सोमवार, १४ जून, २०२१

मा. गांधींची अस्पृश्यांच्या बाबतीत वागणूक

१९३५ मध्ये गुजरातमधील अहमदाबाद या जिल्ह्यातील कवीठा या गावातील हरिजनांनी, गावातील सार्वजनिक शाळेत हिंदूंच्या मुलांसोबतच त्यांच्या मुलांनाही प्रवेश द्यावा अशी हिंदूंकड़े मागणी केली. त्यांच्या या धाडसाचा हिंदूंना भारी राग आला आणि त्यांनी हरिजनांवर संपूर्ण बहिष्कार पुकारला. सवर्णांनी त्यांच्या शेतीवर हरिजनांना काम देणे बंद केले. त्यांच्या गुराढोरांना सार्वजनिक कुरणात चरण्यास मनाई करण्यात आली. एवढेच नव्हे तर हरिजनांकडून महादेवाच्या नावाने शपथ घेण्यात आली की ते आपल्या मुलांना शाळेत पाठविण्याचा कधीही प्रयत्न करणार नाही. शेवटी अस्पृश्यांनी शरणागती पत्करली तरीही अनेक दिवस बहिष्कार मागे घेण्यात आला नाही. सवर्ण हिंदू आपली मृत जनावरे स्वतःच ओढू शकत नसल्याने चांभाराविरुद्धचा बहिष्कार काहीसा लवकर मागे घेण्यात आला. हरिजनांवर करण्यात आलेला अत्याचार मात्र पुरेसा नव्हता की काय म्हणून हरिजनांच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत केरोसीन ओतले गेले. 

श्री. ठक्कर नावाच्या व्यक्तीने सवर्ण हिंदूंना समजविण्याचा प्रयत्न केला. त्यावर सवर्णांचे असे म्हणणे होते की, धेड आणि चांभाराची मुले त्यांच्या मुलांच्या बाजुला शाळेत बसतील ही कल्पनाच त्यांना सहन होत नाही. श्री. ठक्कर जिल्ह्याधिका-यांना भेटलेत पण जिल्ह्याधिकारी सुद्धा त्यातून मार्ग काढू शकले नाही. 

शेवटी हरिजन एवढे हतबल झाले की, त्यांनी गाव सोडून दुसरीकडे आश्रयास जाण्याचा विचार सुरु केला. यावर मा. गांधी यांनी काय केले? त्यांनी हरिजनांना पुढील उपदेश केला. "जे स्वतःची मदत स्वतः करतात त्यांना देवही मदत करतो. जर लोक पोटापाण्यासाठी गाव सोडु शकतात तर आत्मसन्मानाच्या रक्षणार्थ त्यांना बरेच काही करता येईल"

कविठ्याच्या हरिजनांना मा. गांधी यांनी गाव सोडण्याचा सल्ला दिला. पण हिंदूंविरुद्ध खटला दाखल करुन हरिजनांचे अधिकार मिळावेत यासाठी मदत केली नाही. (संदर्भ - काँग्रेस आणि गांधीनी अस्पृश्यांप्रति काय केले?)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: