शुक्रवार, २ ऑगस्ट, २०१९

मी माझ्या आंधळ्या जनतेची काठी आहे

१९२६ च्या मे महिन्यात सातारा जिल्हा महार परिषदेचे अधिवेशन रहिमतपुर, ता. कोरेगाव, जि. सातारा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली भरले होते. या अधिवेशनात हिंदू समाजातील पांढरपेशे लोक आणि विशेषत: ब्राम्हण हजर होते. या अधिवेशनात अस्पृश्य समाजातील योग्य व्यक्तिस जे. पी. करावे असा एक ठराव होता. या ठरावाला सोमण या व्यक्तिने विरोध केला. देशात स्वातंत्र्य मिळविण्याची चळवळ चालली आहे आणि बहिष्कृतवर्ग (अस्पृश्य) सरकारने पदव्या व किताब आम्हाला द्यावेत अशी विनंती करुन देशाच्या गुलामगिरीला पाठिंबा देत आहे, हे ठीक नव्हे, असा त्यांच्या विरोधी भाषाणांचा सारांश होता. सोमणांचे भाषण संपताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर ताडकन उठले. त्यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. ते आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले,

हिंदू समाजातील पांढरपेशे लोक आणि विशेषत: ब्राम्हण लोक यांनी आपल्या देशबांधवांना धर्माच्या नावाने आपल्या पायाखाली चेपून ठेवले व हेच लोक हिंदू, मुसलमान आणि इंग्रज राज्यकर्त्याचे पाय चाटून ऐषारामी जीवन जगत आले. याच लोकांनी स्वार्थाधपणे आपल्या धर्मबांधवांना व देशबांधवांना परक्याच्या व स्वतःच्या गुलामगिरित डांबून ठेवले व ही गुलामगिरी त्यांनीच पाचशे वर्षे टिकवून ठेवली आणि आता हेच लोक राजकीय गुलामगिरीविरुद्ध बकवा करीत आहेत. हेच लोक काँग्रेसच्या झेंड्याखाली जमा होऊन राजकीय स्वातंत्र्य मिळविण्यासाठी देहदंड सोसण्यास तयार आहेत. हेच लोक अस्पृश्यांना सामाजिक व धार्मिक समता देण्यास तयार नाहीत. या लोकांनी संपूर्ण देशाचा व जनतेचा सर्वतोपरिने सत्यानाश केला आहे. या माझ्या विधानाची कोणाला ऐतिहासिक माहिती हवी असेल तर ती मी देण्यास तयार आहे. माझे हे म्हणणे खोटे आहे असे येथे कोणाला सांगावयाचे असेल तर त्याने ते सांगावे. ते मी खोडून काढण्यास तयार आहे. अस्पृश्यांच्या हातात सत्ता व संपत्ती जसजशी अधिक येत जाईल तसतशी त्यांची प्रगती होत जाईल. जे. पी. होणे किंवा आमदार होणे ही प्रगती घडवून आणण्याची साधने होत व ती आम्ही हाती घेतलीच पाहिजेत. ते तुम्ही घेऊ नका असे सोमणांसारखे जे लोक म्हणतात ते आमच्या लोकांचा बुद्धिभेद करुन त्यांना आहे त्याच गुलामी परिस्थितीत ठेवण्याचा डाव खेळत आहेत. सोमणांच्या जातभाईनी गेल्या हजार वर्षात ब्राम्हणेतरांचा व अस्पृश्यांचा अनेक युक्तया योजुन छळ केला. तुम्हाला धार्मिक हक्क नाहीत. ब्राम्हणांपेक्षा तुम्ही नीच आहात असे त्यांच्या जातभाईनी पुराणादी धर्मशास्त्रात लिहून त्याची अंमलबजावणी राज्यकर्त्याकडून करविली. आता ते म्हणतात, " देशाभिमान हा फ़क्त ब्राम्हणांचाच सद्गुण आहे. म्हणून ब्राम्हण लोक देशासाठी तुरुंगवास, देहदंड व सुळावरची शिक्षा सोसत आलेले आहेत." ब्राम्हणेतर व अस्पृश्य शिक्षा सहन करण्यास पुढे येऊ लागले तर हेच ब्राम्हण लोक म्हणतील : 'तुम्हाला राजकारण समजत नाही.' सरकारी नोक-यातील बहुतेक सर्व मोक्याची ठिकाणे ब्राम्हणांच्या हातात आहेत. ती ठिकाणे ब्राम्हणेतर व अस्पृश्य हस्तगत करण्याची तयारी करु लागले की हे ब्राम्हण म्हणतील की या जागा भूषविण्यास तुम्ही लायक नाही. सांगण्याचा हेतु असा की धर्म, राजकारण, इत्यादी गोष्टीतही आम्हीच काय ते श्रेष्ठ व बाकीचे सर्व कनिष्ठ असे समजून आतापर्यंत ब्राम्हण वागत आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यात मानसिक माजोरीपणा आणि बौद्धिक व्यभिचारीपणा आलेला आहे. ब्राम्हणेतर समाज व अस्पृश्य समाज हे आतापर्यंत ब्राम्हणांच्या या मानसिक माजोरीपणाला व बौद्धिक व्यभिचाराला भिऊन त्यांचे गुलाम म्हणून गुपचुपपणे वागत आलेले आहेत. परंतु या दोन्ही समाजांना आपली चूक कळून आलेली आहे आणि हे दोन्ही समाज एकत्र होऊन जर आत्मप्रगतीची चळवळ चालवतील तर ते या पांढरपेशा समाजाच्या गुलामगिरीतून लवकरच मुक्त होतील. परंतु हे घडणे फारच दुरापास्त आहे. कारण मराठे वगैरे लोक सत्यशोधक विचारांच्या कितीही वल्गाना मारीत असले तरी ते अद्याप मनाने व बुद्धिने ब्राम्हणी विचारसरणीचे बंदे गुलाम आहेत. आमचा अस्पृश्य समाज मराठे वगैरे लोकांच्या तोंडाकडे पाहत बसलेला आहे. या समाजाला माझे नेहमी हेच सांगणे आहे की तुम्ही कोणाचीही गुलामगिरी मानू नका. मी मनाने व बुद्धिने ब्राम्हणांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो आहे. मी त्या जातीचे बारसे जेवून बसलेलो आहे. ही जात सर्वत्र आपले वर्चस्व राहावे म्हणून जनतेची नेहमी दिशाभूल करीत असते. तिच्या बौद्धिक लाबाड्या चव्हाटयावर मांडून अस्पृश्यांना या लोकांपासून दूर ठेवणे हे मी माझे कर्तव्य समजतो. कारण, मी माझ्या आंधळ्या जनतेच्या हातातील काठी आहे. या काठीच्या आधारे माझी जनता प्रगतीची वाट चालू लागली तर ती या सोमणांसारख्या भोंदू व भेदक लोकांनी तयार केलेल्या खड्यात पडणार नाही.