नमो बुद्धाय - जय भीम
पुण्याजवळ भीमा नदीच्या काठी कोरेगाव या ठिकाणी ब्रिटीशांनी बांधलेला एक विजयस्तंभ आहे. या ठिकाणी १८१७ साली पेशव्यांचा इंग्रजांनी पराभव केला आणि या पराभवाबरोबरच पेशवाई नष्ट झाली. आणि पुण्याच्या शनिवारवाड्यावर ब्रिटीशांचा युनियन जॅक (झेंडा) फडकू लागला. या युद्धात ब्रिटीशांच्या बाजूने महार सैनिक लढले आणि त्यांची संख्या अगदी अल्पशी असताना देखील पेशव्यांच्या प्रचंड सैन्याचा त्यांनी पराभव केला, आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर महार सैनिकांनी ब्रिटीशांना विजय मिळवून दिला. या विजयाप्रितर्थ आणि महार सैनिकांच्या पराक्रमाचे स्मरण चिरकाल राहावे यासाठी ब्रिटीशांनी हा विजयस्तंभ बांधला, आणि त्या स्तंभावर पराक्रमी महार सैनिकांची नावे कोरून ठेवली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर या स्तंभाला दरवर्षी भेट देत असत. विशेषत: जानेवारी महिन्यात ते जात असत आणि त्या सैनिकांच्या पराक्रमाबद्दल चार शब्द बोलत असत. असेच एका वर्षीच्या तेथील भाषणात डॉ. आंबेडकर म्हणाले, ' हा विजयस्तंभ म्हणजे ब्राम्हणी सत्तेचा पराभव करून महार सैनिकांनी जो विजय मिळविला त्या विजयाचे हे एक प्रतिक आहे. महार सैनिकांच्या शौर्याचे हे प्रतिक आहे. महार सैनिक ब्रिटीशांच्या नेतृत्वाखाली इथे लढले, आणि त्यांनी बदनाम अशा पेशव्यांच्या राजवटीचा शेवट केला.'
बाबासाहेबाना याबद्दल अभिमान होता. वास्तविक हा अभिमान ब्रिटीशांना मिळालेल्या विजयापेक्षा महारानी केलेल्या पराक्रमाबद्दलच अधिक होता. डॉ. आंबेडकरांचे हे भाषण हिंदुत्ववादी गोळवरकराना चांगलेच झोंबले. तेव्हा या भाषणावर आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना गोळवरकर म्हणाले, ' डॉ. आंबेडकरांचे हे उदगार किती दुर्दैवी आणि हृदयावर आघात करणारे आहेत ? स्वकीय पेशव्यांच्या विरुद्ध आणि परकीय इंग्रजांच्या बाजूने लढणा-या महार सैनिकांच्या बाबतीत हि भाषा गुलामीची निदर्शक आहे, ती विजयाची खुण नाही. आपल्याच देशबांधावाच्या विरुद्ध लढणे हि स्वाभिमानाची किंवा विजयाची बाब नव्हे.'
डॉ. आंबेडकरांच्या विधानावर गोळवरकरांचा आक्षेप हा प्रथमदर्शनी कोणत्याही व्यक्तीस योग्य आहे असेच वाटेल यात शंका नाही. गोळवरकराना महार सैनिकांची प्रवृत्ती गुलामीची वाटते. परंतु राष्ट्रभक्त गोळवरकर गुरुजींनी एका महत्वाच्या गोष्टीकडे सोयीस्कररीत्या कानाडोळा केला आहे. या महार लोकाना या देशात गुलाम कोणी केले ? त्यांच्यातील गुलामी प्रवृत्तीला खतपाणी कोणी घातले ? पेशव्यांच्या काळात 'आम्हाला गुलाम करा, आम्हाला बहिष्कृत करां,' अशी मागणी करून महारांनी शनवारवाड्यापुढे धरणे धरल्याचा इतिहास तरी कोठे अस्तित्वात नाही. वास्तविक गोळवरकर हे चित्पावन ब्राम्हण, आणि पेशवे हे त्यांचेच ज्ञातीबांधव, तेव्हा आपल्या ज्ञातीबांधवांचे, चित्पावनांचे राज्य बुडाल्याचे दु:ख गोळवरकरांना होणे हे अपरिहार्य आणि नैसर्गिक आहे. परंतु ज्या महार- मांगाना पेशव्यांच्या काळात गावात येण्याची परवानगी नव्हती, सकाळ-संध्याकाळ फिरण्यास बंदी होती, ज्यांच्या गळ्यात थुंकण्यासाठी मडकी बांधण्यात आली होती, रस्त्यात ब्राम्हण भेटला तर आपला विटाळ होऊ नये म्हणून ज्या अस्पृश्यास पटकन खाली बसावे लागे, ज्या महारांना व मांगांना तेल-शेंदूर पाजून इमारतीच्या पायात पुरून त्यांचा बळी दिला असे, ज्या महारास त्याच्या क्षुल्लक गुन्ह्याबद्दल शिरच्छेदाची शिक्षा दिली जात असे. अशा महारांनी पेशव्यांचे राज्य हे आपलेच राज्य मानावे, अशी गोळवरकरांची इच्छा असेल, तर त्यांच्यासारखा बेजबाबदार आणि दांभिक माणूस मिळणे कठीण बरे, राष्ठनिष्ठेच्या भाषेतच जर बोलायचे झाले, तर या पेशव्यांच्या काळात त्यांनी राष्ठनिष्ठा जोपासली होती काय ? या देशातल्या हिंदुत्ववादी ब्राम्हणांची कल्पना अशी आहे कि, राष्ठनिष्ठा केवळ आपणच जोपासली. राष्ट्रावर जर कोणी खरेखुरे प्रेम केले असेल, तर ते आपणच. फुटीरवृत्ती, राष्ट्रविघातक कारवाया, अंतर्गत कलह आणि जातीयवाद यांनी सारी पेशवाई आतून पूर्णतया पोखरून गेली होती. पेशवाईंच्या काळात राघोबा दादा अनेक वेळा वसईच्या इंग्रजाना जाऊन मिळाला आणि माधवराव पेशव्यांच्या बरोबर त्याने युद्ध केले. नानासाहेब पेशव्याने आंग्रे घराण्यातील तुळाजीला नेस्तनाबूत करण्यासाठी काय केले ? तर त्याने परकीय इंग्रज आणि पोर्तुगीज यांची मदत घेऊन स्वकीय तुळाजी आंग्रे यांचे पारिपत्य घडवून आणले. राघोबा दादा आणि नानासाहेब ह्यांच्या ह्या कृती कोणत्या राष्ट्रावादात बसतात हे गोळवरकराना विचारायला हवे होते. १७६१ च्या पानिपतच्या युद्धात मल्हारराव होळकराने अंतस्तपणे फितुरी करून युद्धात जाणून-बुजून तटस्थता स्वीकारली, त्याचप्रमाणे पेशव्यांनी उत्तर भारतातील हिंदू राज्यांना अनेक वेळा चौथाई, सरदेशमुखीच्या नावावर लुटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना लुटारू समजत असत. पेशव्यांच्या विचारामध्ये राष्ट्रभक्तीच असती, तर त्यांनी आपल्याच भारतीय राज्यांना म्हणजे शीख, जाट, राजपूत, बुंदेले वगैरेना शत्रू मानून लुटले नसते, आणि त्यांच्या या प्रवृत्तीमुळेच त्याना १७६१ च्या युद्धात अब्दालीशी एकट्याने लढावे लागले.
राष्ट्रावर प्रेम केवळ महारांनी करावे आणि पेशव्यांनी मात्र राज्य करावे, फितुरी करावी, जातीनिष्ठा जोपासाव्या, अशा प्रकारच्या गोळवरकरी विचारामुळेच देशाची खरी नासाडी झाली आहे. वास्तविक हे हिंदुत्ववादी एकाच वेळी राष्ट्रनिष्ठा आणि जातीनिष्ठा जोपासू पाहणारे आहेत. यांनी राष्ट्रप्रेमापेक्षा स्वत:च्या जातीवरच अधिक प्रेम केले असा इतिहास आहे. वास्तविक गोळवरकराना जे दु:ख आहे ते स्वत:च्या ज्ञातीबांधवांचे राज्य नष्ट झाले याबद्दलचे आहे.
इंग्रजांनी आपल्या पेशव्यांचे राज्य नष्ट केले हि बाब चित्पावन ब्राम्हण लोकांच्या दृष्टीने अत्यंत दु:खाची होती. म्हणूनच इंग्रजांच्या विरुद्ध या देशातील पहिला उद्रेक झाला, तो १८५७ च्या बंडाच्या रूपाने. या बंडात महत्वाचे पुढारी कोण होते ? या पुढा-यामध्ये ब्राम्हण अधिक होते. झाशीची राणी ब्राम्हण, तात्या टोपे ब्राम्हण, नानासाहेब पेशवे ब्राम्हण आणि ब्रिटीश अधिका-यावर छावणीत पहिली गोळी झाडणारा मंगल पांडे हा देखील ब्राम्हणच. या १८५७ च्या बंडाला सावरकरांनी जे 'स्वातंत्र्यसमर' म्हणून गौरविले त्यालाही या पार्श्वभूमीवर आणि सामाजिक संदर्भांत विशिष्ट अर्थ आहे. पुढील काळात इंग्रजांच्या विरुद्ध जे लोक पुढे आले त्यामध्ये बंगाल मधील ब्राम्हण तरुण अधिक होते. महाराष्ट्रात वासुदेव बळवंत, अनंत कान्हेरे, गोगटे, चाफेकर बंधू हि सारी मंडळी राष्ट्रवादी होती, पण त्यांच्या राष्ट्रावादापेक्षा पेशव्यांचे राज्य नष्ट झाल्याचे गोळवरकराना जे दु:ख झाले त्या दु:खाशी ते अधिक समरस होते. १८५७ च्या बंडाला सामाजिक पार्श्वभूमी फार मोठी होती. मंगल पांडे वगैरे लोकाना असे वाटत होते कि, ब्राह्मणांचे समाजातील वर्चस्व नष्ट करण्यासाठी ब्रिटीश सर्व धोरणे आखीत आहेत. सैनिकी छावण्यातील सर्व जातींची समानता किंवा डलहौसीच्या रेल्वेच्या सुधारणा हे सर्व त्यासाठीच आहे असा प्रचार करण्यात आला, म्हणूनच महात्मा ज्योतीराव फुल्यांनी या बंडास 'भट-पांड्याचे बंड' असे म्हटले होते आणि म्हणूनच या बंडामध्ये ब्रिटीशांचा विजय व्हावा असे फुल्यांना मनापासून वाटत होते.
तेव्हा कोरेगावच्या युद्धात महार ब्रिटीशांच्या बाजूने लढले, यावरून आपणास त्याना गुलामी प्रवृत्तीचे लोक म्हणता येईल का ? डॉ. आंबेडकरांनी अनेक ठिकाणी सांगितले होते कि, महार लोकांनी आपल्या चरीतार्थासाठी इंग्रजांच्या सैन्यात नोक-या धरल्या होत्या. वास्तविक महार सैनिकांची सैनिक परंपरा फार मोठी आहे. त्यांचा उल्लेख अलेक्झांडर रॉबर्टसनसारख्या विद्वानांनी स्वतंत्र पुस्तके लिहून केलेला आहे. मराठी राज्यांच्या काळात त्या राज्यांसाठी महारांनी अतुल असा पराक्रम केला आहे. आपल्या प्राणाचे अनेक ठिकाणी बलिदान दिले आहे. तेव्हा गोळवरकर गुरुजींनी डॉ. आंबेडकरांच्या विधानाला जी हरकत घेतली, जो विरोध केला त्यामध्ये कितपत तथ्य आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. परकीयांशी हातमिळवनी करून स्वकियांशी द्रोह केलेल्या अनेक हिंदूंची उदाहरणे आपल्या इतिहासात आहेत. राजा अंभी, जयचंद राठोड, राजा मानसिंह, राजा जयसिंह, चंद्रराव मोरे, स्वातंत्र्यलढ्याच्या काळातले भारतीय संस्थानिक, अशी अनेक ठळक उदाहरणे देशद्रोहाचा आणि स्वकीयांचा विश्वासघात करणा-यांचा इतिहास सांगतात. परंतु पोटासाठी लढणा-या महारांचे एकच एक उदाहरण हिंदुत्ववादी लोक कोरेगावच्या लढ्याच्या संदर्भात देत असतात आणि त्यांनी देशद्रोही म्हणून बदनाम करीत असतात हि एक आश्चर्यजनक बाब आहे. महार सैनिकांना एक उज्वल परंपरा या देशाच्या इतिहासात आहे. त्यांचा मात्र हे गोळवरकर प्रवृत्तीचे लोक सोयीस्करपणे उल्लेख टाळतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून किंवा त्यांच्याही अगोदरपासून महार सैनिकांनी अनेक लढ्यात पराक्रम गाजविला आहे. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचे संरक्षण करण्याचे काम आणि त्याच बरोबर किल्ल्यावरील तोफखाने चालविण्याचे काम महार, मांग इत्यादी जमातीतील सैनिकांनी अनेक वर्षे केले आहेत. राजाराम महाराजांच्या काळात मोगलांशी प्रचंड संघर्ष करून महार सैनिकांनी वैराटगड जिंकून घेतला आणि याप्रीतर्थ महाराजांनी अनेक महाराना पाटीलकीचे वतन दिले होते. पुढे मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाच्या काळात (१६८३ ते १७०७) शिदानाक नावाच्या महाराने एक स्वतंत्र फलटण उभारून मोगालाविरुद्ध प्रचंड लढा दिला. याची बिदागी म्हणून महार सुभेदारास मिरजेजवळ कळंबी गाव इनाम म्हणून दिले. त्याचप्रमाणे शिदनाकचा नातू दुसरा शिदनाक याने १७९५ च्या खर्ड्याच्या लढाईत निजामाविरुद्ध अतुल पराक्रम गाजविला. पहिला बाजीराव आणि चिमाजी आप्पा ज्यावेळी वसईचा किल्ला लढवीत होते. त्यावेळी युद्धसामग्री आणि सैन्य समुद्राच्या पाण्यातून युद्धाच्या ठिकाणी पोहचविण्याचे अवघड आणि धाडसी काम महार सैनिकांनी केले. त्यापैकी सितामहार, फकीरा महार, बिरामहार, माणमहार, हंसामहार हे प्रमुख सैनिक होते.
दुस-या बाजीरावाच्या काळात ब्रिटीशांनी एकदा रायगडावर हल्ला केला होता, त्यावेळी रायानाक नावाच्या महार रखवालदाराने १५ दिवस किल्ला लढवून किल्ल्याचे संरक्षण केले आणि शेवटी लढता लढता तो मरण पावला. अशा अनेक उदाहरणांनी या देशाचा इतिहास भरला आहे. महार सैनिकांची देशनिष्ठा, स्वामीनिष्ठा आणि प्रामाणीकपणा हिंदुत्ववाद्यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. केवळ कोरेगावच्या लढ्याचे उदाहरण पुढे करून त्याना गुलामी प्रवृत्तीचे लोक असे म्हणता येणार नाही.
संदर्भ - डॉ. आंबेडकरांचे विरोधक
डॉ. दिनकर हेरलेकर