शनिवार, १२ जून, २०२१
गांधीवाद - १
अहिंसा
सिद्धार्थाने गृहत्याग का केला?
भारतातील सवर्णांची आरक्षणाबाबत निति सकारात्मक नाही
काँग्रेसच्या काळात अंधश्रद्धा नव्हती हे म्हणणं चुकीचं
मा. गांधींचे तर्क
जातीयवाद्यांनी मनुस्मृती वाचण्याची काहीच गरज नाही
तुम्हालाही असे जातीयवादी लोक कधी ना कधी, कुठे ना कुठे भेटले असतीलच जे जातीयवाद करतात परंतु साधुत्वाचा आव आणून, तुमच्यापेक्षा वयाने किंवा पदाने मोठे असतील तर पाठीवर अगदी प्रेमाने हात ठेवून तुम्हाला म्हणतात, 'अरे भाऊ, आम्ही आतापर्यंत मनुस्मृती कधी वाचली सुद्धा नाही. मनुस्मृती कशी आहे, त्यात काय आहे आम्हाला माहीत सुद्धा नाही. आमच्यापेक्षा तुम्हीच मनुस्मृती जास्त वाचली आहे. तुम्ही लोकच नेहमी मनुस्मृती मनुस्मृती ओरडत असता.' परंतु अशा तर्काला देता येईल असे उत्तर डॉ. आंबेडकरांनी आधीच देऊन ठेवले आहे. उत्तर बरच मोठं आहे. परंतु त्याचा सारांश पुढील प्रमाणे आहे. त्यांचं म्हणणं होतं की, 'भलेही आज कुठल्या न्यायालयात मनुस्मृतीच्या कायद्याचा वापर केला जात नसेल, कायदा म्हणून मान्यता नसेल परंतु प्रथेच्या रुपात मनुस्मृती आजही अस्तित्वात आहे. मनूची धर्म व्यवस्था हिंदूंच्या प्रथा आणि परंपरांचा अनिवार्य अंग बनलेली आहे. ती हिंदूंच्या रक्तात समावल्या गेलेली आहे. भलेही ती प्रथा असेल परंतु आजही तिचे महत्त्व कमी झालेले नाही. पिढ्यानपिढ्या ती हिंदूंच्या चारित्र्यावर प्रभाव टाकत असून त्यांच्या दृष्टीकोणाची दिशा निर्धारित करीत आहे. पंडित आई-वडिलांना आणि आई-वडील आपल्या मुलांना याचा उपदेश करीत असतील तर मनुस्मृती कशी संपणार? मनुस्मृतीच्या मुळाना रोज पाणी घातले जात आहे आणि प्रत्येकाला ही आठवण करुन दिली जात आहे की अस्पृश्यता हा त्यांच्या धर्माचा भाग आहे. मनुच्या धर्माची ही विषारी लागण पुरुष असो वा स्त्री, लहान मूल असो वा वृद्ध प्रत्येकाच्या मनाला झालेली आहे. एवढेच नाही तर न्यायाधीशांच्या मनाला सुद्धा याची लागण झालेली आहे.' याचा अर्थ असा होतो की आज जातीयवाद करण्यासाठी मनुस्मृती वाचलीच पाहीजे याची काहीही गरज नाही. शेकडो वर्षापासून चालत आलेल्या प्रथा, परंपरा या माध्यमातून अनेक गोष्टींची शिकवण मिळत असते. प्रत्येक प्रथा, परंपरा कशी पाळायची यासाठी प्रथम धर्मग्रंथ वाचलाच पाहीजे याची काही गरज पडत नाही. एखादा पुल पडला की, 'आरक्षण वाले इंजीनियर पुल बनवतील तर असेच होणार' असे म्हणणारे तुम्हाला कित्येक भेटले असतील. ही कुठली वृत्ती आहे? यातच जातीयवाद सामावलेला आहे. मनुस्मृती वाचणाराच असे बोलतो असे नाही. असे बोलण्यासाठी मनुस्मृती वाचण्याची गरज त्यांना कधीच पडली नाही. आजपर्यंत जेवढे पुल पडलेत त्यापैकी किती पुलाच्या बांधकामाचं कॉन्ट्रैक्ट आरक्षण वाल्यांना मिळालयं? ह्या पुलांपैकी किती पुलाच्या बांधकामाचे डिझाईनर, इंजीनियर, मटेरियल सप्लायर आरक्षण वाले होते? परंतु जातीयवाद करणा-याला हे प्रश्न पडत नाही. कारण लहानपणापासून ते ज्या वातावरणात वाढतात त्या वातावरणातून, घरातून, नातेवाईक, मित्रांकडून, सभा-संमेलनातून जे संस्कार मिळतात तशी वृत्ती घडत जाते. प्रथा, परंपरेच्या माध्यमातून हेच संस्कार मिळत असेल तर मनुस्मृती वाचली काय किंवा नाही वाचली काय, काय फरक पडतो? |