६ जून १९५० रोजी वाय. एम. बी. ए . कोलंबोद्वारा आयोजित 'विश्व बौद्ध भातृत्व संमेलनात ' डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले भाषण.
ज्या परिस्थितिने बौद्ध धर्माला जन्म दिला ती आपण समजून घेतली तरच आपणाला बौद्ध धर्माचे वास्तविक महत्व कळू शकेल. भारताचा धर्म नेहमीसाठी हिंदू धर्म होता, हे मत मला मान्य नाही. हिंदू धर्म तर सर्वात शेवटी विचारांची उत्क्रांती होत असताना उदयास आला. वैदिक धर्माच्या प्रचारानंतर भारतात तीन वेळा धार्मिक परिवर्तन घडून आले आहे. वैदिक धर्माचे रूपांतर ब्राम्हण धर्मामध्ये झाले आणि ब्राम्हण धर्माचे रूपांतर हिंदू धर्मामध्ये झाले. बौद्ध धर्माचा समाजाचे विविध वर्णामध्ये विभाजन होण्यास विरोध होता. या चातुर्वर्ण्याची सुरुवात ब्राम्हण धर्माने केली होती. फ्रान्सकारिता फ्रान्सची राज्यक्रांती जेवढी महत्वाची आहे तितकाच् मानव जातिसाठी बौद्ध धर्माचा उदयही महत्वाचा आहे.
वैदिक शिकवणीनुसार आचरण करणे सोपे आहे. वैदिक लोक मुख्यता यज्ञपुजक होते. वैदिक आर्याची जवळजवळ तेहत्तीस कोटी आराध्य देवते होती असे सांगण्यात येते. ते आपल्या या देवतांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ करीत असत. या देवतांच्या पुजेसाठी गोळा करण्यात येणारी सामग्री अत्यंत श्रेष्ठ दर्जाची असणे आवश्यक होते. कृषि युगातील या आर्याना गो-धन हे सर्वश्रेष्ठ धन वाटत होते. म्हणून ते आपल्या देवतांची पूजा गाईचा यज्ञात बळी देऊनच करीत असत. यामुळे वैदिक धर्म हा हिंसेला प्रोत्साहन देणारा ठरला होता. यज्ञामध्ये असंख्य पशूंचा बळी देण्यात येत होता आणि जे पशु यज्ञात बळी देण्यात येत असत त्यांना स्वर्गप्राप्ती होते अशी याजकांची श्रद्धा होती. "वैदिक हिंसा, हिंसा न भवति" अर्थात वैदिक यज्ञात झालेली हिंसा हिंसा नव्हे.
यज्ञामध्ये सर्रास प्राणिहत्येचा प्रचार होत असल्यामुळे ज्या ज्या प्राण्याचे मांस खाण्यास योग्य होते अश्या बक-या, मेंढ्या, गाई यासारख्या प्राण्यांचा बहुधा यज्ञात बळी देण्यात येत असे. यज्ञाचा प्रचार वाढल्यामुळे पुरोहिताचे महत्व वाढले आणि ब्राम्हणवादाचा उदय झाला. या ब्राम्हणवादाने समाजाचे ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र अश्या चार वर्णामध्ये विभाजन केले. चार वर्णाची स्थापना करुन समाजात विषमता निर्माण करणे ब्राम्हणवादाचा मुख्य हेतु होता. कारण त्याशिवाय ब्राम्हणांचे प्रभुत्व स्थापन करणे संभावनिय नव्हते. आपल्या श्रेष्ठतवाच्या प्रस्थापनेसाठी ब्राम्हणांनी काही मंत्रांची रचना केली आणि त्या मंत्रांद्वारे ते ब्राम्हणांची उत्पत्ती ब्रम्हाच्या मुखातून, क्षत्रियांची बाहुतून, वैश्याची मांडयातून व शूद्रांची उत्पत्ती ब्रम्हाच्या पायातून झाली, असा प्रचार करु लागले. यामुळे ब्राम्हण सर्व वर्णाचे गुरु व सर्वश्रेष्ठ आहेत, असे त्यांचे सांगणे होते. परंतु भगवान बुद्धानी याचे खंडन केले. ते म्हणतात, जशी सर्व माणसे उत्पन्न होतात तसेच ब्राम्हण होतात.ब्राम्हणांच्या स्त्रीया ऋतुमती होतात. गर्भवती होतात. नऊ मासपर्यंत गर्भपोषण करतात. प्रसूत होतात. मुलाला स्तनपान करतात. असेच सर्वत्र दिसून येते. अश्या स्थितीत ब्राम्हण ब्रम्हाच्या मुखातून निघाले व शुद्र त्याच्या पायातून निघाले, असे ते म्हणू तरी कसे शकतात? जन्माने कोणीही शुद्र वा ब्राम्हण होत नाही. तर माणूस करणीमुळे ब्राम्हण किंवा शुद्र ठरतो.
यापुढे भगवंत म्हणाले "जटा, दाढ़ी, गोत्र किंवा जन्मामुळे कोणीही ब्राम्हण होत नाही. जो सत्यानुसार व धर्मानुसार आचरण करतो, जो काया-वाचा-मनाने कोणतेही पाप करीत नाही, जो काम-क्रोधरहित आहे, जो व्रती, शीलवान, अनुत्सुक, दांत आणि जितेन्द्रिय आहे, जो तृष्णारहित व संशयरहित आहे, जो राग-द्वेष मदविहीन आहे, जो शोकरहित, निर्मल व शुद्ध आहे, ज्याने भवचक्रात लोटण्यास कारणीभूत होणा-या मोहाचा त्याग केला आहे, ज्याने रती व अरतीचा त्याग केलेला असून त्यामुळे जो शांतचित्त आहे, जो गंभीर, प्रज्ञावंत, मेधावी, मार्ग-अमार्गाचा ज्ञाता आहे आणि जो सर्वोत्तम अशा निर्वाणाचा अधिकारी आहे त्यालाच मी ब्राम्हण म्हणू शकतो.
तुम्ही विचार करा की जो धर्म मानव जातीच्या कल्याणासाठी साह्यकारी होऊ शकतो, ज्यात मनुष्याच्या मुक्तीचे द्वार खुले आहे, आणि ज्यात मानवामानवात भेदभाव नसून समता आहे तो धर्म, धर्म या संज्ञेस पात्र ठरू शकतो. ज्या धर्माचे मूलतत्व मानवामानवात भेद निर्माण करणे हेच आहे तो धर्म 'सदधम्म' म्हणण्याच्या लायकीचा नाही. ब्राम्हण धर्माने मानव समाजात भेदाच्या द-या निर्माण केल्या. त्याने स्त्रियांच्या व शूद्रांच्या बाबतीत अत्यंत घृणास्पद व्यवहार करण्याची शिकवण दिली. भगवान बुद्धाच्या धर्माचा प्रधान हेतु मानवीं समता हा आहे. आपल्या बुद्धीच्या कसोटीवर घासुन प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करण्याचे किंवा अस्वीकार करण्याचे स्वातंत्र्य या धर्मात आहे. हिंसेचा उच्छेद आणि अहिंसेचे प्रस्थापन हे त्याचे एक प्रमुख अंग आहे. कोणत्याही प्राण्याची एखाद्या देवतेच्या नावावर हिंसा करणे किंवा त्याचा बळी देणे आणि पुन्हा निर्लज्जपणे असे प्रतिपादन करणे की 'त्याला स्वर्ग मिळाला' असे बौद्ध धर्माने सांगितले नाही.
बौद्ध धर्माच्या उदयापूर्वी एखादा शुद्र राजा होऊ शकेल ही कल्पनाही करता येण्यासारखी नव्हती. परंतु भारतीय इतिहासाच्या तज्ञाना हे माहीत आहे की बौद्धधर्माच्या प्रादुर्भावानंतर शुद्रानाही सिंहासनासनावर बसण्याची संधी प्राप्त झाली आणि देशात सामाजिक समतेची स्थिति निर्माण झाली. गणतंत्रीय राज्यपद्धती ही बौद्ध कळाचीच देणगी आहे. भगवान बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर इ. स. २७४ पर्यंत बौद्धधर्माची स्थिति कशी होती हे जाणून घेण्याची पर्याप्त साधने उपलब्ध नाहीत. तथापि अशोकाच्या काळात बौद्धधर्माचा प्रसार विजेच्या गतीने झाला. अशोक आणि चंद्रगुप्तासारखे बलाढ्य सम्राट बौद्ध काळातच झाले आहेत व यांनीच भारताबाहेरील राज्यांशी मैत्रीचे संबंध स्थापित केले होते. बौद्ध काळात भारतामध्ये स्थापत्यकला, चित्रकला, मूर्तिकला इत्यादि नानाप्रकारच्या कलांचा विकास झाला. बौद्ध काळात साहित्य आणि तत्वज्ञानाची इतकी भरभराट झाली होती की अनेक देशातील विद्यार्थी येथील नालंदा व तक्षशिला विश्वविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी दाखल झाले. त्यापूर्वी कधीही असा गौरव भारताला प्राप्त झाला नव्हता.
प्रश्न असा निर्माण होतो की, जो धर्म इतका श्रेष्ठ होता व ज्याचा प्रसार इतका झाला होता त्याचा भारतातून लोप कसा झाला? या प्रश्नांची उत्तरे अनेक असली तरी त्याबद्दल मी सम्राट अशोकाला जबाबदार समजतो. अशोक वाजवीपेक्षा जास्त सहनशील होता. यामुळे मी त्याला दोष देत आहे. सम्राट अशोकाने आपल्या कारकिर्दीत बौद्धधर्माशिवाय अशा अनेक धर्माना प्रचाराची मुभा देऊन ठेवली होती की जे बौद्ध धर्माचे कट्टर दुष्मन होते. यामुळे बौद्ध धर्माच्या विरुद्ध असणा-या अधर्माना आपली शक्ति वाढविण्याची पुरेपूर संघी प्राप्त झाली व हाच बौद्ध धर्माला पहिला आघात होय, असे मला वाटते.
बौद्ध ग्रंथावरुन असे दिसून येते की, भगवान बुद्धाच्या श्रमण शिष्यामध्ये जवळ जवळ शेकडा ६० ब्राम्हण होते. ब्राम्हण लोक भगवान बुद्धाशी वादविवाद करण्यासाठी त्यांच्याकडे येत असत व वादविवादात निरुत्तर झाल्यामुळे प्रभावित होऊन सहर्ष त्यांच्या धर्माची दीक्षा घेऊन भगवान बुद्धाबद्दल श्रद्धा बाळगीत असत. या श्रमण शिष्यामुळे भगवान बुद्धाचा व त्यांच्या धर्माचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत होता. परंतु बौद्ध धर्मात जातिभेद नसल्यामुळे क्रमशः जेव्हा खालच्या जातीतिल लोक बुद्धाला शरणागत होऊन सिद्ध भिक्षु बनू लागले व धनिकांद्वारा व राजांद्वारा त्यांची पूजा व सत्कार होऊ लागला तेव्हा ही गोष्ट ब्राम्हणाना सहन झाली नाही व ते बौद्ध धर्माचा उच्छेद करण्याच्या मार्गाला लागले.
भारतात प्राचीन काळापासून ज्याप्रमाणे ग्राम-देवता, वन-देवी, नद-नदी-देवी इत्यादी देवता होत्या व त्यांची पूजा होत होती, त्याप्रमानेच कुलदेवताही होत्या. राजेलोक व धनिकांच्या कुलदेवतांची पूजा बहुधा ब्राम्हणांद्वारे होत असे. त्यामुळे राजमहालामध्ये कुलदेवतेच्या पुजेसाठी जाणारे ब्राम्हण राणीच्या मध्यस्थीने राज्य शासनावर आपला प्रभाव चालवित असत. या प्रभावाचा उपयोग करून त्यांच्या निरंतर वर्चस्वाला बाधक होणा-या बौद्ध धर्माची पाळेमुळे खणुन काढण्याचा ते प्रयत्न करीत. सम्राट अशोकाच्या काळात या कुलदेवतापूजेची निंदा करण्यात आली. अशोक म्हणतो : "मी बौद्ध धर्माच्या मार्गाचे अनुसरण करीत असल्यामुळे मला दुस-या कोणत्याही देवी देवतांची पूजा करण्याची गरज नाही." आणि त्याने आपल्या प्रशासनाधिका-यांना आदेश देऊन कुलदेवतांच्या मूर्ति काढून टाकल्या. हा ब्राम्हणांवर फार मोठा प्रहार होता. कारण यामुळे त्यांच्या उपजीविकेला व धूर्त प्रचाराला फार मोठा धक्का बसला आणि ते त्याचा बदला घेण्यास सिद्ध झाले. ब्राम्हण पुरोहितांची पूर्वी अशी धारणा होती की सर्व राजेलोक मेल्यानंतर नरकात जातात. कारण राज्य शासन चालविताना त्यांना पुष्कळशी पापकृत्ये करावी लागतात. यामुळे तशी संधी प्राप्त झाली तरीही ब्राम्हण लोक राज्यकारभार आपल्या शिरावर घेण्यास तयार नव्हते. मात्र राजसिंहासनावर बसण्यास ते तयार नसले तरी मंत्री किंवा पुरोहित म्हणून राजाला सल्ला देण्याचे कार्य करीत असत. त्याचप्रमाणे कायदे कानून तयार करीत होते. परंतु कुलदेवतेची पूजा बंद झाल्यामुळे त्यांची जेव्हा खुप हानी झाली तेव्हा राज्य शासन न चालविण्याच्या आपल्या सिद्धांताचा त्याग करुन ते राज्यावर व सिंहासनावर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नाला लागले. अशात-हेच्या अगणित घटना भारतीय वांगमयात सापडतात. काही ठिकाणी असेही आढळून येते की जेथे स्वतःच्या बळावर राज्य करणे अशक्य होते, तेथे त्यांना धार्जीणे असलेल्या क्षत्रियाना हाताशी धरून किंवा त्यांना समोर करुन म्हणजे त्याला आपल्या हातातील बाहुले बनवून राज्यकारभार ते करीत असत. अशाप्रकारे पुन्हा ब्राम्हणवादाने जोर पकडल्यामुळे बौद्ध धर्मावर आघात झाला आणि भारतातून त्याचा लोप होण्यास तो कारणीभूत ठरला.
ब्राम्हणी शासनाधिकाराची एक फार मोठी घटना मौर्य साम्राज्याचे परिवर्तन घडून येण्यामध्ये दिसून येते. भारतीय इतिहासकारानी या महान घटनेला महत्व दिले नाही. ही फार दुःखाची गोष्ट आहे. अंतिम मौर्य सम्राट महाराज बृहदथाचा सेनापती पुष्यमित्र नावाचा एक ब्राम्हण होता. याचा गुरु पतंजली हा होय. पतंजलीने योग विद्या बौद्धांपासूनच मिळविली होती. परंतु नंतर हा बौद्धांचा शत्रु बनला. याच्या सल्ल्यानुसार सेनापती शृंगवंशिय पुष्यामित्राने बृहद्रथाला ठार मारले व मौर्यवंशाच्या बदलीत आपल्या शृंगवंशाच्या नावाने ब्राम्हणी राज्य चालविले.
या ब्राम्हणी राज्याने बौद्ध धर्माला अपरिमित नुकसान पोहचविले. ब्राम्हणी धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी करण्यात आलेल्या कृत्यातील हे सर्वात दारुण कृत्य असून बौद्ध धर्माचा भारतातून लोप होण्यास कारणीभूत ठरलेली ही फार मोठी ऐतिहासिक घटना होय.
भारतातून बौद्ध धर्माचा लोप होण्यास विदेशी आक्रमणेही कारणीभूत ठरली, असे मानण्यात येते. परंतु यूनानी लोकांच्या आक्रमणामुळे बौद्ध धर्माला झड़ पोहचली नाही. याउलट त्यांनी बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी द्रव्य सहाय्य केल्याचेही पुरावे इतिहासात आढळतात. गुप्तकाळात भारतावर हुणांची आक्रमणे झाली परंतु गुप्त राजांकडून पराभूत झाल्यामुळे ते भारतातच स्थायिक झाले. यांच्याकडूनही बौद्ध धर्माला झड़ पोहचली नाही. याउलट पेशावर येथील शक राजा कनिष्क याने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. त्याने तक्षशिला येथे एक विशाल बौद्ध विश्वविद्यालय उघडले होते आणि बौद्धांची चौथी धर्म-संगीती भरविली होती. या धर्मसंगीतीतच महायान मार्गाचा उदय झाला व बौद्ध साहित्य सुधारित संस्कृतमध्ये लिहिल्या जाऊ लागले. विदेशी आक्रमकांपैकी मुसलमानांद्वारा बौद्ध धर्माला अधिक झड़ पोहोचली. मुसलमान लोक प्रतिमा व मुर्तीचे विरोधी होते. त्यांनी बुद्धांच्या मूर्तिंची तोड़फोड़ केली व भिक्षुना ठार मारले. त्यांनी नालंदाच्या विशाल बौद्ध विश्वविद्यालयाला सैनिकी किल्ला समजून व चिवरधारी भिक्षुना सैनिक समजून त्यांचा संहार केला. जे भिक्षु त्या भीषण रक्तपातातून वाचले ते नेपाल, तिबेट, चीन इत्यादि देशात पळून गेले.
नालंदा येथील विशाल ग्रंथालयात ताड़पत्र व भोजपत्रावर लिहिलेले सुमारे दोन लाख ग्रंथ होते; व त्यात हजारो वर्षाचे ज्ञान साठविलेले होते. त्यांना बख्तियार खिलजीने आग लावून दिली आणि तेथे शिकत असलेल्या सहा हजार विद्यार्थ्यांपैकी काहींना ठार मारले व काहींना जबरदस्तीने मुसलमान करुन सोडले. मुसलमानी आक्रमक जेथे जेथे गेले तेथे तेथे त्यांनी बौद्धाना ठार तरी मारले किंवा मुसलमान तरी बनविले आणि बौद्ध मूर्तिंची तोड़फोड़ केली, ग्रंथालये जाळली व विहार नष्ट केले. माझे काही हिंदू मित्र मला विचारतात की मुसलमान आक्रमकानी हिंदू मूर्ती हिंदू मंदिरांचीही नासधुस केली आहे ना? यावर माझे उत्तर असे की, जितकी बौद्ध धर्माची नासधुस त्यांनी केली तितकी हिंदू धर्माची केली नाही. याचे कारण असे की, बहुधा सर्वच ब्राम्हण गृहस्थ होते आणि ते आपल्या परिवारासह आपल्या घरीच राहत असल्यामुळे त्यांना ओळखण्याची वेगळी अशी खूण नव्हती. परंतु बौद्ध भिक्षु मात्र कुटुंबविरहित, चिवरधारी आणि विहारात राहत असत आणि त्यांना सहज ओळखता येत होते. त्यामुळे हिंदुंची प्रसिद्द मंदिरे जरी मुसलमानांनी फोडली असली तरी त्यांच्या धर्मगुरुना व पुरोहिताना हानी पोहचली नाही.
कोणताही धर्म जिवंत राहण्यासाठी त्यातील धर्मगुरु व पुरोहित कायम राहणे आवश्यक असते. बौद्ध धर्माचा लोप होण्याचे विशेष कारण म्हणजे बौद्धभिक्षुचा अभाव निर्माण झाला होता. बौद्ध भिक्षुची कोणतीही जात नव्हती. कोणीही व्यक्ति बौद्ध धर्माला शरण जाऊन उपासक श्रामनेर, भिक्षु किंवा स्थविर-महास्थविर होऊ शकत होता. भिक्षु लोक समाजापासून दूर विहारात राहत असत. ब्राम्हणवादामध्ये ही बाब नव्हती. तेथे केवळ ब्राम्हणांच्या घरी जन्म होण्यामुळेच नविन ब्राम्हण्य निर्माण होत असे. या कारणांमुळे हिंदुंची विशेष हानी झाली नाही. नंतरच्या काळात मागासवर्गीय लोकांना भिक्षु बनवून बौद्धांची परंपरा कायम राखण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु चांगल्यप्रकारे शिक्षित नसल्यामुळे हे भिक्षु ब्राम्हणांच्या युक्तिवादाला उत्तर देऊ शकले नाहीत व त्यामुळे त्यांची हार झाली.
दरम्यानच्या काळात शैव योग्यानी शैव धर्माचा व ब्राम्हणांनी वैष्णव धर्माचा प्रचार केला. वैष्णव आणि शैवामध्ये जोरदार संघर्ष झाला. शेवटी ब्राम्हणांनी शैवाना 'रूद्र' बनवून आपणामध्ये सामील करुन घेतले व शैव आणि वैष्णव यांचे ऐक्य झाले. सध्याच्या काळात हिंदू धर्म पुष्कळच परिवर्तित झाला आहे. पूर्वी तो हिंसेची शिकवण देत होता परंतु आता तो अहिंसेची शिकवण देतो. बौद्ध धर्मातील अनेक तत्वे हिंदू धर्माने आत्मसात केली. प्रतिमा, चैत्य, विहार आणि भिक्षु इत्यादि दृष्टीने आज भारताला बौद्ध धर्म नसला तरी तात्विक रूपाने अजूनही तो भारतभर पसरलेला आहे.
संदर्भ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग ३, पेज नं. २०६,२०७,२०८,२०९,२१०,२११,२१२