मंगळवार, २६ एप्रिल, २०२२

मेरिट मागील पार्श्वभूमी

अनुसूचित जाती, जमातीबद्दल तुच्छता दाखवत स्वतःच्या मेंरिटचा अहंकार बाळगणारे सवर्ण उच्चजातीचे आपल्या बघण्यात आले असतीलच. या मेरिटच्या मागे त्यांना अनुसूचित जाती, जमातीपेक्षा शेकडो वर्षे जे विशेषाधिकार मिळाले त्याकडे मात्र दुर्लक्ष केलं जातं. एखादा सवर्ण उच्चजातीय एखाद्या क्षेत्रात जर यशस्वी होत असेल तर त्या व्यक्तीला तिथे पोहचण्यासाठी जेवढे प्रयत्न, श्रम करावे लागले असतील तेच यश मिळविण्यासाठी अनुसूचित जाती, जमातीच्या व्यक्तीला सवर्ण व्यक्तिपेक्षा कित्येक पट जास्त प्रयत्न, श्रम करावे लागतात. सवर्णांना ज्या गोष्टी सहज उपलब्ध होतात त्या सहज गोष्टीसाठी सुद्धा अनुसूचित जाती, जमातीतील लोकांना अथक परिश्रम करावे लागतात.

ईथे एका व्यक्तिचं उदाहरण घेतलेलं आहे. आता हेच उदाहरण संपूर्ण समाजाला लावा. सवर्णांनी शेकडो वर्षे विशेषाधिकार, विशेष संधीचा उपभोग घेतला तर त्याच जागी अनुसूचीत जाती, जमातीच्या  लोकांनी या सवर्णांकडून हालअपेष्टा सोसलेल्या दिसून येईल.

ह्या व्हिडिओत जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांनी जे यश मिळविलं त्याठिकाणी जर एखादा दूसरा व्यक्ती असता तर कदाचित तेवढा यशस्वी होऊ शकला नसता. कारण बिल गेट्सला त्याच्या विशेष स्थितिमुळे ज्या विशेष संधी उपलब्ध झाल्यास त्या कदाचित इतरांना झाल्या नसत्या.

मग आंबेडकर का यशस्वी झाले? असले अपवादात्मक उदाहरण देणारे मुर्ख सुद्धा तुम्हाला नक्कीच भेटले असतील. डॉ. आंबेडकर हे अपवाद आहेत. थोड्या फार प्रमाणात प्रत्येक ठिकाणी असं एखादे अपवादात्मक उदाहरण असते. पण अपवाद म्हणजे नियम नाही. डॉ. आंबेडकरांसारखे एखादे अपवादात्मक उदहारण देऊन शेकडो वर्ष जे विशेषाधिकार उपभोगले त्याला नाकारता येत नाही. जर मेहनत करुनच अनुसूचित जाती, जमातीतील सगळेच लोक आंबेडकर बनू शकले असते तर अनुसूचित जाती, जमातींना त्यांच्या हक्कांसाठी डॉ. आंबेडकरांना सवर्ण सनातनी वृत्तिशी आयुष्यभर लढा द्यावा लागला नसता. ज्या सवर्णांनी शेकडो वर्षे १०० टक्के आरक्षण घेतलं तेच अनुसूचित जाती, जमातींना आरक्षण द्यावे लागू नये म्हणून गेल्या सत्तर वर्षापासून अनेक षडयंत्र करत आलीत. म्हणूनच कदाचित सवर्णांना मिळालेल्या विशेष संधीचा कोणी उच्चार करु नये म्हणून या षड़यंत्री वृत्तीवर न बोलता सत्तर वर्षापासून आरक्षणाच्या नावाने बोंबा काही जण मारत असतील? जर सवर्णांना मेरिटचा एवढाच अहंकार असेल तर त्यांनी अनुसूचित जाती, जमातींना जसं गुलामीत ठेवलं तसेच किमान पाचशे वर्षे त्यांच्या गुलामीत राहून दाखवावे आणि मग नंतर मेरिटच्या बाता माराव्यात.

Watch "The Dark Secret of Bill Gates | Becoming the World's Richest Man | Dhruv Rathee" on YouTube

https://youtu.be/IFxmKHhZnPE 

हरिजन सेवक संघ आणि गांधी

मा. गांधी यांना आपण देशातील सर्वच घटकांचे प्रतिनिधित्व करतो असे दाखवायचे होते. त्यामुळे मा. गांधींचे नेहमी म्हणणे असे की, मी सर्वांचे प्रतिनिधित्व करतो, याचाच अर्थ अस्पृश्यांचे नेतृत्व सुद्धा मीच करतो.

भलेही अस्पृश्य या गोष्टीस मानत नसले तरीही. तसाही सर्व मीडिया काँग्रेसच्या बाजूने होता. कांग्रेसकडे पैसाही भरपूर होता. सर्व उद्योगपती काँग्रेसशी संबंधित होते. त्यामुळे त्यांच्याकडून काँग्रेसला होणारी मदतही फार मोठी होती. या आर्थिक पाठबळावर आणि मिडियाच्या जोरावर मा. गांधीजींना जगासमोर आपले मोठेपण दाखवायचे होते.

यासाठीच मा. गांधीजींनी अस्पृश्यांना काँग्रेस फार मोठी मदत करते हा देखावा निर्माण करण्यासाठी 'हरिजन सेवक संघ' नावाची संस्था स्थापन केली. मुळात मा. गांधीजींना अस्पृश्य संघटित आणि शक्तीसंपन्न व्हावेत असे वाटत नव्हते. फ़क्त त्यांचा मुख्य हेतू हा होता कि, अस्पृश्यांच्या मनात आपल्या हिंदू मालकाविषयी मानसिक गुलामगिरीची मानसिकता विकसीत व्हावी.

अस्पृश्यांना ह्या गोष्टी समजून याव्यात म्हणून डॉ. आंबेडकरांनी, कृष्णाला आपल्या स्तनाग्रांना विष लावून दूध पाजून ठार मारण्याच्या उद्देशाने दाई बनून आलेल्या पूतना मावशीची कथा सांगितली. ते म्हणतात की, दूध पाजणारी दाई खुनी सुद्धा असू शकते.

सेवेचे नाव घेऊन हरिजन सेवक संघ अस्पृश्यांची स्वतंत्र प्रज्ञा मारून टाकण्यासाठी प्रयत्नशील होता. हरिजन सेवक संघाने  अस्पृश्यांना छोटया मोठ्या सेवा बहाल करुन उपकराच्या ओझ्याखाली दबलेल्या अस्पृश्यांची एक फळीच उभारली होती आणि या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेल्या व्यक्तींवर मा. गांधी आणि हिंदू हे अस्पृश्यांचे मुक्तीदाते आहेत हे पटवून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. हरिजन सेवक संघाच्या कार्याचा सर्वात वाईट पैलू म्हणजे, संघाच्या वस्तीगृहात अस्पृश्य विद्यार्थ्यांची सोय करुन त्यांना केलेल्या मदतीचा त्यांच्या समजाविरुद्ध केलेला दुरुपयोग हा होय.

डॉ. आंबेडकरांचे म्हणणे होते की, अस्पृश्यांच्या नेमक्या काय अडचणी आहेत आणि त्या कशा सोडवायच्या याची जाण जेवढी अस्पृश्यांना आहे तेवढी गांधी आणि हिंदूंना नाही. त्यामुळे हरिजन सेवक संघाच्या व्यवस्थापन मंडळावर अस्पृश्यांना प्रतिनिधित्व द्यावे. जेणेकरुन अस्पृश्यांची सेवा करण्याच्या बहाण्याने अस्पृश्यांना हिंदूंचे मानसिक गुलाम बनवता येणार नाही.  परंतू मा. गांधीजींनी यास ठाम नकार दिला. डॉ. आंबेडकर म्हणतात, या नकारासाठी महाधूर्त माणसालाही शोधता येणार नाहीत, अशी कारणे श्री. गांधी यांनी आपल्या नकाराच्या समर्थनार्थ दिली. मा. गांधीजींचा पहिला युक्तिवाद असा होता की, हरिजन सेवक संघ हा हिंदूंनी अस्पृश्यतेचे पालन करुन केलेल्या पापाच्या प्रायश्च्चित्तासाठी निर्माण केलेली संस्था आहे आणि ते प्रायश्चित्त त्यांनीच करावयाचे आहे. म्हणून अस्पृश्यांना संघाच्या व्यस्वस्थापनात सहभागी करुन घेता येणार नाही. त्यांचा दूसरा युक्तिवाद असा होता की, संघाच्या कार्यासाठी दिलेला पैसा हा हिंदूंनी दिलेला आहे. तो पैसा अस्पृश्यांनी दिलेला नाही म्हणून अस्पृश्यांना संघाच्या व्यवस्थापन मंडळावर प्रतिनिधित्व मागण्याचा अधिकार नाही. याचाच अर्थ असा होतो की, हिंदूंनी जमा केलेला पैसा अस्पृश्यांवर कसा खर्च करावयाचा हे हिंदूच ठरविणार. भलेही त्याने अस्पृश्यांचा फार काही फ़ायदा होवो किंवा न होवो. फ़क्त जगाला दिसले पाहिजे की आम्ही समाजसेवा करतोय. त्यांना फ़क्त अस्पृश्यांना हिंदूंचे मानसिक गुलाम बनवायचे होते आणि दुसरीकडे आपण कसे सेवाभावी लोक आहोत याची प्रसिद्धी जगासमोर करावयाची होती.

आणि एवढे करूनही अस्पृश्यांनी शेवटी संघाचा बहिष्कारच केला.

या वृत्तित अजूनही बदल झालेला आहे असे दिसून येत नाही. असे समाजसेवेचे ढोंग आजही अनेकजण करतांना दिसत आहेत. आजही काही जातीयवादी विचारसरणीशी संबंधित लोक एकीकडे अनुसूचित जाती, जमातींसारख्या वंचित घटकांसाठी वस्तीगृह, आश्रमशाळा, शाळा चालवितात तर दुसरीकडे त्याच लोकांच्या आरक्षणासारख्या सांविधानिक अधिकाराच्या विरुद्ध मोर्चे काढतात. हे ढोंगी लोक अनुसूचित जाती, जमातींना आरक्षण असून सुद्धा त्या जागा भरल्या जात नाहीत यासाठी सत्ताधा-यांना कधीही जाब विचारणार नाहीत किंवा त्यासाठी आंदोलन करुन आपली समाजसेवा दाखविणार नाहीत. अनुसूचित जाती, जमातीवर अनेक अत्याचार होतात. त्यांना पोलिसात साधी तक्रार नोंदवुन घेण्यासाठी कित्येक चकरा माराव्या लागतात. त्यासाठी त्यांना मोर्चे काढावे लागतात. अशा वेळेस हे ढोंगी समाजसेवक अत्याचारग्रस्तांसाठी आंदोलने करण्याऐवजी अत्याचारी व्यक्तीच्या समर्थनार्थ मोर्चे काढतात.

अट्रोसिटी कायद्यानुसार शिक्षा होण्याचे प्रमाण फ़क्त ४ टक्के आहे. म्हणजे शंभरातून ९६ आरोपींना शिक्षा होत नाही. काही जातीयवादी विचारणीच्या लोकांचे म्हणणे असते की, अट्रोसिटीच्या केसेस खोट्या असतात म्हणून आरोपींना शिक्षा होत नाही. याचा अर्थ असा होतो शंभरातून ९६ केसेस मध्ये अनुसूचित जाती, जमातीचे होणारे खून, बलात्कार खोटे असतात. म्हणजे अनुसूचित जाती, जमातींना आपल्याच लोकांचे खून, बलात्कार करुन इतरांना फसविणे याशिवाय दूसरे काही कामच नाही. डॉ. आंबेडकर अशा केसेस मध्ये आरोपी निर्दोष सुटण्याचे कारण असे सांगतात की, गुह्याचा तपास करणारे प्रशासकीय अधिकारी हे ज्या जातीयवादी समाजात लहानाचे मोठे होतात त्यांचे तेच जातीय पूर्वाग्रह घेऊन प्रशासकीय पदावर जात असतात. त्यामुळे त्यांच्याकडून होणा-या तपासात आरोपीला वाचविण्यात भूमिका मोठी असते. अनुसूचित जाती, जमातीचे अधिकारी असले तरीही त्यांचे प्रमाण अतिशय नगण्य असते आणि त्यांच्यावर त्यांच्या वरिष्ठांचा दबाव असतो. तर दुसरीकडे प्रशासन आणि राजकारणी मिळून अत्याचारग्रस्तावर दबाव आणून त्यांनाच खोटे पडतात.

हाथरसच्या घटनेत प्रशासकीय अधिकारी पीड़ित परिवाराला कसे धमकावत होते ते सा-या जगाने पाहिले आहे. आजकाल तर कोणता पोलिस अधिकारी कोणत्या राजकीय पक्षासाठी काम करतो, कोणाला काय टॉरगेट दिले आहे, त्याची विचारसरणी काय आहे, सेवेतून निवृत्तीनंतर तो कोणत्या पक्षात जाणार याबद्दल दिवसरात्र चर्चा सुरु आहे.

त्यामुळे अशा जातीयावाद्यांनी समजसेवेचे कितीही ढोंग केले तरी अनुसूचित जाती, जमाती यांच्यावर कधीही विश्वास ठेवत नाहीत.

त्यामुळे शेवटी यांच्यातले काहीजण समाजसेवेचे आपले ढोंग बाजूला ठेवून या समुहाना शिव्या देत आपले खरे रूप दाखवून देतातच. 

सत्यनारायण आणि परित्राण पाठ

सत्यनारायण गेला आणि परित्राण पाठ आला' हे वाक्य अनेकांकडून ऐकलं असेल. हयाचा अर्थ सत्यनारायण कथा आणि परित्राण पाठ ह्या दोन्ही गोष्टी समान आहेत अशी त्यांची समजूत. परंतु सत्यनारायण कथा म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी घालून मनुष्याला दैववादी बनविणारी कथा. सत्यनारायण कथेमध्ये अंधश्रद्धेला खतपाणी घालणा-या चमत्कारीक गोष्टी सांगून, सत्यनारायण कथा केल्यामुळे काय फ़ायदा आणि न केल्यामुळे काय तोटा होतो ह्याबाबत विज्ञानाला धाब्यावर बसविणा-या गोष्टी सांगितल्या जातात. याउलट परित्राण पाठ म्हणजे फ़क्त धम्म श्रवण करणे. परित्राण पाठ केल्याने अमुक लाभ होईल आणि न केल्याने अमुक तोटा होईल असल्या अंधश्रद्धा वाढविणा-या गोष्टी सांगितल्या जात नाही. तरीही अनेक मुर्ख लोक हयात ओढून तानून साम्य दाखविण्याचा प्रयत्न करतात.

सत्यनारायण कथेमध्ये काय सांगितले जाते ते खालील व्हिडिओत अगदी सोप्या शब्दात समजावून सांगितले आहे. परित्राण पाठ सांगणा-याने अशा चमत्कारीक गोष्टी सांगितल्या असे आतापर्यंत मी तरी बघितले नाही.

https://youtu.be/uLEhg_4y-uI 

चुकीला चूक म्हटले तर एकटं पडू अशी भीती वाटणा-यांसाठी

चुकीला चूक म्हटले तर एकटं पडू अशी भीती वाटणा-यांसाठी बाबासाहेबांचे मत, "माझ्यासंबंधी ज्यांची मते चांगली नाहीत असे बरेचसे लोक आहेत. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की कोणाचाही कसलाही अपमान करावा अशी माझी मुळीच इच्छा नसते. पुष्कळ हिंदू माझ्याकडे शत्रुत्वाच्या नजरेने पाहतात. मी त्यांच्या भावना दुखविण्याइतके कठोर बोलतो अशी त्यांची तक्रार आहे. परंतु माझे ह्रदय अत्यंत कोमल आहे हे मला माहीत आहे. तथापि, कोमल हृदयाच्या माणसाने सुद्धा सत्य बोलून दाखविलेच पाहीजे. आपल्या अत्यंत प्रिय अशा आप्तेष्टांना कुत्र्यापेक्षाही वाईट वागविल्या जात असतांना आणि त्यांची पुढील प्रगतीची द्वारे सर्व त-हेने बंद झालेली आहेत हे दिसत असतांना मी हिंदुंशी दयाळूपणाने वागावे अशी ते अपेक्षा तरी कशी करु शकतात? म्हणूनच माझ्या भावना आवरून माझ्या विरोधकांशीही सन्मानपूर्वक वागण्याचा मी प्रयत्न करतो. माझ्या विरोधकांशी माझी वागणूक दृष्टपणाची कधीच नसते. परंतु त्यांचे अपराधी मन खात असते." 

ब्राम्हणेत्तर बहुजनांची मानसिकता

संघ-भाजपला शिव्या दिल्या म्हणजे बहुजन समाजातील धर्मांधता, जातीयवाद लपतो असे नाही. म्हणूनच बहुजन समाजाचे  काय चुकतयं यावर सुद्धा विचार झाला पाहीजे. डॉ. आंबेडकरांनी ब्राम्हण, ब्राम्हणेत्तर आणि अस्पृश्य (अनुसूचित जाती) अशी जातींची वर्गवारी केली होती. ब्राम्हण म्हणजेच सवर्ण उच्चजातींची संख्या १५% समजली जाते. या १५% लोकांनी मनात आणलं तरी काहीही होऊ शकत नाहीत जोपर्यंत ब्राम्हणेत्तर आणि अनुसूचित जाती-जमाती त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागणार नाहीत. ब्राम्हणेत्तर समाजातील प्रबळ जातींच्या हातात बराच काळ सत्ता राहिलेली आहे. अनुसूचित जातींच्या नेत्यांचं तसेही काही चालत नाही. कारण ब्राम्हण आणि ब्राम्हणेत्तरांनी त्यांच्या मर्जीने वागणारा अनुसूचित जातीचा उमेदवार निवडलेला असतो. परंतु बहुजन समाजाच्या नावावर प्रबळ जातींनी एवढ्या वर्षात केलेलं राजकारण संघाला पूरक आणि पोषकच होतं. धर्मनिरपेक्षतेचं तत्व होतं पण यांनी त्याचं पालन प्रामाणिकपणे कधीही केलं नाही. यांचा जोर फ़क्त फुले-शाहू-आंबेडकर नारा देण्यापुरताच. उदाहरणे बरेच देता येतील पण दोनतीन उदाहरणे देतो. ८० च्या दशकापर्यंत कान्हेंट शाळांचं प्रमाण अतिशय नगण्य होतं. ज्या काही शाळा होत्या त्या बहुतांशी सरकारी अनुदानित शाळा होत्या. त्यापैकी बहुतांश काँग्रेसी बहुजन नेत्यांच्या, आमदार खासदारांच्या होत्या. या सर्व शाळेत शुक्रवाराला सरस्वती पूजा व्हायची. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने व्हायची. अनेक शाळेत गणपती बसविला जायचा. ही कोणती धर्मनिरपेक्षता होती? हे संघाला पूरक वागणे नव्हते का? याचा संघाला फ़ायदा होणार नव्हता का? संघाला हेच पाहीजे होते. तेव्हा आपल्या बहुजन नेत्यांचं चुकत नव्हतं का? अनेक सरकारी कार्यालयात देवीदेवतांचे फोटो लावले जायचे. सरकारी बँकांच्या कैशियरच्या रुम मध्ये सुद्धा लक्ष्मीचा फोटो असायचा. मागे एका अधिका-याने सरकारी कार्यालयात देवीदेवतांचे फोटो लावता येणार नाही असे पत्रक काढले होते. त्याचा विरोध सर्वात आधी बहुजन समाजातील नेत्यांनीच केला होता. रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत ध्वनिक्षेपक वापरता येणार नाही असा कायदा झाला त्यावेळी या कायद्यातुन काही विशेष दिवस सूट मिळावी अशी मागणी सर्वप्रथम बहुजन नेत्यांनीच केली आणि तशी सूट मिळविली. हे वागणे संघाला पूरक नव्हते का? आपले चुकत असतांना कोणत्या तोंडाने फ़क्त संघाला शिव्या द्यायच्या? इतर धर्माच्या बाबतीत आपण पक्षपात करतोय हे यांना तेव्हा समजत नव्हतं का? की कोणी काही म्हणत नाही म्हणून कसेही वागायचे? गणपती विसर्जनाच्या दिवशी दिवसभर मुख्य रस्ता बंद राहायचा पण मुस्लिमांनी एकदा का रस्त्यावर नमाज पडला की यांनी रस्त्यावर महाआरती सुरु केली. हे बहुजन नेत्यांची साथ असल्याशिवाय शक्य आहे काय? गणपती ग, भटजी भ, यज्ञ य, क्षत्रिय क्ष एवढ्या वर्ष एकाच धर्माशी संबंधित शब्द शिकविले गेले. यावर एवढ्या वर्षात कोणत्याही बहुजन नेत्याने आक्षेप घेतला नाही. अल्लाचा अ, बुद्धाचा ब, येशुचा य शिकवू शकत नव्हते का? एवढ्या वर्ष संघ-भाजपचेच सरकार होते का? एवढे वर्ष हा पक्षपात इतर धर्मीय सहन करत होते तो राग कधी ना कधी बाहेर पड़णारच ना. आता तो व्यक्त करायची साधनं उपलब्ध झाली म्हणून तो व्यक्त होतोय. तर आता हे लोक इतरांना धर्मनिरपेक्षता वगैरे शिकवायला लागलेत. धर्मांधतेचं स्लो पायझन काँग्रेसच्या काळापासूनच देणे सुरु होते. त्याचाच फ़ायदा संघ-भाजपला झाला. आणि यांच्या ह्या असल्या दुटप्पी वागणुकीनेच संघ-भाजपाच सरकार येण्यात मदत झाली. 

सवर्ण हिंदूंच्या हातात सत्ता राहिल्यास राखीव जागा भरतांना ते कसा अप्रामाणिकपणा करतात

सवर्ण हिंदूंच्या हातात सत्ता राहिल्यास राखीव जागा भरतांना ते कसा अप्रामाणिकपणा करतात, याविषयी डॉ. आंबेडकर म्हणतात, "आम्ही वाईट कायदे असल्यामुळे, यातना भोगतो आहोत असे नव्हे तर वाईट शासनामुळे आम्हाला यातना भोगाव्या लागत आहेत. हे शासन केवळ हिंदू जातींच्या हाती असल्यामुळे वाईट झाले आहे. हे हिंदू, सामाजिक पूर्वग्रह शासनातही घेऊन जातात व अस्पृश्यांना मिळावयास हवा असणारा लाभ कोणते तरी कारण दाखवून ते त्यांना सतत मिळू देत नाहीत. जेथपर्यंत तुमचे शासन चांगले नाही तेथपर्यंत चांगले कायदे तुमचे काहीच कल्याण करु शकत नाही आणि अस्पृश्यांपैकी काही लोक सरकारी नोक-यांच्या पदावर जेव्हा जातील तेव्हाच तुम्हाला चांगले शासन मिळेल. कारण हे लोक, हिंदू अधिकारी अस्पृश्यांशी कशा त-हेने आचरण करीत आहेत यावर नजर ठेवून त्याला आळा घालतील व काही टवाळकी करण्यापासून त्यांना रोखतील. तथापि, केवळ राखीव जागांसाठी मागणी करणे पुरेसे नाही तर ह्या राखीव जागा ठराविक काळाच्या आत भरल्या जाव्या असा आग्रह धरणेही अत्यंत आवश्यक आहे. केवळ राखीव जागांपेक्षा याचे महत्त्व अतिशय आहे. कारण तुम्ही काळ निश्चित केल्याशिवाय राखीव जागा अस्तित्वात येणारच नाहीत. काही तरी कारणे दाखवून टाळाटाळ केल्या जाईल व अर्थातच नेहमीच्याच पण अतर्क्य कारणामुळे आपल्यामध्ये कोणी लायक उमेदवारच सापडणार नाही. आपणा सर्वांना माहीतच आहे की, नेमणूक करणारा अधिकारी जर एखादा हिंदू असेल तर अस्पृश्यांमध्ये कोणीही योग्य उमेदवार नसतोच!" 

सोमवार, २५ एप्रिल, २०२२

तो समाज जो हिंदूंनी बनविला

या लेखात डॉ. आंबेडकरांनी हिंदू धर्मातील वर्ण आणि जात व्यवस्थेवर अगदी समर्पक प्रकाश टाकला आहे. त्यांच्या मते हिंदू धर्मातील जातीव्यवस्था ही अनेक वर्गात विभाजित आहे. पहिला वर्ग त्या व्यवस्थेचा आहे ज्याला चातुर्वर्ण्य म्हणून संबोधिले जाते. चातुर्वण्य या प्राचीन व्यवस्थेमध्ये प्रथम तीन वर्ण ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य यांना एका वर्गात तर चौथा वर्ण शुद्र यांना दुस-या वर्गात ठेवून त्यांच्यात अंतर दाखविले गेला आहे. प्रथम तीन वर्णाला द्विज वर्ग मानले गेले आहे. परंतु शुद्राला द्विज वर्गातील मानण्यात आलेले नाही. विभाजित करण्याचा आधार हा ठेवला गेला आहे की प्रथम तीन वर्णाला यज्ञोपवित धारण करण्याचा आणि वेदांचे अध्ययन करण्याचा अधिकार आहे. शुद्राला हा अधिकार नाही. या विभाजनामुळे जातींचे दोन वर्गात विभाजन झाले आहे. याच विभाजनामुळे काही जातींना उच्च जाती आणि काही जातींना कनिष्ठ जाती म्हटल्या जाते.

या खाली सुद्धा एक वर्ग आहे जो वरील चार वर्णाच्या खाली आहे. हा वर्ग चार वर्ण अर्थात पहिल्या तीन अर्थात ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य या उच्च जाती आणि चतुर्थ वर्ण शुद्र अर्थात कनिष्ठ जातींच्या नंतरचा वर्ग आहे. हा वर्ग आपल्यापेक्षा वरच्या जातींना उच्च मानतो. चातुर्वर्ण्य व्यवस्थेने तीन वर्णांना उच्च म्हटले आहे त्याचप्रमाणे या व्यवस्थेने चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या बाहेर असलेल्या जातींचे सुद्धा विभाजन केले आहे. त्यांच्याजवळ त्यासाठी एक शब्द होता, जे चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या आत आहेत भलेही त्या उच्च जाती किंवा कनिष्ठ जाती, ब्राम्हण असतील किंवा शुद्र, त्यांना सवर्ण म्हटले गेले म्हणजेच त्यांना वर्णाचा शिक्का बसला. जे चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या बाहेर होते त्यांना अवर्ण म्हटले गेले म्हणजेच त्यांच्यावर वर्णाचा शिक्का लागलेला नव्हता.

हे अवर्ण हिंदू कोण आहेत, हिंदू समाजात त्यांचे काय स्थान आहे, सवर्ण हिंदूंसोबत त्यांचे संबंध कसे आहेत याकडे आतापर्यंत फारसे लक्ष कुणी दिलेले नाही.

अवर्ण हिंदूंचे तीन भाग आहेत. १) आदिम जाती २) गुन्हेगारी व्यवसाय करणा-या जाती आणि ३) अस्पृश्य जाती.

सवर्ण जाती आणि अवर्ण जातीत असलेले विभाजन एकसारखे नाही. सवर्ण जाती आणि दोन अवर्ण जाती म्हणजेच आदिम जाती आणि गुन्हेगारी व्यवसाय करणा-या जाती यांच्यात जसे संबंध आहे, त्यापेक्षा सवर्ण जाती आणि तीसरी अंतिम अवर्ण जाती म्हणजेच अस्पृश्य यांच्यासोबत असलेल्या संबंधापेक्षा वेगळे आहेत. सवर्ण जाती आणि प्रथम दोन अवर्ण जातीतील विभाजन जात-भाई म्हणजेच मित्रांसारखे आहेत. दोघांमध्ये मैत्रीपूर्ण किंवा सम्मानजनक संपर्क संभव आहे. परंतु सवर्ण जाती आणि अस्पृश्य जाती यांच्यातील विभाजन विजातीय आणि विरोधी समुहातील विभाजन आहे. जिथे सम्मानजनक अटींच्या आधारावर मैत्रीपूर्ण संपर्काची कुठलीही संभावना नाही.

या विभाजनाचा आधार तसाच आहे जसा द्विज जाती आणि शुद्र जातीमधील आहे. सवर्णांमधील शुद्र जाती आणि अवर्णांमधील आदिम जाती आणि गुन्हेगारी व्यवसाय करणा-या जाती यामधील अंतर अतिशय नगण्य आहे. हे अंतर स्पष्ट करण्यासाठी हिंदूंनी नविन शब्द निर्माण केले आहे. ते शूद्रांचे दोन वर्ण मानतात. १) सुसंस्कृत शुद्र आणि २) शुद्र. शूद्रांच्या प्राचीन वर्गाला त्यांनी सुसंस्कृत शुद्र आणि आदिम जातीसहित हिंदू सभ्यतेला मानलेल्या जातींना शुद्र हा शब्द वापरला. हे विभाजन केवळ यासाठी केले आहे की कोणते शुद्र द्विज जातीसोबत सहजीवन जगण्यास जास्त उपयुक्त आणि कोणते कमी उपयुक्त आहेत.

निश्चितच अवर्ण जातीतील या समुहात विभाजन आहे. आदिम जाती आणि गुन्हेगारी व्यवसाय करणा-या जाती यांमध्ये विभाजन आहे किंवा नाही याबाबतीत शंका आहे. कदाचित हे अंतर अतिशय नगण्य आहे. परंतु यात कुठलीही शंका नाही की आदिम जाती व गुन्हेगारी व्यवसाय करणा-या जाती आणि अस्पृश्य जाती यांच्यात स्पष्ट आणि मोठा वर्ग-भेद आहे. अवर्ण जातीतील प्रथम दोन जातींची स्पष्ट धारणा आहे की त्या उच्च जाती आहेत आणि अस्पृश्य जाती या कनिष्ठ जाती आहेत.

द्विज जाती आणि शुद्र जाती यामध्ये खरं तर विभाजन नाहीच. जे विभाजन आहे तो केवळ एक पडदा आहे. शुद्र जाती आणि प्रथम दोन अवर्ण जातीत विभाजन आहे परंतु ते सुद्धा अतिशय क्षीण आहे. हे विभाजन पार करता येऊ शकते. परंतु हे तीन वर्ग आणि अस्पृश्य यांच्यातील विभाजनच वास्तविक विभाजन आहे आणि याला दूर केले जाऊ शकत नाही. ते काटेरी कुंपणासारखे आहे आणि त्याचा स्पष्ट उद्देश दूर ठेवणे असा आहे. द्विज आणि शुद्र जातींमधील विभाजन दूर केल्या जाऊ शकते. म्हणजेच ते एकत्र येऊ शकतात. त्याचप्रमाणे दूसरे विभाजन सुद्धा दूर होऊ शकते. म्हणजेच द्विज, शुद्र, आदिम आणि गुन्हेगारी व्यवसाय करणा-या जाती एक समूह बनवू शकतात आणि एकत्र राहु शकतात. परंतु तीसरे विभाजन कधीही दूर केले जाऊ शकत नाही. कारण जातींचे हे तीन वर्ग एका मुद्द्यावर सहमत आहेत की ते अस्पृश्यांसोबत एक होऊ शकत नाही. ही फार मोठी बाधा आहे जी अस्पृश्यांना बाकीच्यांपासून वेगळे करते आणि अलग-थलग राहण्यासाठी त्यांना विवश करते.

आदिम आणि गुन्हेगारी व्यवसाय करणा-या जाती कालांतराने हिंदू समाजाचे सदस्य बनू शकता. सध्या ते हिंदू समाजासोबत जुळलेले आहेत, नंतर ते हिंदू समाजाचे अंग बनू शकतात. परंतु अस्पृश्यांची स्थिति वेगळी।आहे. त्यांना अलग-थलगच राहावे लागेल, ते हिंदू समाजाचा अंग बनू शकत नाही. हिंदू आणि अस्पृश्य यांच्यातील संबंध कसे आहेत याची व्याख्या मुंबई मध्ये एका संमेलनात सनातनी हिंदूंचे नेते ऐनापुरे शास्त्री यांनी केली आहे. त्यांनी म्हटले की, हिंदू आणि अस्पृश्यांतील संबंध असे आहेत जसे मनुष्याचा त्याच्या पायातील जोड्यांशी असतो. मनुष्य जोड़े घालतात या दृष्टीने ते मनुष्यासोबत आहेत आणि असे म्हटले जाऊ शकते की ते मनुष्याचे आहेत. परंतु ते त्याच्या शरीराचे अंग नाही.