळण्याचे हिंदुस्थानातील ब्राम्हणांना वावड़े नाही. विधवा स्त्रियांनी सती जावे असा ब्राम्हणांनी हेका धरला व या गोष्टीला ऋग्वेदातुन आधार काढण्यासाठी ऋग्वेदातील 'अग्रे' शब्दाला 'अग्ने' असे रूप ब्राम्हणांनी दिले ही हकीकत प्रो. मॅक्समुलर यांनी स्पष्टपणे सांगितली आहे. पुरोहितांनी अशाप्रकारच्या घालघुसडी धार्मिक ग्रंथात केल्या आहेत.
- 'शुद्र पूर्वी कोण होते?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
ब्राम्हण त्यांच्या हातात असलेल्या प्रशासकीय किंवा धार्मिक अधिकाराचा कसा गैरवापर करतात किंवा खोटे पुरावे कसे सादर करतात याचे उदाहरण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'शुद्र पूर्वी कोण होते?' मध्ये दिले आहे.
जर अशा लोकांच्या हातात देशाच्या संविधानिक संस्था असतील तर ते आपल्या फायद्यासाठी काहीही खोटेपणा करुन निरपराध लोकांना फसवू शकतात हे कोणीही नाकारु शकत नाही. परंतु अशा लोकांना सुद्धा आम्ही निष्पक्ष आहोत हे जगाला दाखवायचे असते किंवा त्यांच्यावर पक्षपाताचा आरोप झाला तर त्यांच्या समर्थकांना, त्यांच्या विरोधकांना उत्तर देता यावे यासाठी एखादे उदाहरण असावे, म्हणून त्यांना एखाद्या वेळेस बहुजन समाजासाठी नाईलाजाने निष्पक्ष निर्णय घ्यावा लागतो. शंभरातून असा एखादा निष्पक्ष निर्णय घेऊन बाकी नव्यानव वेळा पक्षपात केला तरी, 'तुमच्या मतासारखे झाले तर निष्पक्ष आणि तुमच्या मनाविरुद्ध झाले तर पक्षपात' असा तर्क ते किंवा त्यांचे समर्थक करु शकतात. परंतु असे तर्क बालिश असतात. अशा तर्काना कोणीही भीक घालत नाही.
भारतातील पत्रकारीता
खालील विचार वाचले तर तुम्हाला असे वाटेल की देशात आज पत्रकारीतेच्या नावाने जे काही चालले आहे त्याबद्दल कोणीतरी आपले विचार प्रकट केले आहेत.
१८ जानेवारी १९४३ ला बाबासाहेबांनी तेव्हाच्या पत्रकारितेबद्दल एका भाषणात मांडलेले विचार.
आणि आज जी पत्रकारिता दिसून येत आहे त्याला हे विचार अगदी तंतोतंत लागू पडत आहेत.
'कभी भारत में पत्रकारिता एक व्यवसाय था।अब वह व्यापार बन गया है। वह तो साबुन बनाने जैसा है, उससे अधिक कुछ भी नहीं। उसमें कोई नैतिक दायित्व नहीं है। वह स्वयं को जनता का जिम्मेदार सलाहकार नहीं मानता। भारत की पत्रकारिता इस बात को अपना सर्वप्रथम तथा सर्वोपरि कर्तव्य नहीं मानती की वह तटस्थ भाव से निष्पक्ष समाचार दे, वह सार्वजनिक निति के उस निश्चित पक्ष को प्रस्तुत करे जिसे वह समाज के लिए हितकारी समझे, चाहे कोई कितने भी उच्च पद पर हो, उसकी परवाह न किए बिना किसी भय के उन सभी को सीधा करे और लताड़े, जिन्होंने गलत अथवा उजाड पथ का अनुसरण किया है। उसका तो प्रमुख कर्तव्य यह हो गया है की नायकत्व को स्वीकार करें और उसकी पूजा करे। उसकी छत्रछाया में समाचार-पत्रों का स्थान सनसनी ने, विवेक-सम्मत मत का विवेकहीन भावावेश ने, उत्तरदायी लोगों के मानस के लिए अपील ने, दायित्वहीनों की भावनाओं के लिए अपील ने ले लिया। लार्ड सेलिसबरी ने नार्थक्लिप पत्रकारिता के बारे में कहा है की वह तो कार्यालय-कर्मचारियों के लिए कार्यालय-कर्मचारियों का लेखन है। भारतीय पत्रकारिता तो उससे भी दो कदम आगे है। वह तो ऐसा लेखन है, जैसे ढिंढोरचियों ने अपने नायकों का ढिंढोरा पिटा हो। नायक-पूजा के प्रचार-प्रसार के लिए कभी भी इतनी नासमझी से देशहित की बलि नहीं चढाई गई है। नायकों के प्रति ऐसी अंधभक्ति तो कभी देखने में नहीं आई, जैसी की आज चल रही है। मुझे प्रसन्नता है की आदर योग्य कुछ अपवाद भी है। लेकिन वे ऊंट के मुंह में जीरे के समान है और उनकी बातों को सदा ही अनसुना कर दिया जाता है। समाचार-पत्रों की वाहवाही का कवच धारण करके इन दोनों महानुभावों की प्रभुत्व जमाने की भावना ने तो सभी मर्यादाओं को तोड़ डाला है। अपने प्रभुत्व से उन्होंने न केवल अनुयायियों को, बल्कि भारतीय राजनीति को भी भ्रष्ट किया है। अपने प्रभुत्व से उन्होंने अपने आधे अनुयायियों को मुर्ख तथा शेष आधों को पाखंडी बना दिया है। अपनी सर्वोच्चता के दुर्ग को सुदृढ़ करने में उन्होंने 'बड़े व्यापारिक घरानों' तथा धन-कुबेरों की सहायता ली है। हमारे देश में पहली बार पैसा संगठित शक्ति के रूप में मैदान में उतरा है।'
- डॉ. बी. आर. अम्बेडकर
मा. गांधींची अस्पृश्यांच्या बाबतीत वागणूक
१९३५ मध्ये गुजरातमधील अहमदाबाद या जिल्ह्यातील कवीठा या गावातील हरिजनांनी, गावातील सार्वजनिक शाळेत हिंदूंच्या मुलांसोबतच त्यांच्या मुलांनाही प्रवेश द्यावा अशी हिंदूंकड़े मागणी केली. त्यांच्या या धाडसाचा हिंदूंना भारी राग आला आणि त्यांनी हरिजनांवर संपूर्ण बहिष्कार पुकारला. सवर्णांनी त्यांच्या शेतीवर हरिजनांना काम देणे बंद केले. त्यांच्या गुराढोरांना सार्वजनिक कुरणात चरण्यास मनाई करण्यात आली. एवढेच नव्हे तर हरिजनांकडून महादेवाच्या नावाने शपथ घेण्यात आली की ते आपल्या मुलांना शाळेत पाठविण्याचा कधीही प्रयत्न करणार नाही. शेवटी अस्पृश्यांनी शरणागती पत्करली तरीही अनेक दिवस बहिष्कार मागे घेण्यात आला नाही. सवर्ण हिंदू आपली मृत जनावरे स्वतःच ओढू शकत नसल्याने चांभाराविरुद्धचा बहिष्कार काहीसा लवकर मागे घेण्यात आला. हरिजनांवर करण्यात आलेला अत्याचार मात्र पुरेसा नव्हता की काय म्हणून हरिजनांच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत केरोसीन ओतले गेले.
श्री. ठक्कर नावाच्या व्यक्तीने सवर्ण हिंदूंना समजविण्याचा प्रयत्न केला. त्यावर सवर्णांचे असे म्हणणे होते की, धेड आणि चांभाराची मुले त्यांच्या मुलांच्या बाजुला शाळेत बसतील ही कल्पनाच त्यांना सहन होत नाही. श्री. ठक्कर जिल्ह्याधिका-यांना भेटलेत पण जिल्ह्याधिकारी सुद्धा त्यातून मार्ग काढू शकले नाही.
शेवटी हरिजन एवढे हतबल झाले की, त्यांनी गाव सोडून दुसरीकडे आश्रयास जाण्याचा विचार सुरु केला.
यावर मा. गांधी यांनी काय केले? त्यांनी हरिजनांना पुढील उपदेश केला. "जे स्वतःची मदत स्वतः करतात त्यांना देवही मदत करतो. जर लोक पोटापाण्यासाठी गाव सोडु शकतात तर आत्मसन्मानाच्या रक्षणार्थ त्यांना बरेच काही करता येईल"
कविठ्याच्या हरिजनांना मा. गांधी यांनी गाव सोडण्याचा सल्ला दिला. पण हिंदूंविरुद्ध खटला दाखल करुन हरिजनांचे अधिकार मिळावेत यासाठी मदत केली नाही.
(संदर्भ - काँग्रेस आणि गांधीनी अस्पृश्यांप्रति काय केले?)
मा. गांधींचे अस्पृश्यता विरोधी अभियाय असफल का झाले?
मा. गांधींचे अस्पृश्यता विरोधी अभियाय असफल का झाले? कारण हिंदूंनी त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद दिलाच नाही. आणि मुख्य म्हणजे त्यांना हिंदूना नाराज करावयाचे नव्हते.
अस्पृश्यांसाठी एक सार्वजनिक रस्ता खुला व्हावा या हेतूने १९२४ साली वायकोम या गावात एक सत्याग्रह झाला होता. तिथे सत्याग्रहींसाठी म्हणून शिखांनी लंगर सुरु केले होते. यावर मा. गांधींनी काय करावे? त्यांनी सत्याग्रहाला विरोध तर केलाच त्यासोबतच सत्याग्रहींसाठी शिखांनी जे लंगर सुरु केले होते त्या शिखांच्या या कृतीलाही विरोध दर्शविला.
जेव्हा अस्पृश्यांनी मुंबई इलाख्यात मंदिर प्रवेश आणि सार्वजनिक विहिरीवरून पाणी भरण्याच्या हक्कासाठी सत्याग्रह केला तेव्हा अस्पृश्यांनी मा. गांधीनी त्यांच्या या सत्याग्रहाला आपले आशीर्वाद द्यावे अशी विनंती केली. कारण खरे म्हणजे सत्याग्रह हे शस्त्र गांधींनीच विकसीत केले होते.
यावर मा. गांधींनी काय करावे? तर त्यांनी अस्पृश्यांच्या सत्याग्रहला पाठिंबा देण्याऐवजी सत्याग्रहाला विरोध दर्शविणारे निवेदन प्रकाशित केले. त्या निवेदनात जे होतं ते वाचून सर्वसामान्य माणसाची तळपायाची आग मस्तकात जाईल. त्यात त्यांनी असे म्हटले की, सत्याग्रह हे विदेशी लोकांविरुद्धच उपयोगात आणावयाचे शस्त्र आहे. कोणीही या शस्त्राचा उपयोग आपल्या भावाबंदाविरुद्ध, आपल्या देशवासियांविरुद्ध करु नये. म्हणून अस्पृश्यांना हिंदूविरुद्ध सत्याग्रहाला अनुमती नाही.
(संदर्भ - काँग्रेस आणि गांधीनी अस्पृश्यांप्रति काय केले?)
मा. गांधींचे जातीविषयक विचार
१९२१ - २२ च्या नवजीवन या गुजराती साप्ताहिकामधुन मा. गांधीजींचे विचार.
१) हिंदूसमाज जिवंत आहे याला कारण हिंदूसमाजाचा आधार जातीव्यवस्था आहे हे होय, असा माझा विश्वास आहे.
२) स्वराज्याची बिजे जातीव्यवस्थेत शोधावी लागतील. वेगवेगळ्या जाती या सेवेसाठी स्थापन केलेल्या वेगवेगळ्या विभागासारख्या आहेत.
३) जी व्यवस्था जातीव्यवस्था निर्माण करु शकली त्या व्यवस्थेतच संघटन शक्तीची अमाप क्षमता आहे असेच म्हणावे लागते.
४) जातीव्यवस्था ही प्राथमिक शिक्षणाच्या प्रचार प्रसाराची सहज उपलब्ध व्यवस्था होय.
५) राष्ट्रीय एकात्मतेसाठी जातीजातीत रोटी बेटी व्यवहार आवश्यक आहेत यावर माझा विश्वास नाही. सहभोजनाने मैत्रीसंबंध प्रस्थापित होतात असे म्हटले जाते पण अनुभव मात्र याच्या विरुद्ध आहे. मल विसर्जन ही जशी घाणेरडी क्रिया आहे तशी अन्न ग्रहण ही सुद्धा घाणेरडी क्रिया आहे. फरक एवढाच की मल विसर्जनाची ही क्रिया निसर्गाचा आदेश म्हणून आपण पाळतो. तेव्हा ही क्रिया केल्यानंतर आपणास स्वस्थता लाभते तर भोजनानंतर मात्र आपण अस्वस्थ होतो. निसर्गाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी, मलविसर्जनासाठी आपणास एकांत हवा असतो त्याचप्रमाणे अन्न ग्रहण करण्याच्या क्रियेसाठी आपणास एकांताचीच गरज आहे.
६) जातीव्यवस्था जातीजातीत रोटी बेटी व्यवहाराची अनुमती देत नाही म्हणून जातीव्यवस्था वाईट आहे असे आपण म्हणू शकत नाही.
७) जातीव्यवस्था हे नियंत्रण व्यवस्थेचे दूसरे नाव आहे. आणि रोटी बेटी व्यवहार बंदी हा मर्यादाचाच एक प्रकार आहे.
८) जातीव्यवस्था नष्ट करुन यूरोपची पाश्चिमात्य सामाजिक व्यवस्था स्वीकारणे याचा अर्थ हिंदूंनी आपली पिढ्यान पिढ्या वंशपरंपरागत चालत आलेली रोजगाराच्या हमीची, जीवीकोपार्जनाची व्यवस्था त्यागने असाच होईल. हे तत्व या जातीव्यवस्थेचा आत्मा आहे. वंशपरंपरागत व्यवसाय शाश्वत तत्व आहे. हे बदलणे म्हणजे अव्यवस्था निर्माण करणे होय. मी जर माझ्या जीवनात ब्राम्हणाला ब्राम्हण म्हणू शकलो नाहीतर ब्राम्हणाचा मला काहीही उपयोग नाही. जर दररोज ब्राम्हणाचे शुद्रात आणि शुद्राचे ब्राम्हणात रूपांतर होऊ लागले तर, समाजात पूर्णपणे गोंधळाची व्यवस्था, अव्यवस्था निर्माण होईल.
९) जातीव्यवस्था ही समाजाची स्वाभाविक व्यवस्था होय. हिंदुस्थानात या व्यवस्थेला धर्माचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे. इतर देशांना जातीव्यवस्थेची उपयोगिता समजलीच नाही. म्हणून जातीव्यवस्थेचे जे लाभ हिंदुस्थानाला मिळतात त्या लाभापासून हे देश वंचित आहेत. हे माझे जातीव्यवस्थेसंबंधी विचार आहेत म्हणून जातीव्यवस्था नष्ट व्हावी यासाठी जे प्रयत्न करतात मी त्यांचा विरोध करतो.
१९२५ साली मा. गांधी हे वर्णव्यवस्थेचे पुरस्कर्ते बनले. मा. गांधी यांनी त्यांना अभिप्रेत असलेली वर्णव्यवस्था खालील प्रकारे स्पष्ट केली. हा उतारा त्यांच्या या विषयावरील वर्णव्यवस्था या लेखातून घेण्यात आला आहे.
१) वर्णव्यवस्था ही जन्माधिष्ठित आहे असा माझा विश्वास आहे.
२) वर्णव्यवस्थेत शूद्रांना ज्ञानार्जनापासून किंवा युद्ध कौशल्य शिकण्यापासून परावृत्त करणारी अशी कोणतीही व्यवस्था नाही. या उलट क्षत्रियही सेवा करु शकतात. पण या वर्णव्यवस्थेचा असा आदेश आहे की, ज्ञानार्जनानंतरही शुद्राने त्या ज्ञानाचा जीवीकोपार्जनासाठी उपयोग करु नये. त्याचप्रमाणे ब्राम्हणही युद्ध किंवा व्यापाराची कला शिकू शकतात. पण ब्राम्हणानेही या कलांना आपल्या जीवीकोपार्जनाचे माध्यम बनवू नये. वैश्यही ज्ञानार्जन करु शकतो. युद्ध कला शिकू शकतो पण त्यानेही या कलांचा उपयोग जीवीकोपार्जनासाठी करु नये.
३) जीवीकोपार्जनासाठी वर्णव्यवस्थेने ठरवून दिलेला व्यवसायच स्वीकारला पाहिजे. याचा अर्थ त्याने जीवीकोपार्जण्यासाठी वाड-वडिलांचा व्यवसायच स्वीकारावयास हवा.
४) वर्णव्यवस्थेचा उद्देश स्पर्धा, वर्गसंघर्ष आणि वर्गयुद्ध टाळणे हा आहे. माझा वर्णव्यवस्थेवर विश्वास आहे कारण ही व्यवस्था माणसांची कर्तव्ये आणि व्यवसाय निश्चित करणारी व्यवस्था आहे.
५) वर्णव्यवस्थेत कोणालाही आपला व्यवसाय निवडावयाचे स्वातंत्र्य नाही. त्यांचा व्यवसाय त्यांच्याकरिता वंशपरंपरेने निर्धारित केला जातो.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(काँग्रेस आणि गांधीनी अस्पृश्यांप्रति काय केले?)
आणि लक्षात घ्या की, मा. गांधीनी हे विचार प्रकट करण्यापूर्वी ते इंग्लंड सारख्या देशात राहून बैरिस्टर ची डिग्री घेऊन आले होते.
काँग्रेस आणि गांधींनी अस्पृश्यांप्रती काय केले? हा ग्रंथ अनुसूचित जाती जमातींनी प्राधान्यक्रमाने का वाचावयास हवा?
'काँग्रेस आणि गांधीनी अस्पृश्यांप्रति काय केले?' हा ग्रंथ डॉ. आंबेडकरांनी अतिशय कष्ट घेऊन, आपली महत्वाची कामे बाजुला सारुन लिहिला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि गांधींचे खरे स्वरूप जाणून घेण्यासाठी, ज्यांना राजकारणाची आवड आहे अशा प्रत्येकाने हा ग्रंथ वाचावयास हवा.
यासोबतच अनुसूचित जाती, जमातीच्या प्रत्येकांनी ज्यांना त्यांच्या दुर्दशेचं खरं कारण जाणून घ्यायचं आहे त्यांनी तर हा ग्रंथ प्राधान्य क्रमाने वेळात वेळ काढून वाचावयास हवा.
या ग्रंथाच्या प्रस्तावनेत डॉ. आंबेडकर म्हणतात, "अस्पृश्यांची स्थिती सुधारण्याच्या हेतूने, त्यांना वास्तवाची जाणीव व्हावी म्हणून आणि वस्तुस्थितीची चुकीची मांडणी करुन विदेशी जनमानसाला भ्रमित करण्याचा काँग्रेसच्या अश्लाघ्य प्रयत्नापाठीमागील काँग्रेसचे खरे स्वरूप उघड़ व्हावे म्हणून श्री. गांधी अणि काँग्रेसच्या या सर्व प्रयत्नाना अधिक विस्ताराने प्रगट करणे आवश्यक आहे. या पुस्तकात श्री. गांधी आणि काँग्रेसच्या कृत्यांचा १९१७ पासून तर आज तारखेचपर्यंतचा आलेखच प्रस्तुत करण्यात आला आहे. अशाप्रकारचे हे पहिलेच अध्ययन आहे. श्री. गांधी यांच्या अंधभक्त हिंदूना हे आवडणार नाहीच पण कदाचित हे अध्ययन त्यांच्या रोषालाही कारणीभूत ठरू शकेल. जेव्हा या पुस्तकाचा निष्कर्ष "श्री. गांधीपासून सावधान" असाच निघतो तेव्हा त्यांच्यापासून यापेक्षा वेगळ्या प्रतिक्रियेची अपेक्षाच असू शकत नाही. हिंदू या पुस्तकाचा अस्वीकार करतील आणि मला दूषणेही देतील. परंतु "कुत्री भूंकत असली तरीही काफिला चालतच राहिला पाहिजे." या म्हणीप्रमाणे मला माझे कर्तव्य केलेच पाहिजे. जो सत्य आणि स्वातंत्र्यावर प्रेम करतो, कशाचीही अपेक्षा करीत नाही, कोणालाही भीत नाही, काहीही मागत नाही, त्याने अशा क्षुल्लक बाबींमुळे निरुत्साही होऊ नये व आपले इतिहास निर्मितीच्या आणि इतिहास लेखनाच्या कार्यावर मर्यादा घालून घेऊ नये."
पुढे डॉ. आंबेडकर म्हणतात, "हे पुस्तक अस्पृश्यांच्या राजकीय हक्काच्या लढ्याची संपूर्ण माहिती देणारा ग्रंथ व्हावा असा माझा हेतू असल्याने सांख्यकीय माहितीशिवाय या पुस्तकात इतर संदर्भात माहिती देणारे परिशिष्टही जोडले आहे. या लढ्याशी संबंधित माहिती देणा-या अनेक शासकीय व अशासकीय प्रलेखांचा समावेश आहे. सर्वसामान्य वाचकांना जी माहिती सहज उपलब्ध होऊ शकते ती अस्पृश्य समाजाला तेवढया सहजतेने उपलब्ध होईलच याची खात्री नाही. म्हणून हे पुस्तक लिहिताना सामान्य वाचकांच्या अभिरुचीला नव्हेतर अस्पृश्यांच्या आवश्यकतेला अधिक प्राधान्य दिले गेले आहे."
डॉ. आंबेडकरांचे म्हणणे होते की, "काँग्रेस आणि गांधी कोणाच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहेत हा प्रश्न त्यांना विचारणे आवश्यक आहे. कारण देश गुलामच राहिला तरी चालेल पण पददलित वर्गाला मात्र सवर्ण हिंदू किंवा ब्राम्हणांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ द्यावयाचे नाही ही काँग्रेस आणि गांधीची नीती होती. पददलितांना मुक्ती हवीच असेल तर त्यांनी खुशाल धर्मांतर करावे, पण हिंदू धर्मात राहावयाचे असेल तर मात्र त्यांना सवर्ण हिंदूंचे गुलाम म्हणूनच राहावे लागेल, हेच काँग्रेस आणि गांधी यांचे धोरण होते."
मुळात हा ग्रंथ अनुसूचित जाती, जमातीचे खरे हितशत्रू कोण आहेत हे त्यांना कळावे म्हणूनच हा ग्रंथ लिहिण्याचे कष्ट डॉ. आंबेडकरांनी घेतले आहेत. हा ग्रंथ वाचल्यानंतर जे सध्याचं राजकारण बघताहेत त्यांना पुरेपूर आणि पक्की खात्री पटेल की, काँग्रेस आणि भाजप (आर एस एस) या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत किंवा एकाच शरीराचे दोन हात आहेत. एक नागनाथ तर एक सापनाथ आहे.
काँग्रेसची अपप्रचाराची यंत्रणा
काँग्रेसची अपप्रचाराची यंत्रणा खुप मोठी आहे. डॉ. आंबेडकरांच्या दिल्लीतील सभेला समजा पाच हजार लोक असले तर इकडे बातमी यायची की डॉ. आंबेडकरांच्या सभेला फ़क्त पाचशे लोक होते. म्हणजेच डॉ. आंबेडकरांना लोकांचे समर्थन नाही. त्याच्या स्टेजवरील समजा एखादी खुर्ची जरी एखाद्या कार्यकर्त्याचा धक्का लागून पडली तरी इकडे बातमी क्यायची की डॉ. आंबेडकरांच्या सभेत राळा, खुर्च्यांची फेकाफेक. तर अशा या काँग्रेसने डॉ. आंबेडकरांना बदनाम करण्यासाठी खुप काम केले. यापैकीच एक म्हणजे डॉ. आंबेडकर आणि अस्पृश्य हे कांग्रेसला, त्यांच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला साथ देत नाहीत कारण ते ब्रिटिश साम्राज्याचे हस्तस्क आहेत. काँग्रेसच्या या खोट्या प्रचारावर अनेक परकीय सुद्धा विश्वास ठेवत असत. कारण त्यांना वास्तविक परिस्थितीची जाण नव्हती.
स्वातंत्र्याच्या लढ्यात अस्पृश्यांच्या असहकाराविषयी काँग्रेसने दिलेले स्पष्टीकरण हे अत्यंत मुर्खपणाचे होते. असे स्पष्टीकरण एखादा मनोभ्रष्ट माणूसच देऊ शकतो आणि ते समाधानकारक आहे असे एखादा मुर्खच स्वीकारु शकतो. हा आरोप खोटा आहे हे सिद्ध करणे मुळीच कठिण नाही. अस्पृश्य हे तथाकथित स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी झाले नाहीत याला कारण ते ब्रिटिश साम्राज्याचे हस्तक होते म्हणून नाहीत तर त्यांना अशी भीती वाटत होती की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांच्यावर सनातनी हिंदूंचे राज्य प्रस्थापित होईल. सनातनी हिंदू त्यांच्यावर प्रभुत्व गाजवतील आणि त्यामुळे अस्पृश्यांचे विकासाचे सर्वच मार्ग बंद होतील. स्वातंत्र्य आणि सुख समृद्धीचे सर्वच मार्ग अवरुद्ध होऊन त्यांच्या वाट्यावर पाणी भरणे आणि लाकडे फोडणे एवढीच कामे येतील.
यासाठी आणखी दूसरे आणि महत्वाचे कारण हे होते की, ज्या कारणास्तव अस्पृश्यांना काँग्रेसशी असहकार करणे भाग पडले ते कारण म्हणजे, त्यांना हिंदू राज्याची प्रजा व्हावयाचे नव्हते. त्यांना हिंदूंच्या नियंत्रणात राहावयाचे नव्हते, ज्या राज्यात राज्यकर्ते ब्राम्हण आणि बनिया असतील आणि त्यापेक्षा कनिष्ठ जातीचे हिंदू पोलीस म्हणून कार्य करतील आणि हेच वंशपरंपरने अस्पृश्यांचे शत्रू होते.
याचाच अर्थ अस्पृश्य ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य प्राप्तीच्या विरोधात नव्हते, पण त्यांचा असा आग्रह होता की, देश ब्रिटिशांपासून स्वतंत्र होणे एवढेच पुरेसे नाही तर स्वतंत्र देश हा लोकशाहीच्या संवर्धनासाठी सुरक्षित राहणे सुद्धा आवश्यक आहे. म्हणून फ़क्त ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळाल्याने अस्पृश्यांचे समाधान होणार नव्हते. त्यांचे म्हणणे होते की, देशातील विशिष्ट समाज व्यवस्था लक्षात घेता, या व्यवस्थेत अनेक अल्पसंख्य जातीजमाती असून त्यांच्या विरोधात जातीय बहुसंख्यक असलेले हिंदू आहेत. तेव्हा या बहुसंख्यक हिंदूंच्या अधिकारावर नियंत्रणाची कोणतीही व्यवस्था संविधानात करण्यात आली नाही तर देशात लोकशाही सुरक्षित राहणार नाही. म्हणून अस्पृश्यांचा असा आग्रह होता की, असे संविधान रचण्यात यावे की, ज्यात देशाच्या विशेष परिस्थितीची दखल घेतलेली असेल आणि अशा संरक्षक तरतुदी करण्यात आल्या असतील की, ज्यामुळे जातीय बहुमताला देशातील राजकीय सत्तेच्या एकाधिकारापासून प्रतिबंधित करता येईल. त्यांना अस्पृश्यांना दडपून टाकता येणार नाही. त्यांचे शोषण करता येणार नाही. नविन संविधानात अशी प्रावधाने असतील की, ज्यामुळे अस्पृश्यांना काही राजकीय अधिकार प्राप्त होऊ शकतील. असे अधिकार ज्यांच्या आधारावर अस्पृश्य आपल्या शोषणाचा, दडपशाहीचा विरोध करु शकतील. ही प्रावधाने त्यांना स्वतःच्या सामर्थ्यावर जातीय बहुमताच्या विरोधात आपले अस्तित्व टिकविण्यासाठी सहायक ठरतील. थोडक्यात अस्पृश्यांना संविधानात संरक्षक प्रावधाने पाहिजे होती, जी प्रावधाने हिंदू बहुसंख्यांकांच्या जुलुमापासून त्यांचे संरक्षण करु शकतील.
याउलट काँग्रेसचे प्रथम आणि अंतिम ध्येय हे होते की, ब्रिटिश साम्राज्यापासून देशाला स्वातंत्र्य मिळावे. देशाचे संविधान कसे असावे असा प्रश्न काँग्रेसला कोणी विचारले तर त्यांचे उत्तर असे की, ते लोकशाही प्रधान असावे. लोकशाही कशी तर ती प्रौढ़ मताधिकारावर आधारित. बहुसंख्य हिंदूंच्या जुलुमाचा प्रतिकार करण्यासाठी संविधानात संरक्षक प्रावधाने ठेवण्यास त्यांचा नकार असे. का? तर अशा प्रावधानामुळे देशाचे तुकड़े पडतील असा त्यांचा अजब तर्क असे. या तर्काची उत्पत्ती मा. गांधी यांच्या सुपिक डोक्यातून झाली. खरे म्हणजे अशा प्रावधानामुळे उच्चवर्णीय हिंदूंच्या हितावर आघात होईल असे त्यांना वाटत होते.
अस्पृश्यांनी हा मुर्ख पण ढोंगी साधुवाद स्वीकारण्यास नकार दिला. त्यांचे म्हणणे असे होते की, जातीय भावना आणि जातीय पूर्वाग्रह हे देशाचे कठोर वास्तव आहे. आणि हे सर्व धर्मावर आधारित असल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट होणारी ही बाब नाही. म्हणूनच सांविधानिक तरतुदी आवश्यक आहेत.
आणि हेच अस्पृश्य काँग्रेसला सहकार्य न करण्याचे कारण होते.
अस्पृश्यांच्या मागण्या कोणत्या होत्या? १. विधानमंडळात किमान निश्चित प्रतिनिधित्वाची हमी २. कार्यकारिणीत किंवा प्रशासनात किमान निश्चित प्रतिनिधित्वाची हमी ३. सार्वजनिक सेवात किमान निश्चित प्रतिनिधित्वाची हमी. या मागण्यांचा काँग्रेसने धिक्कार केला. या मागण्या जातीय भावनेवर आधारित आहेत असा त्यांचा आरोप होता. या मागण्यांच्या आधारावर अस्पृश्यांना स्वार्थी आणि पोटार्थी संबोधिले गेले.
अशाप्रकारची हमी मागण्याचा उद्देश अस्पृश्यांची विधानमंडळे, प्रशासन आणि सार्वजनिक सेवेत सर्वस्तरावर अस्पृश्यांची भरती व्हावी असा मुळीच नव्हता. परंतु या हमीचा उद्देश, बहुसंख्य हिंदुच्या जातीय वरवंटयाखाली अस्पृश्य भरडले जाऊ नयेत म्हणून एक न्यूनतम हमीचे प्रावधान त्यांना हवे होते. त्यांचा उद्देश बहुसंख्य हिंदुच्या जातीयवादावर नियंत्रण ठेवणे हा होता, त्याला मर्यादा घालणे हा होता. अस्पृश्यांना अशी कोणतीही हमी दिली गेली नाही तर बहुसंख्य हिंदू जातीयवादी हे विधानमंडळे, प्रशासन आणि शासनयंत्रणा आपली बटीक बनवतील आणि आणि त्यामुळे राज्याची महत्वाची अंगे अस्पृश्यांना संरक्षण देण्याऐवजी हिंदू बहुसंख्यक जातीयावाद्यांच्या हातचे बाहुले बनून त्यांच्या लहरीनुसार या यंत्रणा कार्य करण्यास बाध्य होतील.
म्हणून संविधानात संरक्षक प्रावधाने घालून या संकटाला आळा घालणे आवश्यक होते. दुस-या शब्दात अस्पृश्य हे देशाची लोकशाही सुरक्षित ठेवण्यास उत्सुक होते, परंतु कांग्रेस मात्र लोकशाहीच्या प्रकट विरोधात नसली तरी खरी लोकशाही अस्तित्वात यावी यासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण करण्याच्या निश्चितच विरोधात होती.
संविधानात्मक प्रावधानांना विरोध करण्याचा कांग्रेसचा खरा हेतु हा हिंदू व बहुसंख्य समाजाला राजकीय कुरण चरण्यासाठी मुक्तपणे खुले असावे हाच होता. कांग्रेस जातीयवादी असणे स्वाभाविक होते. कारण जातीय बहुसंख्य हिंदू हे कॉंग्रेसचा मुख्य आधार होते. कांग्रेस ही हिंदूचीच बनलेली आहे आणि हिंदूंच्या भरवश्यावरच तीचे अस्तित्व जिवंत आहे. राष्ट्रीयता हे काँग्रेसचे आवरण होते. ज्याखाली जातीयवादी शक्तींना मोकळे रान उपलब्ध व्हावे असा काँग्रेसचा हेतु होता.
एवढे सर्व झाल्यावरही काही जण विचारत होते की, स्वातंत्र्याच्या लढ्यात अस्पृश्य कांग्रेसबरोबर का नव्हते? काँग्रेसशी सहकार्य करण्याची पूर्व अट संविधानात्मक संरक्षक प्रावधाने ही होती. काँग्रेसचे म्हणणे होते की, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही अशी प्रावधाने केली जाऊ शकतात. परंतु अस्पृश्यांचे कांग्रेससोबत जे मतभेद होते त्या आधारावर कांग्रेससोबत सहकार्य करणे अस्पृश्यांना सुरक्षित वाटत नव्हते. अशाप्रकारचा अग्रिम करार व्हावा यात काँग्रेसचे काय नुकसान होते असा अस्पृश्यांचा प्रश्न होता. काँग्रेसने जर अशी हमी दिली असती तर काँग्रेसचे काय नुकसान होणार होते? अस्पृश्यांचा तर्क असा होता की, काँग्रेसने संरक्षक प्रावधानांना अग्रिम मान्यता दिली तर अस्पृश्य आश्वस्त होतील. आणि काँग्रेसचे हे आश्वासन अस्पृश्यांना सहकार्य करण्यास प्रवृत्त करेल. अस्पृश्य कांग्रेसशी का सहकार्य करीत नव्हते, कारण त्यांना भीती वाटत होती की, जर स्वातंत्र्य प्राप्त झाले तर पुन्हा एकदा बहुसंख्य हिंदुंना अस्पृश्यांना गुलाम करण्याची संधी मिळेल. अस्पृश्यांचा बहुसंख्य हिंदूबद्दलचा आणि जगाचा आजपर्यंतचा अनुभव फारसा चांगला नव्हता. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर संरक्षक प्रावधाने देण्यात येतील या बोलण्यावर अस्पृश्यांचा विश्वास नव्हता. अति आत्मविश्वासाने आपली सुरक्षा धोक्यास्त आणून आपले अस्तित्व संपवण्यापेक्षा सुरक्षेची तरतुद करुन अस्तित्व टिकविणे अधिक चांगले. यात आपणास कोणी भित्रे म्हटले तरी चालेल, असे अस्पृश्यांना वाटत होते. मग जर ही भीती अग्रिम करार करवुन घालवण्यासारखी होती तर कांग्रेस त्याला का तयार नव्हती?
(संदर्भ - डॉ. बाबासाहेब काँग्रेस आणि गांधींनी अस्पृश्यांप्रती काय केले?)
गांधीवाद - २
गांधीवाद या भूमीचा कायदा झाला तर या व्यवस्थेत अस्पृश्यांची स्थिती काय होईल या प्रश्नाच्या उत्तरासाठी बुद्धीला फारसे कष्ट देण्याचे काहीही कारण नाही. जोपर्यंत हिंदुस्थानातील हिंदू समाजव्यवस्थेतील सर्वात खालचा वर्ग आणि अस्पृश्य या दोन्ही वर्गांना परंपरेने सर्व अधिकार नाकारले आहेत, हे एकाच वर्गात मोडतात तोपर्यंत अस्पृश्यांची स्थिती कनिष्ठ हिंदूपेक्षा चांगली असण्याची शक्यताच नाही. जर काही शक्यताच असेल तर ती त्याच्यापेक्षा अधिक वाईट होण्याचीच शक्यता जास्त आहे.
अस्पृश्यांना स्पर्श केल्यानंतर हिंदूना स्नान करण्याची गरज नाही असे गांधींनी म्हटलेले नाही. जर गांधी, स्पर्शामुळे अपवित्र झाल्याने स्नान करुन शुद्धी करावी याला आक्षेप घेत नसतील तर मग अस्पृश्यांना स्पर्श करुन अस्पृश्यता कशी नष्ट होईल हे समजणे अवघड आहे. याचा अर्थ हिंदूंशी अस्पृश्यांचे सामजिक अभिसरण असा होतो काय? श्री. गांधी यांनी स्पष्टपणे असे घोषित केले की अस्पृश्यता निवारण याचा अर्थ अस्पृश्य आणि हिंदू यांच्यात रोटी बेटी व्यवहाराला अनुमती असा होत नाही. श्री. गांधी यांची अस्पृश्यता निवरणाची कल्पना म्हणजे अस्पृश्यांना अती शुद्राच्या वर्गातून काढून शुद्राच्या वर्गात त्यांना सहभागी करणे एवढया पुरतीच सीमित आहे.
हिंदूधर्मशास्त्रांनी अस्पृश्यांच्या शिक्षणावर लादलेली बंधने गांधीवादाला मान्य नाहीत हे सत्य आहे. गांधीवाद अस्पृश्यांनी कायदा शिकावा, वैद्यकीय शास्त्र शिकावी, अभियांत्रिकी शास्त्र शिकावे या मताचा, ज्यांची जी इच्छा असेल ते शिकावे या मताचा आहे. परंतू अस्पृश्यांना त्यांच्या शिक्षणाचा, ज्ञानाचा उपयोग करण्याचा अधिकार मिळणार आहे काय?
अस्पृश्यांनी त्यांचा वडीलोपार्जित व्यवसाय केला पाहिजे. ते अस्वच्छ व्यवसायात आहेत म्हणून त्यांना या नियमातून वगळता येणार नाही. हे व्यवसाय या वर्गावर जबरदस्तीने लादण्यात आले आहेत. त्यांनी ते स्वेच्छेने स्वीकारले नाहीत, असे म्हणण्यात काही अर्थ नाही. गांधीवादाचा युक्तिवाद असा आहे की, एकदा जे ठरले ते ठरले. ते चुकीच्या मार्गाने ठरले असले तरीही त्याचे पालन झालेच पाहिजे. गांधीवादात अस्पृश्य हे अस्पृश्यच आहेत आणि कायमचे अस्पृश्यच राहणार आहेत. गांधीवादी अस्पृश्यतेच्या तुलनेत अस्पृश्य, सनातनी अस्पृश्य व्यवस्था अधिक पसंत करतील यात शंकाच नाही. ज्यात अस्पृश्यांवर अज्ञान अंधकारात राहण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे भंगीकाम कदाचित अधिक सुसह्य होईल. पण एका सुशिक्षित अस्पृश्याला गांधीवाद भंगीकाम करण्यास भाग पाडतो. केवढे हे क्रौर्य. गांधीवादात ज्याला वरदान मानले गेले, ख-या अर्थाने तो मोठा शापच ठरणार आहे. गांधीवादात अस्पृश्यता निवारणाचे कार्य म्हणून ज्याचा एवढा उदो उदो करण्यात आला आहे तो कार्यक्रम म्हणजे एक भ्रम आहे. त्यात तथ्य नाही. काहीही तथ्य नाही.
अस्पृश्यतेविरुद्ध फसवे अभियान आरंभ करण्यापलीकडे गांधीवादाने काहीही केले नाही. गांधीवाद हा सनातन वादाचेच दूसरे साधे रूप आहे. गांधीवाद हे गत काळातील आक्रमक हिंदू सनातनवादाला आधुनिक काळात दिलेले नाव आहे. हिंदू सनातनवादात जे आढळणार नाही असे गांधीवादात नवीन काय आहे? हिंदुत्ववादात जातीव्यवस्था आहे. गांधीवादातही जातीव्यवस्था आहे. हिंदुत्ववाद वडीलोपार्जित व्यवसाय स्वीकारण्यावर भर देतो. गांधीवादही तेच सांगतो. हिंदुत्ववाद गाईची पूजा सांगतो. गांधीवादही तेच करा असे म्हणतो. हिंदुत्ववाद हा कर्मवादाचा सिद्धांत मानतो. या जन्मात, जगात मानवाच्या वाट्याला जे काही आले आहे ते पूर्व जन्मीच्या कृत्याचे फळ आहे असा कर्मवादाचा अर्थ आहे. याच वादावर गांधीवादाचाही विश्वास आहे. हिंदुत्ववाद शास्त्रांचा अधिकार मान्य करतो. गांधीवादही शास्त्रांचा अधिकार मान्य करतो. हिंदुत्ववाद देवांच्या अवतारावर विश्वास ठेवतो. गांधीवादही त्यावर विश्वास ठेवतो. हिंदुत्ववाद मूर्तीपूजा मानतो. गांधीवादही मूर्ती पूजकच आहे.
गांधीवादाने काय केले असेल तर हिंदुत्वाच्या रुढींना आणि हिन्दुत्वाला तत्वज्ञानाचा आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. हिंदूधर्म हा नियम व बंधनांचा पुंजका आहे. आणि हे नियम आणि बंधने प्रथमदर्शनीच क्रूर आणि अप्रागतीक व्यवस्थेचे प्रतीक वाटतात. गांधीवादाने त्यांना तत्वज्ञानाचा आधार दिल्यामुळे त्यांचा चेहरामोहरा आता अधिक स्निग्ध वाटतो एवढेच. या तात्विक आधारामुळे त्यांना एक सन्मानित दर्जा व देखणेपणा प्राप्त झाला आहे. गांधीवादाने या नियमांचे रूप एवढे बदलून टाकले की, ते आता आकर्षक वाटू लागले आहेत. हिंदूधर्माची नग्नता झाकण्यासाठी कोणते तत्वज्ञान पुरस्कृत केले आहे. संक्षेपाने हे तत्वज्ञान अशाप्रकारे मांडता येईल. हिंदूधर्मात जे काही आहे उदात्त आहे असे सांगणारे हे तत्वज्ञान आहे. हिंदूधर्मात जे काही आहे ते लोककल्याणासाठी आवश्यक व उपयोगी आहे असेही हे तत्वज्ञान सांगते. पण या तत्वज्ञानाने हिंदू मात्र खुश आहेत. ते हिंदूच्या हिताचे आहे यात शंकाच नाही आणि म्हणूनच ते त्यांना योग्य ही वाटते. प्रामाणिकपणे त्यांना तसे वाटते म्हणून किंवा त्यांच्या आत्मस्तूतीच्या प्रवृत्तीचा स्वभावगुण म्हणून याची चौकशी करण्याकरता थांबण्याची गरज नाही.
अशा स्थितीत गांधीवादापासून अस्पृश्यांना काय आशा आहेत? हिंदूधर्म हा अस्पृश्यांकरीता दुःखाचे कोठारच आहे. वेद, शास्त्र आणि स्मृती पवित्र आहेत आणि त्या कधीही चुकत नाहीत हा विश्वास, जातीव्यवस्थेचे कठोर नियम, कर्माचा ह्रदयहीन सिद्धांत आणि जन्माच्या आधारावर समाजात स्थान ही सर्व शस्त्रे अस्पृश्यांना पीड़ित करणारी शस्त्रे आहेत. ही शस्त्रे हिंदुधर्माने अस्पृश्यांविरुद्ध परजली आहेत. ही शस्त्रे अस्पृश्यांचे अंग भंग करणारी आहेत. ही शस्त्रे अस्पृश्यांचे जीवन उध्वस्त करणारी, त्यांचे जीवनरंग रसहीन करणारी असून गांधीवाद त्यांना तशीच्या तशीच धारदार ठेवू इच्छीतो. अशा स्थितीत गांधीवाद हा स्वर्ग आहे असे अस्पृश्य कसे म्हणू शकतील. त्यांना तर हिंदूधर्म दुःखाचे कोठारच वाटणार आहे. या संदर्भात अस्पृश्यांची एकमेव आणि स्वाभाविक प्रतिक्रिया म्हणजे स्वतःला गांधीवादापासून चार हात दूर ठेवा हीच आहे.
हे सर्व जुन्या गांधीवादाला लागू पड़ते असे काही गांधीवादी म्हणू शकतील. त्यांच्यामते आता नवीन गांधीवाद उदयाला आला आहे. हा गांधीवाद जातीनिरपेक्ष आहे.
प्रथम गोष्ट अशी की, श्री. गांधी यांनी फ़क्त एवढेच म्हटले की जातीव्यवस्था ही कालविसंगत आहे. त्यांनी जातीव्यवस्था ही विकृती आहे, पाप आहे असे कोठेही म्हटले नाही. ही एक धिक्कारणीय व्यवस्था आहे असे त्यांनी कोठेही म्हटले नाही. श्री. गांधी हे वर्णव्यवस्थेला अनुकूल नव्हते असाही समज होऊ शकतो. पण वर्णव्यवस्था हे श्री. गांधी यांनी जातीव्यवस्थेला दिलेले नवीन नाव आहे. वर्णव्यवस्थेत जातीव्यवस्थेच्या सर्व विकृती जशाच्या तशाच कायम आहेत. या आधारावर गांधीवाद अस्पृश्यांना स्वीकार्य होऊच शकत नाही. अस्पृश्यांना असेच म्हणावे लागेल की, "अरे देवा! काय हाच तो गांधी नावाचा माणूस आहे जो आमचा मुक्तिदाता होण्याचा दावा करतो."
संदर्भ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर,
काँग्रेस आणि गांधींनी अस्पृश्यांप्रती काय केले?
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)