अस्पृश्यांच्या प्रगतीसाठी आणि त्यांची चळवळ विस्तृत करण्यासाठी ज्या वरिष्ठवर्गीय लोकांनी मनापासून प्रयत्न केले, त्यात कोल्हापूरचे राजर्श्री श्रीछत्रपती शाहू महाराज हे अग्रगण्य होते. ता. २ एप्रिल १८९४ ला ते गादीवर स्थानापन्न झाले. तेव्हा त्यांना आश्चर्याने थक्क करणारे व दुःखाने व्याकूळ करणारे असे जर कोणते दृश्य दिसले असेल तर ते म्हणजे संस्थानाच्या व स्थानिक स्वराज्याच्या खात्यांत ब्राम्हण जातींच्या लोकांच्या हातून अनियंत्रितपणे चाललेला कारभार. ब्राम्हणेत्तर जातीतील लोक बोटांवर मोजण्याइतकेच होते. याचे कारण काय व ते कारण कसे दूर करावे याबद्दलचे विचार छत्रपतींच्या डोक्यात एकसारखे घोळू लागले. ब्राम्हण जातीत शिक्षणप्रसार बराच झालेला होता. शिवाय पेशव्यांच्या कारकिर्दीपासून राज्यकारभाराच्या खात्यात ब्राम्हणांचे अढळ स्थान परंपरने कायम होऊन बसलेले होते. ब्राम्हणेत्तर वर्गामध्ये शिक्षणप्रसार झालेला नव्हता व राज्यकारभाराच्या खात्यांमधेही त्यांचा प्रवेश झालेला नव्हता. जो काय प्रवेश झालेला होता तो शिपाई, भालदार, चोपदार म्हणून. विचारांती छत्रपतींनी असे ठरविले की, ब्राम्हणेतरांच्या हातात अधिकारसूत्रे आणून द्यावयाची तर त्यासाठी त्यांच्यात शिक्षणप्रसार जारी करुन सुशिक्षित लोक तयार करावयाचे व त्यांना अधिकाराच्या व इतर पदांवर नेमावयाचे व त्यासाठी बहुजन समाजात जागृतीची जोरदार चळवळ चालवावयाची. त्याप्रमाणे छत्रपतींनी संस्थानात दौरे काढून शिक्षणप्रसाराची व लोकजागृतीची चळवळ धुमधडाक्याने चालू केली.
ब्राम्हणेत्तर जातीतील हुशार विद्यार्थ्याना शिष्यवृत्त्या देणे व ठिकठिकाणी वस्तीगृहे चालू करुन ती स्वतःच्या द्रव्यसहाय्याने चालविणे हे भरीव कार्य हाती घेतले. ब्राम्हणेत्तर मुलांच्या शिक्षणासाठी अनेक संस्था चालू केल्या. संस्थानाबाहेरील ब्रिटिश हद्दीत सुद्धा विद्यार्थी वस्तीगृहे चालू करण्यास व चालविण्यास उत्तेजन दिले. काही संस्थाना भरपूर देणग्या दिल्या. महार, मांग, ढोर, चांभार, मराठे, शिंपी, न्हावी, मुसलमान इत्यादी जातीतील मुले शिकून तयार झाल्यानंतर त्यांना संस्थानच्या निरनिराळ्या खात्यांमध्ये छत्रपतींनी नेमले. काहींना वकिलांच्या सनदा दिल्या. छत्रपतींच्या पुरोगामी जाणिवेमुळे बहुजन समाजाला शिक्षणाची आस लागली व माणुसकीच्या हक्कांची जागृती त्यांच्यात उत्पन्न झाली. ब्राम्हणेत्तर लोक संस्थानांतील नोक-यांमध्ये शिरू लागल्यामुळे आतापर्यंत नोक-यांची मिरासदारी भोगत असलेल्या ब्राम्हणांना संस्थानात नोक-या मिळणे अशक्य झाले. शिवाय ब्राम्हणेत्तर समाजात स्वहक्काची जाणीव झाल्यामुळे दररोजच्या व्यवहारात आतापर्यंत असलेला ब्राम्हणांचा वरचष्मा कमी होऊ लागला. या सर्व परिस्थितीमुळे संस्थानांतील ब्राम्हण छत्रपतींना शत्रू समजू लागले. छत्रपतींची चळवळ हाणून पाडण्यासाठी ते अनेक प्रकारचे काळेबेरे डावपेच रचू लागले. ब्राम्हणांनी संस्थानात व संस्थानाबाहेर चालविलेली वर्तमानपत्रे छत्रपतींच्या कार्याचा विपर्यास करुन त्यांना मन मानेल तसे शिव्याश्याप देऊ लागली. तरी पण छत्रपतींनी त्यांना भीक घातली नाही. परंतु ब्राम्हणांनी जेव्हा छत्रपतींविरुद्ध एक भयंकर अपमानास्पद व डोके फिरवून टाकणारे प्रकरण उभे केले, तेव्हा छत्रपतींनी ब्राम्हणाविरुद्ध ब्राम्हणेत्तर वर्ग उठवून ब्राम्हणांना सार्वजनिक कार्यातून व सरकारी अधिकारातून बडतर्फ करण्याचा चंग बांधला. ते प्रकरण 'वेदोक्त प्रकरण' या नावाने महाराष्ट्रात कित्येक वर्षे दुमदुमत राहिले होते.
कार्तिकी एकादशीला पंचगंगा नदीवर दर वर्षी कोल्हापूरला जत्रा भरत असे. त्या दिवशी महाराज सूर्योदयापूर्वी स्नान करीत व त्यावेळी राजगृहाचा राजोपाध्ये वैदिक मंत्र म्हणत असे. १९०० सालाच्या कार्तिकी एकादशीच्या दिवशी महाराज सहपरिवार सूर्योदयापूर्वी पंचगंगेच्या स्नानास गेले तेव्हा त्यांचा राजोपाध्ये तेथे उशिरा आला. आल्यानंतर त्याने प्रथम स्नान करावयाचे व नंतर तो शुचिर्भूत झाल्यावर महाराज व त्यांचा परिवार स्नान करीत असताना राजोपाध्ये यांनी वेदोक्त मंत्र म्हणायचे, असा रिवाज असताही तो ब्राम्हण उशिरा येऊन मुखस्तंभ होऊन उभा राहिला. स्नान करण्यास महाराजांनी सांगितले तेव्हा तो म्हणाला, "मला थंडीमुळे पाणी गार लागते, शिवाय मला पुराणोक्त मंत्र म्हणावयाचे आहेत, तेव्हा मला शुचिर्भूत होण्याचे कारण नाही." यावर महाराज संतापले व त्याला म्हणाले, "आम्ही स्नान करण्याच्या अगोदर तू स्नान करुन तयार राहून आमच्या स्नानाच्या वेळी वेदोक्त मंत्र इतकी वर्षे म्हणायचा आणि आताच तुला हे काय वेड लागले?" यावर ब्राम्हण म्हणाला, "महाराज, तुम्ही राजे असला तरी शुद्र आहात व तुम्हाला वेदोक्त मंत्र ऐकण्याचा अधिकार नाही. तुम्ही फ़क्त पुराणोक्त मंत्र ऐकावेत व ते मी शुचिर्भूत न होता म्हणालो तरी त्याला शास्त्राची आडकाठी नाही." राजोपाध्ये याची ही गर्विष्ठ चर्पटपंजरी ऐकून महाराज संतापाने थरथर कापू लागले. महाराजांच्या परिवारातील लोक त्या ब्राम्हणाला अद्वातद्वा बोलू लागले. तेव्हा महाराजांनी स्वतःचा अपमान सहन करुन व राग आवरून इतरांना सांत्वनपर चार शब्द सांगितले व त्या ब्राम्हणाला तेथून जाण्यास सांगून त्यांनी स्नान उरकले व ते राजवाड्याला परतले.
दुस-या दिवसापासून राजोपाध्ये याने महाराजांच्या घरच्या कार्यात वेदोक्त मंत्र म्हणण्याचे नाकारले. महाराज त्याच्याकडून पुराणोक्त मंत्र म्हणवून पुजाविधी वगैरे करण्यास तयार होईनात. इतकी वर्षे राजवाड्यातील धार्मिक विधी वेदोक्त पद्धतीने बिनतक्रार करणारा व नेहमी आदराने वागणारा ब्राम्हण या वर्षी इतका मगरूर कसा झाला, याबद्दल विचार करताना महाराजांना कळून आले की, या गृहस्थाचा संबंध ब्राम्हण चळवळयांशी असला पाहिजे व त्यांची याला फ़ूस असली पाहिजे. महाराजांचा हा कयास थोड्या दिवसांनी खरा ठरला. सदर ब्राम्हणास वेदोक्त पूजा करण्यास पुन्हा:पुन्हा सांगितले तरी तो ऐकेना. हा अस्तनीतला निखारा कायमचा विझवावा असे ठरवून मग महाराजांनी सदर ब्राम्हणास बडतर्फ केले. त्यानंतर कोल्हापुरातील एक वेदशास्त्रसंपन्न ब्राम्हण नारायण भट सेवेकरी याला राजोपाध्ये म्हणून नेमले. तेव्हा बडतर्फ केलेल्या ब्राम्हणाने कोल्हापुरातील ब्रम्हावृंदापुढे महाराजांच्या विरुद्ध कैफियत मांडली. सेवेकरी याने महाराजांचे धार्मिक विधी वेदोक्त पद्धतीने केले म्हणून त्याच्यावर ब्रम्हावृंदाने जातिबहिष्कार जाहिर केला. महाराजांना वेदोक्त अधिकार नाही व मूळच्या कुलोपाध्यायास पुन्हा राजवाड्यात नोकरीत घेऊन महाराजांनी त्यांच्याकडून पुराणोक्त पद्धतीने धार्मिक विधी करवून घ्यावेत, अशी कैफियत ब्रह्यवृंदाने जगद्गुरु शंकराचार्य यांच्याकडे मांडली. ब्राम्हणी वर्तमानपत्रांनी या कैफियतीच्या बाजूने धुमधडाक्याने प्रचार चालू केला. महाराजांचे ब्राम्हणांविरुद्ध अत्याचार काय काय झालेत त्यांची रसाळ व कपोलकल्पित वर्णने ती पत्रे देऊन महाराजांच्याविरुद्ध महाराष्ट्रात लोकमत तयार करु लागली.
नवरात्रामध्ये कुलोपाध्याने अंबाबाईची पूजाअर्चा करावयाची असे. सेवेकरी पुजेसाठी देवळात शिरू लागला तेव्हा ब्रम्हावृंदाने व मूळच्या राजोपाध्याने त्याला अडथळा केला. तेथे मारामारीचा प्रकार होईल की काय, हे जाणून महाराजांनी दोन्ही पक्षांना मंदिरप्रवेशाची बंदी केली. मग ब्रम्हावृंदाने कोल्हापुरातील पॉलिटिकल एजंट यांच्याकडे आपली फिर्याद गुदरली. हे प्रकरण चिडीस गेले तर संस्थानात व संस्थानाबाहेर अस्वस्थता माजेल, म्हणून महाराजांनी ब्रम्हवृंदाशी सामोपचाराने समेत करावा व पुराणोक्त पद्धत स्वीकारावी, यासाठी पॉलिटिकल एजंट व इतर वजनदार लोकांनी महाराजांच्यावर वजन पाडण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु महाराज कोणाच्या विनवणीला व धमकावणीला नमले नाहीत. ब्राम्हणी वर्तमानपत्रे हे वेदोक्त प्रकरण लंडनच्या पार्लमेंटपर्यंत नेण्याची भाषा वापरु लागले.
मूळच्या राजोपाध्येच्या घराण्याला१८८९ साली सनद देण्यात आली होती. राजघराण्यातील धार्मिक विधी वेदोक्त पद्धतीने करावेत व त्याबद्दल इनाम जमिनी वंशपरंपरेने वापराव्यात, अशा अर्थाची ही सनद होती. धार्मिक विधी करण्याचे राजोपाध्येने नाकारल्यावर महाराजांनी ही सनद रद्द केली व इनाम जमिनी त्याजपासून काढून घेतल्या.
वेदोक्त प्रकरण सुरु झाल्यानंतर महाराजांनी आपल्या वंशात, म्हणजे शिवाजी महाराजांच्या वंशात, वेदोक्त विधी चालत होते याची माहिती गोळा करुन ठेवली. खुद्द शिवाजी महाराजांच्या राज्यारोहणप्रसंगी काशीच्या गागाभट्टाने महाराजांना प्रथम क्षत्रिय म्हणून मान्यता दिली व तो राज्यारोहण समारंभ वेदोक्त पद्धतीने करण्यास तयार झाला, पण ब्रम्हावृंदाने त्याचे कान भरताच तो महाराजांना शुद्र म्हणू लागला. पण गडगंज दक्षिणा हातात पड़ताच गागभट्ट ब्रम्हावृंदाविरुद्ध उभा राहिला व शिवाजी महाराजांचा राज्यारोहणसमारंभ वेदोक्त पद्धतीने करण्यास पुन्हा कबुल झाला व त्याप्रमाणे त्याने तसे केले. हे उदाहरण व इतर उदाहरणे लक्षात घेऊन वैदिक काळापासून आतापर्यंत ब्राम्हणांनी ब्राम्हणेतरांना धार्मिक बंधनांनी कसे जाम जखडून टाकलेले आहे व ती बंधने दूर करणे कसे अत्यावश्यक आहे याची महाराजांना पुरेपूर जाणीव पटली. या जाणिवेतूनच महाराजांच्या डोक्यातून ब्राम्हणेत्तर चळवळ उगम पावली. त्या चळवळीमुळेच महात्मा जोतीराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे पुनरुज्जीवन झाले.
वेदोक्त प्रकरण शेवटी महाराजांच्या बाजूने निकालात निघाले. या वेदोक्त प्रकरणाच्या बाबतीत ब्रम्हावृंदांच्या दृष्ट कारवाया, ब्राम्हणांच्या दृष्ट चळवळी आणि आपणास महाराष्ट्रीय जनतेच्या मनातून उतरवून कोल्हापूरच्या गादीवरूनही दूर करण्यासाठी महाराष्ट्रीय ब्राम्हणी वर्तमानापत्रांनी जी वारेमाप हाकाटी चालविली त्यामुळे महाराजांना मनस्वी मानसिक ताप झाला. या सर्व प्रकारामुळे ब्राम्हणांचे धार्मिक वर्चस्व अजिबात नको असे महाराजांचे ठाम मत बनले, त्यामुळे त्यांनी जगदगुरु शंकराचार्य यांचे वर्चस्व झुगारून दिले व ब्राम्हणेतरांसाठी त्यांनी क्षात्रजगदगुरु हे पद उत्पन्न केले.
छत्रपती शाहू महाराज व लोकमान्य टिळक यांच्यातील वाद
वेदोक्त प्रकारणामुळे लोकमान्य टिळक आणि महाराज यांचे जाहिर खटके उडू लागले. टिळकांनी ब्रम्हावृंदाची बाजू उचलून धरली. ता. २३ व २४ मार्च १९१८ रोजी अस्पृश्यतानिवारक परिषद मुंबईत भरली होती. त्या सभेतील भाषणात शूद्रांनी वैदिक मंत्र म्हणू नयेत असे टिळकांनी सांगितले होते. त्यांनी केसरीतून महाराजांच्या चळवळीवर हवे तसे प्रहार केले. कोल्हापुरात टिळकांचे जे अनुयायी होते, त्यांनी 'शिवाजी क्लब' कोल्हापुरात स्थापन केला. या क्लबचे कार्यक्रम व चळवळी वरवर राष्ट्रीय वृत्तीच्या असत. पण आतून त्यांचे कार्य ब्राम्हण जातीची संघटना करुन महाराजांच्या ब्राम्हणेत्तर जागृतीच्या चळवळीना नेस्तनाबूत करणे व महाराज हे धर्मभ्रष्ट आहेत असा बहुजनसमाजात भास उत्पन्न करणे हे अखंड चालू असे. टिळकांनी शिवजयंती चळवळ चालू केली, तेव्हा महाराजांनी टिळकांशी काही वर्षे सहकार्य केले. परंतु त्या चळवळीतर्फे बहुजनसमाजाचा पाठिंबा राष्ट्रीय चळवळीस मिळवावयाचा, पण बहुजनसमाजाच्या धार्मिक व सामाजिक हक्काना विरोध करावयाचा, हे टिळकांचे दुटप्पी वर्तन महाराजांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी टिळकांशी या शिवजयंतीच्या कार्यातील आपला संबंध तोडला, तेव्हा टिळकांचे अनुयायी या दोन संस्थांतर्फे महाराजांविरुद्ध उघड़ प्रचारकार्य करु लागले.
महाराज व टिळक यांचे सार्वजनिक आयुष्यात पुढे फारच खटके उडू लागले. टिळक हे साधुवृत्तिचे, सत्वशील, सत्याचरणी, देशहितचिंतक, धर्मनिष्ठ वगैरे वगैरे होत आणि शाहू महाराज हे दृष्ट प्रवृत्तिचे, लबाड़ आणि इंग्रजांचे गुलाम व देशबुडवे, वगैरे वगैरे होत, अशा प्रचाराचा टिळकांचे अनुयायी व टिळकी राजकारण, समाजकारण व धर्मकारण यांना उचलून धरणारी वर्तमानपत्रे, यांनी एकच हलकल्लोळ उडवून दिला. त्यामुळे महारज हे ब्राम्हणद्वेष्टे होत, असा समज सर्वत्र रूढ़ झाला; परंतु महाराज टिळकांसारख्या प्रवृत्तीच्या ब्राम्हणांचे द्वेष्टे होते, रानडे, गोखले व आगरकर यासारख्या समतावादी ब्राम्हणांचे द्वेष्टे नव्हते, तर ते त्यांचे चाहते होते व त्यांना त्याच्या कार्यात ते सक्रीय उत्तेजन देत.
पहिल्या महायुद्धाच्या काळात मुंबई इलाख्याचे गव्हर्नर लार्ड विलिंग्डन होते. महाराष्ट्रीय बहुजनसमाजात सामाजिक, धार्मिक व राजकीय हक्कांबद्दल जागृती व्हावी, याबद्दल महाराजांनी जी चळवळ चालविली होती, तिला मुंबई सरकारने सक्रीय मदत द्यावी, याबद्दल लार्ड विलिंग्डन व महाराज यांच्यामध्ये ब-याच वाटाघाटी झालेल्या होत्या. याबाबतीत त्यांच्यामध्ये बराचसा पत्रव्यवहार झालेला होता. राष्ट्रीय चळवळ, टिळकांची राजकीय बाबतीतील प्रखर पुरोगामी पण सामाजिक व धार्मिक बाबतीतील जीर्णमताभिमानी मते यासंबंधी सदर पत्रातून गव्हर्नरसाहेब व महाराज यांनी चर्चा केलेली होती. त्याचप्रमाणे बहुजनसमाजाच्या सर्वांगीण चळवळीत जोम भरावयाचा तर त्यासाठी वरिष्ठ वर्गानी चालविलेल्या चळवळीना डावलणे किंवा पायबंद घालणे जरूर आहे, अशा आशयाचे विचारप्रदर्शन दोघांनीही आपापल्या पत्रांतून केलेले होते. टिळकांच्या कोल्हापुरातील हस्तकाने उपरनिर्दिष्ट पत्रव्यवहाराचे पुडके महाराजांच्या राजवाड्यातून अलगद हस्तगत केले व ते टिळकांना नेऊन दिले. ते टिळकांनी 'केसरी' पत्रातून क्रमशः प्रसिद्ध केले व १९२२ साली ते 'आमचे स्वराज्यद्रोही छत्रपती' या शीर्षकाखाली श्री. न. चिं. केळकर यांच्या नावाने प्रसिद्ध करण्यात आले. या प्रकरणामुळे महाराजांच्याविरुद्ध तात्पुरते का होईना लोकमत कलुषित झाले. ते असे की, महाराज ब्राम्हणांचा म्हणजे टिळकांचा सुड उगविण्यासाठी ब्रिटिश सरकारच्या हाती कळसूत्री बाहुले होऊन बसले आहेत. आपल्याशी सहमत नसणा-यांना नाना त-हेने खतम करणे याचे टिळकांना वावड़े नव्हते, याचे हे उदाहरण आहे. महाराजांनी बहुजनसमाजाच्या सर्वांगीण जागृतीचे जे कार्य हाती घेतले होते, त्यातही टिळकांनी काटे पसरण्याचे आपले व्रत चालु ठेवले होते. यावरुन टिळकांचा अस्पृश्य समाज व त्यांची चळवळ, यासंबंधी दृष्टिकोण कसा असेल हे आपोआप सिद्ध होते.
- चांगदेव भवानराव खैरमोडे
डॉ बाबासाहेब आंबेडकर - चरित्र खंड १