बुधवार, २१ जुलै, २०२१

जो तो उठला सुटला पंढरी-पैठण-आळंदीला जातो

जो तो उठला सुटला पंढरी-पैठण-आळंदीला जातो. मला आपणास हे विचारावयाचे आहे की पंढरी-पैठण-आळंदीला जाऊन आपण काय मिळविले आहे? पंढरीला जाऊन कोणाचे भले झाले आहे काय? किंवा   आळंदीला जाऊन कोणाचा उद्धार झाला आहे काय? तुम्ही एकनाथाला फार मोठे मानता. त्याने काय केले? एक भागवत ग्रंथ लिहिला पण त्याची कथा मी आज तुम्हाला सांगतो. तो मेला त्यावेळी त्याची प्रेतयात्रा एका रस्त्याने जात होती. त्याच रस्त्याने एक सासुरवाशीण एक महार सोबतीला घेऊन सासरी जावयास निघाली होती. तिने ते एकनाथाचे मढे पाहिले. हा मला अपशकून झाला असे ती महारास बोलली. हे तिचे बोलणे एकनाथाच्या मढयाने ऐकले तेव्हा एकनाथ तिरडीवर उठून बसला आणि त्या सासुरवाशीणीस बोलला "मी आज मरत नाही. कारण तुला अपशकून होत आहे" असे म्हणून तो परत घरी गेला. नंतर पुढे एकनाथ व त्याची बायको यांनी नदीत जीव दिला. त्यांनी जीव का दिला याचा अद्याप शोध लागला नाही. आता तुम्हीच सांगा, कोणाचे तरी मढे जिवंत झाल्याचे तुम्ही ऐकले किंवा पाहिले आहे काय?

दुसरे ज्ञानेश्वराने तरी काय केले? त्याने भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचे सार काय? तर जग हे ब्रम्हमय आहे. सर्व जगच जर ब्रम्ह आहे तर मग महार मांगातही ब्रम्ह असावयास पाहिजे. मग ज्ञानेश्वर महार मांगात का राहिला नाही? ब्राम्हणाने आपणास परत घ्यावे म्हणून त्याने प्रयत्न का केला? ब्राम्हणाने त्याला वाळीत टाकल्यानंतर त्याने त्यांना सांगावयास पाहिजे होते की, तुम्ही जरी मला जातीत घेतले नाही तरी हरकत नाही. मी महार-मांगात जाऊन राहीन कारण जग हे ब्रम्हमय आहे. असे ज्ञानेश्वराने का सांगितले नाही? ज्ञानेश्वरीच्या शेवटी त्यांनी चातुर्वर्ण्याचे हिरीरीने समर्थन केले. सर्वसाधारण जनतेला भुलविण्यासाठी हे सर्व थोतांड रचलेले आहे आणि या थोतांडाला तुम्ही सर्व भुललेले आहात. आजचे युग हे विचाराचे युग आहे. कोणीही कसलेही थोतांड रचले तरी ते थोतांड आहे हे तुम्हाला ओळखता आले पाहिजे. कारण यापुढे तुम्हाला जगात वागताना विचार करुनच वागले पाहिले.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग ३

अमेरिकरतील श्वेत आणि भारतातील सवर्ण यांची आरक्षणाबाबत भूमिका

अमेरिकेतील श्वेत (गोरे) लोक निगों या समुहाला आपल्या बरोबरीत आणण्याकरिता जे करु शकले ते भारतातले सवर्ण अनुसूचित जाती, जमातीच्या बाबत का करु शकले नाहीत?

भारतात एससी, एसटी करीता आरक्षण (रिझर्वेशन) आहे तसेच अमेरिकेत नीग्रोंकरीता सकारात्मक निति (अफर्मेटिव्ह पॉलिसी) आहे. सहाजिकच अमेरिकेतील श्वेत लोकांचे नीग्रोंबाबतचे धोरण सकारात्मक असल्यामुळे आज नीग्रो अमेरिकेतील सर्व क्षेत्रात श्वेत लोकांच्या जवळपास पोहचले आहे. आणि महत्वाचे म्हणजे अमेरिकेतील श्वेत लोकांना आम्ही हे करुन दाखविले याचा सार्थ अभिमान सुद्धा आहे.

याउलट भारतात एससी, एसटी करीता आरक्षण आहे परंतु हे धोरण राबविणा-या सवर्णांचे धोरण मात्र सकारात्मक नाही. तुम्हाला कोल्हा आणि करकोचा ही गोष्ट माहीत असेलच. त्यात जसा एक दिवस कोल्हा करकोचाला खीर खाण्यास आमंत्रण देतो. करकोचा तिथे जाऊन बघतो तर एका सपाट ताटात कोल्ह्याने करकोचाला खीर दिलेली असते. कोल्हा म्हणतो, 'करकोचराव पोटभर खा. तेवढं संपवा आणखी देतो.' करकोचाच्या पोटात किती खीर जाते आणि तो कसा उपाशी राहतो ही गोष्ट पुढे सांगण्याची गरज आहे असे वाटत नाही.

सवर्णांनी एससी, एसटीला दिलेलं आरक्षण म्हणजे कोल्ह्यने करकोचाला दिलेली खीर आहे. कधी नॉट अव्हेलेबल नॉट सूटेबल, कधी रोष्टर, कधी एकल पद, कधी जाहिरतीत घोळ, कधी तीन वर्षे एससी, एसटी ची जागा न भरणे व शेवटी ती मग ओपन मधून भरणे. आणि शेवटचा उपाय म्हणजे खाजगीकरण.

भारतात एससी, एसटी च्या पोष्ट भराव्या लागू नये म्हणून सवर्ण सत्ताधा-यांकडून अशी षडयंत्रे करण्यात येतात. जर स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासूनच प्रत्येक विभागात एससी, एसटी चे किती पदे भरावयास पाहीजे होती आणि भरलीत याचा डेटा काढला तर करकोचाला जेवढं मिळालं तेवढच एससी आणि एसटी ला मिळालयं हे दिसून येईल.

एवढे षडयंत्र करूनही सवर्णांना त्याची लाज वाटतेय असे मुळीच नाही उलट सत्तर वर्षापासून खात आहेत पण यांचं पोट काही भरतच नाही, हे बोल आहेतच. आणि महत्वाचे म्हणजे आपल्या देशात एससी एसटी ची उन्नती होत असेल तर सवर्णांच्या पोटात दुखतयं हे सुद्धा खरं आहे