सोमवार, १४ जून, २०२१

भारतातील सवर्णांची मानसिकता

भारतातील सवर्णांची मानसिकता विशेषत: अमेरिकेमध्ये अश्वेत लोकांच्या अधिकारासाठी होणा-या संघर्षामध्ये श्वेत लोकांचा मोठ्या प्रमाणात असणारा सहभाग ही काही नवीन गोष्ट नाही. १९ व्या शतकामध्ये अमेरिकेच्या दक्षिणी प्रांतांत मानवी गुलामगीरीची प्रथा समाप्त करण्यासाठी झालेल्या नागरी युद्धामध्ये श्वेत सैनिकच लढले होते आणि १० लाखापेक्षा जास्त श्वेत सैनिक त्यात मारले गेले होते. याचाच अर्थ अश्वेत लोकांना गुलामगिरीतुन मुक्त करण्यासाठी श्वेत लोकांनी आपल्या प्राणांची आहुति दिली होती. अमेरिकेतील श्वेत लोक अश्वेत लोकांच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुति देत आहेत या गोष्टीचा प्रभाव भारतात महात्मा ज्योतिराव फुल्यांवर पडला. ज्योतिबांच्या लक्षात आले की भारतात शूद्रांची स्थिति अमेरिकेतील गुलामांसारखीच आहे. त्यांनी आपला 'गुलामगिरी' हा ग्रंथ अमेरिकेतील त्या चांगल्या श्वेत लोकांना समर्पित केला जे तेथील मानवी गुलामगिरी प्रथेच्या विरुद्ध लढत होते. अमेरिकेत वर्णभेद संपला नाही तो लढा पुढे सुद्धा सुरु राहिला. अश्वेत लोकांचा मताधिकार, नागरी अधिकारांचा लढा ब-याच काळ चालला. या सर्व लढ्यात तेथील श्वेत लोक मोठ्या प्रमाणात होते. श्वेत लोकांचा अश्वेतांच्या लढ्यातील हा सहभाग आजसुद्धा दिसुन येत आहे. प्रश्न हा निर्माण होतो की सवर्ण उच्चजातीत जन्म घेतलेले लोक भारतात होणारे जातीय अत्याचार आणि भेदभाव याविरुद्ध होणा-या संघर्षात सामील होतील? जातिमुक्त भारत निर्माण करण्यासाठी सामोर येतील आणि त्यासाठी त्यांना मिळणारे विशेष अधिकार त्यागण्यास तयार होतील? भारतातील काही उच्चजातीय सवर्ण सेलेब्रिटी आणि बुद्धिजीवी अमेरिकेतील अश्वेत लोकांसाठी न्याय मागत आहेत. दिशा पाटनी, प्रियंका चोपड़ा पासून गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सुद्धा #BlackLivesMatter साठी सहभाग नोंदवला आहे. परंतु त्यांच्याकडून आणि इतर उच्चजातीय सवर्णांकडून ही अपेक्षा करु शकतो का की जेंव्हा भारतात जातीय द्वेषातून एखाद्या दलित महिलेची हत्या किंवा बलात्कार केला जातो, किंवा विद्यापीठात एखाद्या शिक्षकाकडून होणारा जातीय भेदभाव या कारणामुळे एखाद्या दलित किंवा मागासवर्गीय विद्यार्थ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते, त्यावेळेस ते पिडितांचा पक्ष घेतील? काय भारतातील उच्चजातीय सवर्णामध्ये अशाप्रकारचे प्रगतिशील आणि उदार लोक असतील? उच्चजातीय सवर्णांमधून असे लोक शोधून काढणे सोपी गोष्ट नाही. १. महाराष्ट्रातील खैरलांजी येथे २००६ मध्ये एका दलित कुटुंबावर बलात्कार करुन संपूर्ण गावासमोर त्यांची हत्या करण्यात आली. त्यावेळेस झालेल्या आंदोलनात फ़क्त दलितांचाच सहभाग होता. २. हैद्राबाद केंद्रीय विद्यापीठातील रोहित वेमुलाची संस्थानिक हत्या असो किंवा मुंबई मध्ये डॉ. पायल तडवी ने जातीय अत्याचारामुळे केलेली आत्महत्या असो किंवा गुजरातेत ऊना येथे दलितांना झालेली मारहाण असो किंवा गाई वरून दलितांची केलेली मॉबलिंचिंग, या सर्व प्रकरणात फ़क्त दलितांनाच आंदोलन करावे लागले. ३. हरियाणामधील भगाना येथे जातीय अत्याचाराच्या विरुद्ध भगाना गावातील लोक जवळपास एक वर्ष दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलनासाठी बसलेले होते, परंतु कुठल्याही सवर्ण नेत्याला किंवा सवर्ण वर्चस्व असलेल्या मिडियाला हा मुद्दा महत्वाचा वाटला नाही. ४. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने जेव्हा अट्रोसिटी कायदा दुबळा करण्यात आला होता त्याविरुद्ध दलितांनी मोठे आंदोलन केले होते. त्यावेळेस १२ लोक मृत्युमुखी पडले होते आणि ते सर्वच दलित होते. ५. दलितांना आरक्षणाचा लाभ मिळू नये यासाठी सवर्ण उच्चजातीकडून वेगवेगळ्या पातळयांवर सातत्याने प्रयत्न केले जातात. आरक्षणासाठीचा लढा नेहमीच फ़क्त अनुसूचित जाती, जनजाती आणि त्यांच्या संघटनेकडूनच लढले जातात. ६. बहुसंख्य सवर्ण उच्चजाती आरक्षण आणि दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांच्या सबलिकरणाचा विरोध करतात. परंतु जेव्हा केंद्र सरकारने सवर्णांना आर्थिक आधारावर १०% आरक्षण दिले, त्यावेळी तेच सवर्ण फ़क्त चुप बसले नाहीत तर अनेकांनी त्याचे समर्थन केले. सरकारच्या या प्रयत्नाने आरक्षणाच्या बाबतीत समाजाच्या प्रत्येक समुहाला प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे संविधानाचा हा उद्देशच दुबळा झाला. ७. भारतातील कित्येक सवर्ण बुद्धिजीवींनी जातीच्या प्रश्नाचा अभ्यास केला. अनेकांनी कित्येक पुस्तके लिहिली. परंतु एकाही सवर्ण बुद्धिजीवी व्यक्तिने जनगणना करताना जातीय आकडेवारी गोळा केली जावी ही मागणी केली नाही. त्यांचे जातीविषयी सर्व निष्कर्ष आकडेवारीशिवाय असतात. आपल्याच देशातील आणि बहुतांश आपल्याच हिंदू धर्मातील अनुसूचित जाती, जनजाती यांच्यावर होणा-या जातीय अत्याचारविरुद्ध, त्यांच्या न्याय्य अधिकारासाठी होणा-या लढ्यात सवर्ण उच्चजातींचा सहभाग का नसतो? सवर्णांच्या ह्या मानसिकतेचे कारण काय? याचे संभवतः दोन कारणे असू शकतात. १. अमेरिकेत अश्वेत लोकांची संख्या फार कमी आहे. ती अमेरिकेतील एकूण लोकसंख्येच्या १४% पेक्षाही कमी आहे. याचाच अर्थ येणा-या कित्येक शतकात अमेरिकी लोकसंख्येत श्वेत लोकांचे प्रमाणच जास्त राहणार आहेत. यामुळे तेथील श्वेत लोकांना वाटते की आपले काही विशेषाधिकार सोडून दिले तरी त्यांच्या वर्चस्वावर फार काही फरक पडणार नाही. याउलट भारतात हिंदू सवर्णांची संख्या कमी आहे. दलित, आदिवासी आणि मागास जतींच्या तुलनेत त्यांची लोकसंख्या फार कमी आहे. परंतु त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत त्यांच्याकडे असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती आणि सत्ता मोठ्या प्रमाणात आहे. ही साधनसंपत्ती त्यांनी धर्माच्या आधारे इतरांना गुलामित ठेवून, त्यांचे हक्क आणि अधिकार नाकारून जमा केलेली आहे. जर ते उदार झाले तर त्यांचे वर्चस्व कमी होईल ही भीती त्यांना वाटते. त्यामुळेच अनुसूचित जाती, जनजाती आणि अन्य मागास जाती यांचा उत्कर्ष त्यांना बघवला जात नाही. २. सामाजिक सुधारणेची सवर्णांना एवढी भीती का वाटते याचे काय कारण आहे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आले होते. आपला प्रसिद्ध ग्रंथ 'शुद्र पूर्वी कोण होते?' मध्ये ते विचारतात की, ब्राम्हणांमध्ये 'वोल्टेअर' सारखा व्यक्ति का होऊ शकत नाही, जो कॅथेलीक असून सुद्धा कॅथेलीक चर्चच्या सत्तेच्या विरुद्ध लढला. याचे उत्तर देतांना बाबासाहेब लिहितात की या प्रश्नाचे उत्तर प्रतिप्रश्न करुनच दिले जाऊ शकते. जसे तुर्किचे सुलतान इस्लाम जगतातील प्रचलित धर्म का समाप्त करु शकत नाही, किंवा पोप कॅथेलीक विचारसरणीचा विरोध का करत नाहीत? या प्रश्नाचे उत्तर देतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, कोणतीही व्यक्ति किंवा समूह यांचा स्वार्थ त्यांच्या बुद्धीला नियंत्रित करीत असतो. भारतातील सवर्णांना माहीत आहे की त्यांचा स्वार्थ कशात आहे आणि म्हणूनच ते त्याचे रक्षण करतात. ( दिलीप मंडल यांच्या दिप्रिंट मधील लेखावरून)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: