शनिवार, ३१ डिसेंबर, २०१६

भीमा कोरेगाव

नमो बुद्धाय - जय भीम  
               पुण्याजवळ  भीमा नदीच्या काठी कोरेगाव या ठिकाणी ब्रिटीशांनी बांधलेला एक विजयस्तंभ आहे. या ठिकाणी १८१७ साली पेशव्यांचा इंग्रजांनी पराभव केला आणि या पराभवाबरोबरच पेशवाई नष्ट झाली. आणि पुण्याच्या शनिवारवाड्यावर ब्रिटीशांचा युनियन जॅक (झेंडा) फडकू लागला. या युद्धात ब्रिटीशांच्या बाजूने महार सैनिक लढले आणि त्यांची संख्या अगदी अल्पशी असताना देखील पेशव्यांच्या प्रचंड सैन्याचा त्यांनी पराभव केला, आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर महार सैनिकांनी ब्रिटीशांना विजय मिळवून दिला. या विजयाप्रितर्थ आणि महार सैनिकांच्या पराक्रमाचे स्मरण चिरकाल राहावे यासाठी ब्रिटीशांनी हा विजयस्तंभ  बांधला, आणि त्या स्तंभावर पराक्रमी महार सैनिकांची नावे कोरून ठेवली. 
  
              डॉ. बाबासाहेब आंबेडकर या स्तंभाला दरवर्षी भेट देत असत. विशेषत: जानेवारी महिन्यात ते जात असत आणि त्या सैनिकांच्या पराक्रमाबद्दल चार शब्द बोलत असत. असेच एका वर्षीच्या तेथील भाषणात डॉ. आंबेडकर म्हणाले, ' हा विजयस्तंभ म्हणजे ब्राम्हणी सत्तेचा पराभव करून महार सैनिकांनी जो विजय मिळविला त्या विजयाचे हे एक प्रतिक आहे. महार सैनिकांच्या शौर्याचे हे प्रतिक आहे. महार सैनिक ब्रिटीशांच्या नेतृत्वाखाली इथे लढले, आणि त्यांनी बदनाम अशा पेशव्यांच्या  राजवटीचा शेवट केला.' 

              बाबासाहेबाना याबद्दल अभिमान होता. वास्तविक हा अभिमान ब्रिटीशांना मिळालेल्या  विजयापेक्षा महारानी  केलेल्या पराक्रमाबद्दलच अधिक होता. डॉ. आंबेडकरांचे हे भाषण हिंदुत्ववादी गोळवरकराना चांगलेच झोंबले. तेव्हा या भाषणावर आपली तीव्र  प्रतिक्रिया व्यक्त करताना गोळवरकर म्हणाले, ' डॉ. आंबेडकरांचे हे उदगार किती दुर्दैवी  आणि हृदयावर आघात करणारे आहेत ? स्वकीय पेशव्यांच्या विरुद्ध आणि परकीय  इंग्रजांच्या बाजूने लढणा-या महार सैनिकांच्या बाबतीत हि भाषा गुलामीची निदर्शक आहे,  ती विजयाची खुण  नाही. आपल्याच देशबांधावाच्या विरुद्ध लढणे हि स्वाभिमानाची  किंवा  विजयाची बाब नव्हे.'  
 
               डॉ. आंबेडकरांच्या विधानावर गोळवरकरांचा आक्षेप हा प्रथमदर्शनी कोणत्याही व्यक्तीस  योग्य आहे असेच वाटेल यात शंका नाही. गोळवरकराना महार सैनिकांची प्रवृत्ती गुलामीची  वाटते. परंतु राष्ट्रभक्त गोळवरकर गुरुजींनी एका महत्वाच्या गोष्टीकडे सोयीस्कररीत्या  कानाडोळा केला आहे. या महार लोकाना या देशात गुलाम कोणी केले ? त्यांच्यातील गुलामी प्रवृत्तीला खतपाणी कोणी घातले ? पेशव्यांच्या काळात 'आम्हाला  गुलाम करा, आम्हाला बहिष्कृत करां,' अशी मागणी करून महारांनी शनवारवाड्यापुढे  धरणे धरल्याचा इतिहास तरी कोठे अस्तित्वात नाही. वास्तविक गोळवरकर हे चित्पावन ब्राम्हण, आणि पेशवे हे त्यांचेच ज्ञातीबांधव, तेव्हा आपल्या ज्ञातीबांधवांचे, चित्पावनांचे राज्य  बुडाल्याचे दु:ख गोळवरकरांना होणे हे अपरिहार्य आणि नैसर्गिक आहे. परंतु ज्या महार- मांगाना पेशव्यांच्या काळात गावात येण्याची परवानगी नव्हती, सकाळ-संध्याकाळ  फिरण्यास बंदी होती, ज्यांच्या गळ्यात थुंकण्यासाठी मडकी बांधण्यात आली होती, रस्त्यात ब्राम्हण भेटला तर आपला विटाळ होऊ नये म्हणून ज्या अस्पृश्यास पटकन खाली बसावे  लागे, ज्या महारांना व मांगांना तेल-शेंदूर पाजून इमारतीच्या पायात पुरून त्यांचा बळी दिला  असे, ज्या महारास त्याच्या क्षुल्लक गुन्ह्याबद्दल शिरच्छेदाची शिक्षा दिली जात असे. अशा महारांनी पेशव्यांचे राज्य हे आपलेच राज्य मानावे, अशी गोळवरकरांची इच्छा असेल,  तर त्यांच्यासारखा बेजबाबदार आणि दांभिक माणूस मिळणे कठीण बरे, राष्ठनिष्ठेच्या  भाषेतच जर बोलायचे झाले, तर या पेशव्यांच्या काळात त्यांनी राष्ठनिष्ठा जोपासली होती  काय ? या देशातल्या हिंदुत्ववादी ब्राम्हणांची कल्पना अशी आहे कि, राष्ठनिष्ठा केवळ  आपणच जोपासली. राष्ट्रावर जर कोणी खरेखुरे प्रेम केले असेल, तर ते आपणच. फुटीरवृत्ती, राष्ट्रविघातक कारवाया, अंतर्गत कलह आणि जातीयवाद यांनी सारी पेशवाई आतून  पूर्णतया पोखरून गेली होती. पेशवाईंच्या काळात राघोबा दादा अनेक वेळा वसईच्या  इंग्रजाना जाऊन मिळाला आणि माधवराव पेशव्यांच्या बरोबर त्याने युद्ध केले. नानासाहेब पेशव्याने आंग्रे घराण्यातील तुळाजीला  नेस्तनाबूत करण्यासाठी काय केले ? तर त्याने परकीय इंग्रज आणि पोर्तुगीज यांची मदत घेऊन स्वकीय तुळाजी आंग्रे यांचे पारिपत्य घडवून आणले. राघोबा दादा आणि नानासाहेब ह्यांच्या ह्या कृती कोणत्या राष्ट्रावादात  बसतात हे गोळवरकराना विचारायला हवे होते. १७६१ च्या पानिपतच्या युद्धात मल्हारराव  होळकराने अंतस्तपणे फितुरी करून युद्धात जाणून-बुजून तटस्थता स्वीकारली, त्याचप्रमाणे पेशव्यांनी उत्तर भारतातील हिंदू राज्यांना अनेक वेळा चौथाई, सरदेशमुखीच्या नावावर  लुटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना लुटारू समजत असत. पेशव्यांच्या विचारामध्ये  राष्ट्रभक्तीच असती, तर त्यांनी आपल्याच भारतीय राज्यांना म्हणजे शीख, जाट, राजपूत, बुंदेले वगैरेना शत्रू मानून लुटले नसते, आणि त्यांच्या या प्रवृत्तीमुळेच त्याना १७६१ च्या  युद्धात अब्दालीशी एकट्याने लढावे लागले. 
          
                 राष्ट्रावर प्रेम केवळ महारांनी करावे आणि पेशव्यांनी मात्र राज्य करावे, फितुरी करावी, जातीनिष्ठा जोपासाव्या, अशा प्रकारच्या गोळवरकरी विचारामुळेच देशाची खरी नासाडी  झाली आहे. वास्तविक हे हिंदुत्ववादी एकाच वेळी राष्ट्रनिष्ठा आणि जातीनिष्ठा जोपासू  पाहणारे आहेत. यांनी राष्ट्रप्रेमापेक्षा स्वत:च्या जातीवरच अधिक प्रेम केले असा इतिहास  आहे. वास्तविक गोळवरकराना जे दु:ख आहे ते स्वत:च्या ज्ञातीबांधवांचे  राज्य नष्ट झाले  याबद्दलचे आहे.  
                                                                                                
               इंग्रजांनी आपल्या पेशव्यांचे राज्य नष्ट केले हि बाब चित्पावन ब्राम्हण लोकांच्या दृष्टीने अत्यंत  दु:खाची होती. म्हणूनच इंग्रजांच्या विरुद्ध या देशातील पहिला उद्रेक झाला, तो १८५७ च्या  बंडाच्या रूपाने. या बंडात महत्वाचे पुढारी कोण होते ? या पुढा-यामध्ये ब्राम्हण अधिक होते. झाशीची राणी ब्राम्हण, तात्या टोपे ब्राम्हण, नानासाहेब पेशवे ब्राम्हण आणि ब्रिटीश     अधिका-यावर छावणीत पहिली गोळी झाडणारा मंगल पांडे हा देखील ब्राम्हणच. या १८५७ च्या बंडाला सावरकरांनी जे 'स्वातंत्र्यसमर' म्हणून गौरविले त्यालाही या   पार्श्वभूमीवर आणि सामाजिक संदर्भांत विशिष्ट अर्थ आहे. पुढील काळात इंग्रजांच्या  विरुद्ध जे लोक पुढे आले त्यामध्ये बंगाल मधील ब्राम्हण तरुण अधिक होते. महाराष्ट्रात वासुदेव  बळवंत, अनंत कान्हेरे, गोगटे, चाफेकर बंधू हि सारी मंडळी राष्ट्रवादी होती, पण त्यांच्या  राष्ट्रावादापेक्षा पेशव्यांचे राज्य नष्ट झाल्याचे गोळवरकराना जे दु:ख झाले त्या दु:खाशी  ते अधिक समरस होते. १८५७ च्या बंडाला सामाजिक पार्श्वभूमी फार मोठी होती. मंगल पांडे वगैरे लोकाना असे वाटत होते कि, ब्राह्मणांचे समाजातील वर्चस्व नष्ट करण्यासाठी  ब्रिटीश सर्व धोरणे आखीत आहेत. सैनिकी छावण्यातील सर्व जातींची समानता किंवा  डलहौसीच्या रेल्वेच्या सुधारणा हे सर्व त्यासाठीच आहे असा प्रचार करण्यात आला, म्हणूनच महात्मा ज्योतीराव फुल्यांनी या बंडास 'भट-पांड्याचे बंड' असे म्हटले होते आणि म्हणूनच या बंडामध्ये ब्रिटीशांचा विजय व्हावा असे फुल्यांना मनापासून वाटत होते.    
      
             तेव्हा कोरेगावच्या युद्धात महार ब्रिटीशांच्या बाजूने लढले, यावरून आपणास त्याना गुलामी  प्रवृत्तीचे लोक म्हणता येईल का  ? डॉ. आंबेडकरांनी अनेक ठिकाणी सांगितले होते कि, महार लोकांनी आपल्या चरीतार्थासाठी इंग्रजांच्या सैन्यात नोक-या धरल्या होत्या. वास्तविक महार सैनिकांची सैनिक परंपरा फार मोठी आहे. त्यांचा उल्लेख अलेक्झांडर रॉबर्टसनसारख्या विद्वानांनी स्वतंत्र पुस्तके लिहून केलेला आहे. मराठी राज्यांच्या काळात त्या राज्यांसाठी महारांनी अतुल असा पराक्रम केला आहे. आपल्या प्राणाचे अनेक ठिकाणी बलिदान दिले आहे. तेव्हा गोळवरकर गुरुजींनी डॉ. आंबेडकरांच्या विधानाला जी हरकत घेतली, जो विरोध केला त्यामध्ये कितपत तथ्य आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. परकीयांशी हातमिळवनी करून स्वकियांशी द्रोह केलेल्या अनेक हिंदूंची उदाहरणे आपल्या इतिहासात आहेत. राजा अंभी, जयचंद राठोड, राजा मानसिंह, राजा जयसिंह, चंद्रराव मोरे, स्वातंत्र्यलढ्याच्या काळातले भारतीय संस्थानिक, अशी अनेक ठळक उदाहरणे देशद्रोहाचा आणि स्वकीयांचा विश्वासघात करणा-यांचा इतिहास सांगतात. परंतु पोटासाठी लढणा-या महारांचे एकच एक उदाहरण हिंदुत्ववादी लोक कोरेगावच्या लढ्याच्या संदर्भात देत असतात आणि त्यांनी देशद्रोही म्हणून बदनाम करीत असतात हि एक आश्चर्यजनक बाब आहे. महार सैनिकांना एक उज्वल परंपरा या देशाच्या इतिहासात आहे. त्यांचा मात्र हे गोळवरकर प्रवृत्तीचे लोक सोयीस्करपणे उल्लेख टाळतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून किंवा त्यांच्याही अगोदरपासून महार सैनिकांनी अनेक लढ्यात पराक्रम गाजविला आहे. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचे संरक्षण करण्याचे काम आणि त्याच बरोबर  किल्ल्यावरील तोफखाने चालविण्याचे काम महार, मांग इत्यादी जमातीतील सैनिकांनी अनेक वर्षे केले आहेत. राजाराम महाराजांच्या काळात मोगलांशी प्रचंड संघर्ष करून महार सैनिकांनी वैराटगड जिंकून घेतला आणि याप्रीतर्थ महाराजांनी अनेक महाराना पाटीलकीचे वतन दिले होते. पुढे मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाच्या काळात (१६८३ ते १७०७) शिदानाक नावाच्या महाराने एक स्वतंत्र फलटण उभारून मोगालाविरुद्ध प्रचंड लढा दिला. याची बिदागी म्हणून महार सुभेदारास मिरजेजवळ कळंबी गाव इनाम म्हणून दिले. त्याचप्रमाणे शिदनाकचा नातू दुसरा शिदनाक याने १७९५ च्या खर्ड्याच्या लढाईत निजामाविरुद्ध अतुल पराक्रम गाजविला. पहिला बाजीराव आणि चिमाजी आप्पा ज्यावेळी वसईचा किल्ला लढवीत होते. त्यावेळी युद्धसामग्री आणि सैन्य समुद्राच्या पाण्यातून युद्धाच्या ठिकाणी पोहचविण्याचे अवघड आणि धाडसी काम महार सैनिकांनी केले. त्यापैकी सितामहार, फकीरा महार, बिरामहार, माणमहार, हंसामहार हे प्रमुख सैनिक  होते. 
                                           
              दुस-या बाजीरावाच्या काळात ब्रिटीशांनी एकदा रायगडावर हल्ला केला होता, त्यावेळी रायानाक नावाच्या महार रखवालदाराने १५ दिवस किल्ला लढवून किल्ल्याचे संरक्षण केले आणि शेवटी लढता लढता तो मरण पावला. अशा अनेक उदाहरणांनी या देशाचा इतिहास भरला आहे. महार सैनिकांची देशनिष्ठा, स्वामीनिष्ठा   आणि प्रामाणीकपणा हिंदुत्ववाद्यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. केवळ कोरेगावच्या लढ्याचे उदाहरण पुढे करून त्याना गुलामी प्रवृत्तीचे लोक असे म्हणता येणार नाही.
संदर्भ - डॉ. आंबेडकरांचे विरोधक
           डॉ. दिनकर हेरलेकर

रविवार, १९ जून, २०१६

पंढरपूर येथे बौद्ध धर्माचे देवालय होते हे मी सिद्ध करून देईन

दिनांक २५ डिसेंबर १९५४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भाषाणातील काही अंश

आज या ठिकाणी या छोट्याश्या मंदिरात भगवान बुद्धाच्या मुर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे एखादे मंदिर बांधण्यात आले तर त्यात भैरोबा, खंडोबा, मरीआई वगैरे नानाप्रकारच्या देवता ठेवल्या जातात. आपले लोक भाविक असल्यामुळे ते विष्णु, शिव अशात-हेच्या देवतांची स्थापना करतात. येथे आज हा नवीन देव आणून स्थापला आहे. आपल्यापैकी काही जणांनी भगवान बुद्धाचे नाव देखील ऐकले नसेल.
     
काही लोक म्हणतात की, हा नवीन देव कोठून आणला आहे. बुद्ध भगवंताचा हा धर्म या देशांमध्ये अत्यंत जुना आणि प्राचीन आहे. चीन, जापान, सयाम, इंग्लंड या बाहेरील देशातून हा धर्म येथे आणलेला नाही. या देवाला येथे कोणी आणले याबद्दलचा पहिला खुलासा असा करता येईल की, या देशातील पुरातन देवता आपल्याला ठिकठिकाणी सापडतात.
     
इतिहासाच्या काळामध्ये जी अनेक कारणे घडली त्यामुळे या धर्माचा लोप झाला.
     
बुद्ध धर्माला १९५६ साली अडीच हजार वर्षे पुरी होतील. हा धर्म साडेबाराशे वर्षे जिवंत होता; हे सिद्ध करण्यासाठी मी आज इतिहासातील पुरावा देणार आहे. पूर्वी या देशावर मुसलमानांच्या स्वा-या झाल्या. मुसलमान मूर्तिपूजक नसतात. त्यांनी बुद्ध धर्माच्या लोकांवर हल्ला चढविल्यामुळे हा धर्म खालावाला. अफगाणातील शंभर टक्के लोक बुद्ध धर्माचे होते. येथे बुद्ध धर्मात सात हजार भिक्षु होते. मुसलमानांनी त्यांच्यावर स्वा-या केल्या त्यावेळी त्या मुसलमानांपुढे दोनच प्रश्न होते. या देशातील लोकांनी मुसलमान धर्माचा स्वीकार करावा, हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न म्हणजे जो हा धर्म स्वीकारणार नाही त्यांची कत्तल करणे. त्यांनी या सात हजार भिंक्षुची कत्तल केली.
     
हा धर्म जिवंत होता तेव्हा तो फार प्रभावी होता. या देशात नालंदा विश्वविद्यालय होते. ज्ञानप्राप्ती करून देणे हे या धर्माचे तत्व होते. एक आचार्य व त्यांचे १० पोरे एकत्र बसत आणि ब्राम्हण शास्त्र शिकवित. अशी या धर्माची स्थिती नव्हती.
     
पहिले विश्वविद्यालय बौद्ध धर्मीय लोकांनी स्थापन केले. नालंदा विश्वविद्यालयात तेरा हजार विद्यार्थी व एक हजार अध्यापक होते. ब्राम्हण धर्म हा एकांगी होता. अन्य कारणांमुळे मुसलमानांच्या तडाख्यातून त्यांचा बचाव झाला. बौद्ध धर्माविरुद्ध ब्राम्हणांची कारस्थाने चालू होती. यामुळे तो खाली पडला.
     
तुमचा बौद्ध धर्म एवढा चांगला होता तर त्याचा ऱ्हास का झाला? असे माझे काही मित्र मला प्रश्न विचारतात. तेव्हा मी त्यांना असे विचारतो की, हा धर्म वाईट आहे म्हणून या धर्माचा ऱ्हास झाला असे म्हणावे तर चीन, जपान, कंबोडीया, सिलोन या देशांमध्ये या धर्माचा ऱ्हास का झाला नाही. तेथे अजून तो का टिकून आहे. या देशात हा धर्म नाहिसा झाला नाही तर त्याला निराळी वाळवी लागली असेल, कारस्थाने झाली असतील. सांगायचा मतलब असा की, त्याच्या निर्मितीपासून तो साडेबाराशे वर्षेपर्यंत यच्चयावत चालला होता. हा इतिहास इतिहासकारांनी लपवून ठेवला आहे. आपला महाराष्ट्र देशसुद्धा शंभर टक्के बौद्ध धर्मीय होता आणि त्याला पुरावा म्हणून महाराष्ट्रातील पुरातनकाळच्या कोरीव लेण्यांची उदाहरणे देता येईल. भारतातील दोन हजार लेण्यांपैकी दीड हजार लेण्या महाराष्ट्रात आहेत. ही लेणी म्हणजे बौद्ध भिंक्षुची राहण्याची ठिकाणे होती. महाराष्ट्रात जी काही लेणी आहेत ती पांडवांची आहेत, असे सांगण्यात येते. परंतु विराटनगरी कोठे व पांडवांचे राज्य कोठे?
     
पंधरा हजार विहारातून सुमारे पस्तीस हजार भिक्षु राहत असत. जनतेकडून भिक्षा मागून ते आपली उपजीविका करीत. एक हजार दोनशे पन्नास वर्षे ते या प्रांतामध्ये होते. आपल्या वाडवडिलांपासून भगवंताची पूजा आपण करीत आलो आहो. हिंदू लोकांची धर्माची व्याख्या फार निराळी आहे. देवळात जाणे, घंटा वाजविणे, पूजा करणे आणि भटाला दोन पैसे देणे एवढेच या धर्माचे कार्य! जणू काही भटाच्या बापाचे ऋण फेडणे होय. परंतु हे काही आम्हाला जमले नाही विष्णूची पूजा करून विष्णू पावला नाही, शिवाच्या देवळात जाऊन शिव पावला नाही आणि मरीआई, म्हसोबा, खंडोबा तर पावलाच नाही. धर्माला नीतीचे बंधन हवे आहे. मनुष्याच्या पापी, दुराचारी वर्तनाला बंधन म्हणजेच धर्म!
     
कोणताही धर्म घेताना चोखाळून घेतला पाहिजे. धर्म म्हणजे बाजारपेठ आहे. ते विष्णूचे, ते शिवाचे, ते रामाचे दुकान आहे. तेथे पुजारी धुप, कापूर जाळत बसले आहेत. कृष्ण, राम, शिव, विष्णू यांचा धर्म हा असा धर्म आहे. धर्म मनुष्याचा उद्धार करतो. धर्म घात करण्याकरिता नसतो. आमची अवनती झाली असेल तर ती जातीभेदामुळे! जो धर्म जातीभेदाने बरबटलेला आहे, ज्या धर्मात असमानता आहे तो धर्म आम्ही कसा घेऊ? ज्या धर्मात समानता अधिष्ठित झाली आहे असा धर्म पाहिजे. बौद्ध धर्मात सर्वाना समान संधी व सर्वाना समान अधिकार दिलेला आहे. त्यात ऐक्यता आहे. भेदभाव नाही.
     
ह्या प्रसंगी आपणाला एका सुक्ताची आठवण करून द्यावीशी वाटते. ब्राम्हणाची पोरे होती, त्यांच्यामध्ये तत्वज्ञानाविषयी वाद चालू होता, 'ब्रम्ह हे घर आहे व आत्मा ब्रम्हाची छाया आहे.' ही सगळी पुराणातील वांगी आहेत. हा वाद मिटत नाही असे पाहून ती पोरे बुद्धाजवळ गेली. त्यांना ब्राम्हणांचे तत्वज्ञान पटलेले नव्हते. भगवंतानी त्यांना विचारले. हे ब्रम्ह सत्य आहे काय? तुम्ही ब्रम्ह पाहिले आहे काय? ते काही काळासाठी आहे की नित्य आहे! त्याचं रंगरूप कसं काय आहे? ते काही बोलते काय? त्याला चव आहे का सुगंध आहे? ते गुलाबाच्या फुलासारखे आहे की चाफ्याच्या? ते गोड आहे, तिखट आहे की आंबट आहे?
     
मनुष्यमात्राला सत्य कळण्याकरिता पाच इंद्रिये आहेत. डोळा, कान, नाक, जीभ वगैरे ती पाच इंद्रिये होत. डोळ्याने पाहता येते, कानाने ऐकायला येते नाकाने सुगंधित आहे की दुर्गंधित आहे असा वास कळतो. जिभेने खारट तिखट, आंबट चव कळते. पाच इंद्रियांची साक्ष ज्याला मिळते तेच सत्य. ब्रम्ह सत्य मानणे म्हणजे न पाहिलेल्या मुलीवर प्रेम करण्यासारखे आहे.
     
मला आपणाला दोन गोष्टी सांगावयाच्या आहेत. तुम्ही या धर्माचा स्वीकार कराल त्या दिवशी ब-याच गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत. एकादशीला पंढरपूरला जाणे, द्वादशीला इतर क्षेत्राला जाणे बंद करायला हवेत. मला चांगली आठवण आहे. नाशिक जिल्ह्यात त्र्यंबक येथे कुंड होते. या कुंडात फ़क्त पसाभर पाणी होते. यात्रेकरु लोक त्यात फड़के भिजवून घेऊन अंगाला चोळीत. अशा त-हेची खिचड़ी मी बौद्ध धर्मात होऊ देणार नाही. स्वच्छ पाण्यात घाणेरडे पाणी ओतता कामा नये. भगवान बुद्धाचा धर्म तोच आमचा धर्म, असा आता आम्ही निश्चय केला आहे. तुम्ही पंढरपुरला जाता, पांडुरंगाचे अभंग म्हणता. पुण्याच्या इतिहास संशोधन मंडळातील लोकांची पंढरीचा विठ्ठल कोण होता यावर हुज्जत चालू आहे. पण माझा त्यांना खड़ा सवाल आहे की, विठ्ठलाची भानगड़ सोडून देऊन पंढरीचा पांडूरंग कोण? याचे पहिल्यांदा उत्तर द्या. तो होता कुठे? त्याला पळविलं कोणी? कोणी डुबविलं? पांडूरंग म्हणजे पंढरपूर येथे बौद्ध धर्माचे देवालय होते हे मी त्यांना सिद्ध करुन देईन. पुंडलीक या शब्दापासून पांडूरंग हा शब्द झाला. पुंडलीक याचा अर्थ कमळ. बौद्ध धर्मात मूर्तिपूजा नव्हती. अज्ञानी लोकांना तत्वज्ञान काय कळे! कमळाला पाली भाषेत पांडूरंग असे म्हणतात. तुम्हाला भुलविण्यासाठी ब्राम्हणांनी बुद्धाच्या नावाचा लोप केला. मतलबी लोक महाराष्ट्रातील लेणी ही पांडव लेणी असल्याचे सांगतात.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग ३

सोमवार, २३ मे, २०१६

सावरकर-आंबेडकर वैचारिक संघर्ष

सावरकर-आंबेडकर वैचारिक संघर्ष
 
            सावरकर हे प्रखर राष्ट्रवादी होते. त्यांचा मन:पिंड वैचारिक होता.  ते क्रांतिकारक होते आणि त्यांच्या क्रांतिकारी प्रवृत्तिला वैचारिक अधिष्ठान होते. या देशाच्या हिनकस आणि टाकाऊ अशा सामाजीक आणि धार्मिक परंपराच्यावर जेवढी टिका सावरकरानी केली, हिंदूंच्या अंधश्रद्धांवर, जातिनिष्ठेवर व जातिश्रेष्ठत्वावर जेवढे घणाघाती घाव सावरकरानी घातले, तितके डॉ. आंबेडकरानीही घातले नसतील.  सावरकरानी एकदा अत्यंत कळकळीने आपल्या अनुयायाना सांगितले होते की, मी समुद्रात उडी मारली आणि दहा मैल समुद्र कापला ही गोष्ट तुम्ही एखादे वेळी विसरली तरी चालेल, परंतु माझे सामाजिक विचार मात्र आपण विसरु नये. सामाजिक सुधारणासाठी आणि अस्पृश्योद्वारासाठी धडपडणारे सावरकरांचे मन ईथे दिसते.  जातिसंस्थेवर प्रहार करतांना सावरकर लिहितात, 'जन्मजात जातिसंस्था हा अनुवंशशास्त्राचा प्रयोग आहे. पितृसावर्ण्य, मातृसावर्ण्य, अनुलोम व प्रतिलोम ह्या प्रथांमुळे कोठेही शुद्ध अनुवंश राहिलेला नाही. आजचा जातिभेद हा जन्मजात नसून पोथीजात आहे. अत्यंत आवश्यक असलेल्या सामाजिक क्रांतिस यशस्वी करण्यासाठी आजच्या जन्मजात जातिभेदाचा उच्छेद करुन सामाजिक विषमता आधी नष्ट केली पाहिजे'. (सावरकर समग्र वाङ्गमय-जात्युच्छेदक निबंध ३)
 
             अशा विचारांमुळे अनेकदा स्वजातियांचा रोष सावरकरानी ओढ़वुन घेतला. कारण जातीनिष्ठा जोपासणाऱ्या समाजातच त्यांचा जन्म झाला होता. अस्पृश्यांना दिल्या जाणा-या वाईट वागणुकीबद्दल अनेकदा त्यांनी सवर्णांची कड़क शब्दात कानउघाडनी केली होती. मराठी संतांच्या भोंगळपणावर आणि निष्क्रियतेवर त्यांनी कडाडून हल्ले केले. अलाउद्दीन खिलजीची देवगिरिवर स्वारी झाली त्यावेळी (तेराव्या शतकातील) ज्ञानेश्वर एखाद्या जादुगाराप्रमाने भिंत चालविण्यामध्ये आनंद मानित होते. स्त्रियांच्यावरील अत्याच्यार आणि हिंदुंचे प्रचंड शिरकाण याकडे त्यांचे लक्ष नव्हते. त्यांच्या ज्ञानेश्वरित याचा उल्लेख येत नाही. याची सावरकराना खंत वाटली. दळण करणा-या जनाबाईला गुप्तपने येऊन मदत करणारा विठ्ठल भक्तांच्या मुसलमानाकडून होणा-या कत्तलीबद्दल अवाक्षर काढित नाही किंवा एखादा चमत्कार त्यासाठी करीत नाही, ही गोष्ट दुर्दैवाची होती असे सावरकरानी लिहिले आहे. हिंदुंची निष्क्रियता आणि देवभोळेपणा, जातीयवृत्ति यावर सावरकरानी आयुष्यभर कोरडे ओढले. आणि जातिविहीन समाजरचना व देशाचे स्वातंत्र्य यासाठी सारे जीवन वाहिले.
 
              सावरकरांची दृष्टी अशी असताना देखील डॉ. आंबेडकरांच्याबरोबर त्यांचा संघर्ष का झाला? दोघानाही जातीयता नष्ट व्हावी असे वाटत होते. या देशाचे नुकसान जातीयवादामुळे झाले हे दोघांनाही मान्य होते. संतांच्या निष्क्रीयतेबद्द्ल दोघांचेही एकमत होते. एवढेच नव्हे तर डॉ. आंबेडकरानी केलेल्या समता-संघर्षाला निर्भयपने आणि मन:पूर्वक पाठिंबा सुरवातीला एकट्या सावरकरानी दिला होता. 'केवळ आपदधर्म म्हणून नव्हे तर न्याय म्हणून आपण आपल्या अस्पृश्य बांधवाना त्यांचे परिपूर्ण मानवी अधिकार परत देणे हे सर्व हिन्दुमात्रांचे कर्तव्य आहे'.(स्वातंत्र्यवीर सावरकर - धनंजय कीर, अनुवादक - खांबेटे, पृष्ठ १९४) असे स्पष्ट विचार सावरकरानी मांडले होते.
 
             वास्तविक परिस्थिति अशी जरी असली तरी सामाजिक सुधारणांच्या बाबतीत सावरकरांच्या काही मर्यादा होत्या.  डॉ. आंबेडकर स्वतः दलित म्हणून जन्माला आले होते आणि सर्वसामान्य अशा प्रत्येक अस्पृश्यांच्या नशीबी जे अपमानाचे जीणे होते ते आंबेडकरानी आपल्या आयुष्याच्या पूर्वार्धात अनुभवले होते. सावरकरांच्या पाठीशी या अनुभवांची मदार असणे शक्य नव्हते. तेव्हा या आणि अशा प्रकारच्या इतर अनेक कारणामुळे डॉ. आंबेडकर आणि सावरकर यांच्यामध्ये सामाजिक विचारांच्या संदर्भात अनेकदा संघर्ष उद्भवला.
 
            डॉ. आंबेडकरानी अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशासाठी अनेक सत्याग्रह केले. नाशिक, पुणे आणि अमरावती हे यातील प्रमुख सत्याग्रह होते. स्पृश्य वर्गाबरोबर अस्पृश्यांचा हिंदू म्हणून समान हक्क प्रस्थापित करण्यासाठी हे सत्याग्रह होते. सावरकरानी या सत्याग्रहाना काही वेळा दुरुन पाठिंबा दिला. यापैकी कोणत्याच सत्याग्रहात त्यांनी स्वतः भाग घेतला नाही. त्यांना स्वतः भाग घेणे शक्य नाही म्हणून त्यांनी या सत्याग्रहात भाग घेण्यासाठी आपल्या अनुयायाना पाठविले असे देखील घडले नाही. हे सावरकरानी अपेक्षित केलेल्या हिंदू संघटनेच्या दृष्टीने दुर्दैवी होते. पण यातील खरी गोष्ट अशी की, सवर्ण माणसे आणि अस्पृश्य यांनी एकाच देवळात देवदर्शन घ्यावे ही गोष्ट सावरकराना फारशी रुचनारी नव्हती असे त्यांच्या कृतिवरुन स्पष्ट झाले आहे. कारण रत्नागिरीला केवळ अस्पृश्यांसाठी स्वतन्त्र असे 'पतितपावन' हे मंदिर त्यांनी बांधवुन घेतले. स्पृश्यसाठी असलेल्या सार्वजनिक मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी सावरकरानी कधीही संघर्ष केला नाही आणि 'पतितपावन' हे स्वतंत्र असे मंदिर अस्पृश्यांसाठी उभारण्याची योजना त्यांनी पूर्ण केली. हिंदुत्ववादी सनातनी ब्राम्हण व इतर सवर्ण आणि अस्पृश्य यांच्यामधला संघर्ष टाळण्यासाठी सावरकरानी हे केले असावे. सामाजिक समता प्रस्थापित करावयाची असेल तर संघर्ष अटळ असतो ही साधी गोष्ट सावरकराच्यासारख्या विचारवंताला समजली नव्हती असे म्हणता येईल का? आंबेडकर-सावरकरांच्या संघर्षाची ठिणगी पडली ती इथेच!
 
            बहिष्कृत भारताच्या अग्रलेखात डॉ. आंबेडकरानी या अशी नवी देवळे ख़ास अस्पृश्यांसाठी उभारणा-या लोकांवर कडाडून टिका केली. ते लिहितात 'ज्यांच्या मनात नविन देवळे ख़ास अस्पृश्यांसाठी बांधावी ही कल्पना उद्भवली, त्यांना एक तर अस्पृश्य लोक हिंदूंच्या देवळात जाण्याचा इतका आग्रह का धरतात हे पुरतेपणी लक्षात आले नसावे किंवा नव्या धर्माची नवी देवळे बांधल्याने अस्पृष्यतेचा प्रश्न सोडविला जाईल असे त्यांना वाटत असले पाहिजे. अस्पृश्य लोक देवदर्शनावाचुन तड़फडत आहेत, म्हणून त्यांना तेथे प्रवेश पाहिजे आहे असे नाही, तर त्यांना हिंदू धर्मीय म्हणून तेथे प्रवेश हवा आहे. निराळी देवळे बांधणे हा नड भागविण्याचा मार्ग आहे. तो अस्पृश्यता निवारणाचा मार्ग नव्हे' (बहिकृत भारत, अग्रलेख, ३ जून १९२७)
 
            सावरकरांच्यासारख्या प्रखर वैचारिक माणसाला ही गोष्ट समजू नये ही आश्चर्यकारक बाब होती. सावरकरानी आयुष्यभर अस्पृश्यता निवारणासाठी लोकांच्यामध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला होता. तरी परंतु जन्मजात हिंदुत्व, ब्राम्हण्य आणि त्यायोगे आलेली पारंपारिक प्रतिष्ठा यांची नाळ तोडून टाकण्यात सावरकर यशस्वी होऊ शकले नाहीत, ही गोष्ट इथे सिद्ध होते. अनादी काळापासून समाजात अस्पृश्यांच्या स्वतंत्र वस्त्या आहेत, त्यांच्या स्वतंत्र विहिरी, स्वतंत्र पानवठे आहेत आणि त्यांच्या वस्तीत स्वतंत्र अशी छोटी मोठी देवळेही आहेत. अस्पृश्यानी सवर्णाच्या देवळात प्रवेश मिळविण्यासाठी सत्याग्रह सुरु केला आणि सावरकरानी पुन्हा अस्पृश्यसाठी स्वतंत्र असे 'पतितपावन' हे मंदिर बांधले, ही अत्यंत विचित्र गोष्ट होती. दुर्दैवाने डॉ. आंबेडकरांची विचारधारा शेवटपर्यंत सावरकराना समजू शकली नाही.
 
           आपल्या जातिभेदाविषयक निबंधात सावरकर लिहितात की, 'पोथीजात जातिभेदामुळे उच्च जाती नीच जातिवार जो अत्याचार करतात त्यांचा दोष सा-या जातिंकडे. ते पाप सा-या जातीचे. ते खापर ब्राम्हणांपासून भंग्यापर्यन्त सा-या जातीच्या माथ्यावर फोडले पाहिजे.केवळ ब्रामण क्षत्रियावर नव्हे'. (सावरकर समग्र वाङ्गमय, खंड ३,पृष्ठ १७८)
 
          ब्राम्हण समाजाच्या दांभिकपणावर आणि सनातनी प्रवृत्तिवर डॉ. आंबेडकरानी केलेल्या टिकेमुळे सावरकर अनेक वेळा घायाळ होत असत. जातिभेदाच्या बाबतीत केवळ ब्राम्हणालाच वेठीला धरणे त्यांना अयोग्य वाटते. परंतु वास्तविक या देशाचा सामाजीक इतिहास हे स्पष्टपणे सांगतो की, व्यावहारिक पातळीवर आणि लिखित स्वरुपात जातिभेदाची मुळे मजबूत कोणी करुन ठेवली आहेत, तर ती शहाण्या-सुरत्या आणि लेखन-वाचन करणा-या ब्राम्हण वर्गानेच. या देशातले 'देव ब्राम्हण' काय म्हणतात तेच इतर सा-या समाजाने ऐकले. शिक्षणाची आणि धर्माची मक्तेदारी ही केवळ त्यांचीच होती. धर्मग्रंथ, तत्वज्ञान, वाङ्गमय या सर्व लेखन प्रकारात केवळ वर्णव्यवस्थाच नव्हे, तर विविध जातीची प्रतिष्ठा, स्थान कसे असावे याचे धर्मशास्त्र आणि दंडनीति ब्राम्हणांनीच लिहून ठेवली. मनुस्मुर्ति, विष्णुस्मुर्ती वगैरे स्मुर्तीवाङ्गमय, श्रुतिवागमय यांचे निर्माते बहुतांशी ब्राम्हणच होते. शिवाय या नियमाचे काटेकोर पालन समाजात होते किंवा नाही हे डोळ्यात तेल घालून त्यांनीच सदासर्वकाळ पाहिले आहे. प्राचीन काळात आणि मध्ययुगात क्षत्रिय राजांवर ब्राम्हणांचाच पगडा होता. छत्रपति शिवाजीने तर ब्राम्हणांच्या सांगण्यावरून एकदा नव्हे तर दोनदा राज्याभिषेक करुन घेतला आणि पेशव्यांचे राज्य तर खुद्द ब्राम्हणांचेच आणि या काळात जातीयवाद, अस्पृश्यता तर कळसास पोहोचली होती. सावरकर आणि त्यांच्या समविचारी लोकांना उत्तरे देण्यासाठी डॉ. आंबेडकरानी 'शुद्र पूर्वी कोण होते' हां ग्रंथ लिहिला आहे. आणि त्यामध्ये स्पष्ट केले आहे की, ब्राम्हण वर्गाने या देशातील जातिवादाची मुळे भक्कम पायावर उभी केली. जातिभेदांच्या दोषाचे खापर ब्राम्हणापासून भंग्यापर्यंत सा-या जातीच्या माथ्यावर फोडले पाहिजे, केवळ ब्राम्हणांच्या नव्हे, ही सावरकरांची विचारसरणी मतलबी, मुत्सद्देगिरीची आणि उडवाउडवीची आहे. सावरकर संस्कृतचे गाढ़े व्यासंगी, प्राचीन भारताच्या इतिहासाचे अभ्यासक होते. परंतु जातिभेदाच्या नीतिनियमानी आणि आचार धर्माने भरलेली पोथी-पुस्तके त्यांनी सोयीस्कररित्या दुर्लक्षित केली. परंतु केवळ ब्राम्हणांच्या सोयीसाठी असे दुर्लक्ष सावरकराना करता येणार नाही. सावरकरानी स्वतः अनेक ठिकाणी ब्राम्हणी प्रवृत्तिवर टिका केली आहे. परंतु त्यांच्यावर ते कधीही तुटून पडले नाहीत किंवा त्यांची टीका आग्रही स्वरूपाची कधीही नव्हती. त्यांनी जी टिका केली ती बेताबताने आणि सावधगिरीनेच केलेली आहे. अशा प्रकारच्या धोरणाने सामजिक सुधारणा कधीही होत नसतात. स्वकियाना न दुखावता समाजव्यवस्था बदलू पाहणा-या सावरकराना याच कारणाने सामाजिक क्षेत्रात अपयश आले. आणि शेवटी त्यांची प्रतिमा एक हिंदुत्ववादी म्हणूनच राहिली. सामाजिक संदर्भात ते 'क्रांतिवीर' कधीच होऊ शकले नाहीत आणि ब्राम्हण सोडले, तर सवर्ण हिंदू जातीतिल इतर लोकांनी त्यांचे अनुयायित्व कधीच पत्करले नाही.
 
            देशातील भटशाही किंवा भिक्षुकशाहीवर काही वेळा ते स्वतः टिका करीत असत. परंतु इतरानी किंवा डॉ. आंबेडकरांच्यासारख्या व्यक्तिनी टिका केली, तर ती सावरकराना खपत नसे. वास्तविक असे व्हायला नको होते. भिक्षुकशाहीवर आंबेडकरांनी अनेकदा ताशेरे उडविले,  समविचारी म्हणून सावरकरानी त्यांच्या विचारांचे स्वागत केले नाही. एका अस्पृश्य पुढां-याने आपल्या जातीवर टिका केली यामुळे ते बेचैन झाले असावेत. म्हणून ते एके ठिकाणी म्हणतात, 'भटशाही सर्वत्र आहे. भट म्हणताच जरी ब्राम्हण चटकन डोळ्यापुढे येतो तरी गुरव, गुरु, जंगम, फार काय महारात देखील महार भट आहेतच. ही सारी अब्राम्हण असली तरी भटशाहीच् आहे.' (सावरकर समग्र वाङ्गमय-खंड ३रा, पृष्ठ ७४)
 
          वास्तविक भटशाही किंवा भिक्षुकशाही या शब्दाचा सावरकरानी काढलेला अर्थ हा मुद्द्याला बगल देणारा आहे. भट किंवा भटजी किंवा गुरव हे शब्दार्थाने पाहू गेल्यास देवाची रोज पूजा-अर्चा करणारे, देवाची मूर्ति व्यवस्थित ठेवणारे आणि जो काही नैवद्य, दक्षिणा त्यायोगे मिळेल ते घेत राहाणारे लोक. हे लोक आपले काम भले आणि आपण भले अशा मार्गाने राहाणारे असतात. परंतु डॉ. आंबेडकरानी ज्या भटशाहिवर कडाडून आणि चौफेर हल्ले केले ती ही भटशाही नव्हे. ज्या प्रकारच्या भिक्षुकशाहीवर किंवा भटशाहिवर डॉ. आंबेडकरांचा रोख होता त्या भिक्षुकशाहीचे स्वरूप आणि त्यावरील टिकेचा रोख सावरकरानी का लक्षात घेतला नाही आणि त्याला योग्य अशी उत्तरे का दिली नाहीत हे समजण्यास जागा नाही. या देशातील ब्राम्हण भिक्षुकशाही केवळ देवाची पूजा-अर्चा आणि मिळेल ती दक्षिणा घेणे या मर्यादेत राहिली असती,तर आज जे काही सामाजिक गुंते निर्माण झाले आहेत ते झाले नसते. परंतु या भिक्षुकशाहीने समाजातील अज्ञानी बहुजन समाजाला सर्व क्षेत्रात नागवले. ब्राम्हण भट निरनिराळ्या धार्मिक विधींच्या वेळी कशी प्रचंड दक्षिणा उपटतो, कश्या खोट्या-नाट्या गोष्टी सांगतो याचे सविस्तर वर्णन 'ब्राम्हणांचे कसब' या पुस्तकात फुल्यानी केले आहे. प्राचीन काळात आणि मध्ययुगीन भारतात या ब्राम्हण भिक्षुकशाहीचा राजकारणावर प्रचंड वरचष्मा होता. मौर्य काळातील शेवटचा राजा बृहद्रत यांचा खून आणि हिंदुत्ववादी शुंग घराण्याची स्थापना यामध्ये भिक्षुकशाहिचा सिंहाचा वाटा होता. शिवाजीला राज्यभिषेकाच्या वेळी शुद्र म्हणून नाडविण्यामध्ये भिक्षुकशाहिचा मोठा वाटा होता. कारण राज्याभिषेक हा धार्मिक विधि होता. पेशव्यांच्या काळात अनेक ग्रामण्याची प्रकरणे झाली. तेही भट-भिक्षुकांच्या दबावामुळेच. कोल्हापूरच्या वेदांत प्रकारणातही भटशाहिचाच वाटा होता. कोल्हापूरच्या शाहू राजांना शुद्र संबोधुन वेद-मंत्र म्हणण्यास नकार देणारा माणूस भटशाहिचाच प्रतिनिधि होता.
 
            सावरकर म्हणतात त्याप्रमाणे ब्राम्हण भिक्षुकशाही किंवा भटशाही ही गुरव, जंगम किंवा महारभट यांच्या जोड़ीला बसविण्यासारखी नव्हती. बहुजन समाजातील गुरव जंगम किंवा महारभट यानी ब्राम्हण भटांच्याप्रमाने राजकारणात आणि समाजकारणात हैदोस घातला नाही. परंतु ब्राम्हण भटशाहीने या देशाच्या सामाजिक इतिहासावर दूरगामी परिणाम करुन ठेवले आहेत, त्याचे दुष्परिणाम आपण आजतागायत भोगीत आहोत. डॉ. आंबेडकरांचा विरोध धार्मिक विधिना नव्हता. परंतु हे भट राजकारणात आणि समाजकारणात लुडबुड करणारे होते. श्रेष्ठ-कनिष्ठपणा जपणारे होते. महाडचे तळे अस्पृश्यांनी बाटविले म्हणून त्यात पंचगव्य म्हणजे गाईचे शेण, मूत्र इत्यादि टाकणारे हेच भट होते. टिळकानी समुद्रपर्यटन केले म्हणून त्यांना प्रायश्च्चितासाठी शेणाचा गोळा खायला लावणारी हीच भटशाही होय. आणि अलीकडच्या काळातील जगजीवनराम नावाच्या अस्पृश्य मंत्र्याच्या हस्ते पुतळ्याचे उदघाटन झाल्यानंतर 'बाटलेला' पुतळा गंगेच्या पाण्याने धुवून काढणारी हीच भटशाही होय. तेव्हा या भटशाहिचा इतका ज्वलंत असा प्रतिगामीपणाचा इतिहास असताना सुद्धा याकडे सावरकरानी दुर्लक्ष केले ही खरोखरिच दुर्दैवाची बाब होय.

            सावरकरानी डॉ. आंबेडकरांच्या धर्मांतरावर टिका केली. आणि त्या संदर्भात त्यांनी बौद्ध धर्मातील वैगुण्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी त्यांनी 'सन्यस्त खड:ग' हे नाटक सुद्धा लिहिले. आपल्या हिंदू बांधवाना बौद्ध तत्वज्ञानापासून सावध राहण्याचा इशारा देत असताना सावरकर म्हणतात, 'खरोखर बौद्ध धर्म हा विश्वव्यापक तत्वाचा धर्म होता. तरी देखील त्याला जगातील लोकांच्या अंत:करणातुन पाशवी मनोवृत्तिचि बीजे किंवा राजकीय आकांक्षा नष्ट करता आल्या नाहीत आणि हिंदुस्थानला बिनधोकपणे तलवारीच्या ऐवजी जपमाळ हाती धरता यावी अशी परिस्थिती निर्माण करता आली नाही'. (स्वातंत्र्यवीर सावरकर- लेखक धनंजय कीर, अनुवादक-खांबेटे, पृष्ठ २८३-२८४)

           वास्तविक जी गोष्ट सावरकरांच्या प्राणप्रिय अशा हिंदू धर्माला सुद्धा साधता आली नाही किंवा जगातील अन्य धर्माला साधता आली नाही ती गोष्ट केवळ बौद्ध धर्माकडून सावरकर सावरकर अपेक्षित करतात यामध्ये त्यांचा बौद्ध धर्माबद्दल आकस दिसून येतो. जन्मत:च असणा-या माणसामधील पाशवी प्रवृत्तिवर नियंत्रण करण्याचे उदिष्ट प्रत्येक धर्माचे आहे. प्रत्येक माणसाला 'देव' करणे किंवा देवत्वाप्रत पोहचणे हे कोणत्याही धर्माचे ध्येय नसते. कारण ती गोष्ट सर्वथा अशक्य असते. माणसामधील पशुत्व पूर्णपणे नष्ट करुन त्याला हातात जपमाळ धरता यावी अशी परिस्थिति निर्माण करुन देण्यात जर धर्मशास्त्रे यशस्वी झाली असती तर 'एका गालावर मारले तर दूसरा गाल पुढे करावा' असे सांगणा-या ख्रिश्चन धर्माच्या अनुयायानी अनेक धर्मयुद्धे केली नसती. यूरोपात धर्माच्या नावावर जितके रक्त सांडले गेले तितके अन्य कोणत्याही कारणासाठी सांडले गेले नाही.

         पाप, अनाचार आणि आक्रमण यांचा प्रतिकार करण्याची बुद्धीच् बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाने नष्ट होते आणि त्यामुळे क्षात्रतेज नाहीसे होते असे सावरकरानी प्रतिपादन केले आहे. वास्तविक उत्तर वैदिक काळात भारतात ब्राम्हण पुरोहित वर्गाने प्रचंड अनाचार माजविला होता. यज्ञात जिवंतपणे प्राण्याना जाळण्यात येत होते आणि याच पार्श्वभूमिवर बौद्ध तत्वज्ञानात अहिंसेचे अधिष्ठान निर्माण झाले आहे. परंतु बौद्ध तत्वज्ञानातील अहिंसा ही दुबळी आहे असे सावरकर म्हणतात. असे जर असते तर ज्या ज्या राजांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता, त्यांनी सर्वसंगपरित्याग करुन सन्यास घेतला असता व त्यांची राज्येच नष्ट झाली असती. सम्राट अशोकाने आपल्या धर्मांतरानंतर विनाकारण युद्ध करावयाचे नाही हे धोरण आपल्या समोर ठेवले होते, तरी सुद्धा त्याने क्षात्रवृत्ति अव्हेरली नाही. आपले सैन्य कमी केले नाही. उलट त्याचे राज्य प्रचंड विस्तारित झाले होते. बौद्ध राजा हर्षवर्धन तसेच कनिष्क आणि राजा मेनेंडर यानी बौद्ध धर्माच्या स्विकारानंतर अनेक लढाया केल्या आणि आपली राज्ये विस्तारित केली. सा-या आशिया खंडाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. म्हणून तेथील सारे देश दुबळे आणि क्षात्रतेजहीन झाले काय? जपानचा राष्ट्रीय धर्म हा बौद्ध धर्म आहे. परंतु पहिल्या आणि दुस-या जागतिक महायुद्धात अमेरिकेसारख्या प्रचंड देशाला मेटाकुटिस आणले. चीन देशावर बौद्ध धर्माचा प्रचंड प्रभाव, परंतु या देशात अनेक राजकीय क्रांत्या झाल्या. माओच्या क्रांतीमध्ये क्षात्रतेज नव्हते असे कोण म्हणू शकेल? परंतु सावरकरांचे हिंदुत्ववादी आग्रही मन हे मानण्यास तयार नाही. या देशाला ख-या अर्थाने दुबळे आणि तेजोरहित कोणी केले असेल तर या देशातील अंतर्गत हेवेदावे, प्रांतवाद, जातीयवाद आणि जातीयवादी हिंदूतत्वज्ञान यांनी, आपसातील फाटाफुटिमुळे या देशाला अनेक आघाड्यांवर पराभव पत्करावे लागले आहेत. संकुचित वृत्तिचे राजे, संस्थानिक, स्वार्थासाठी फंदफितूरी करणारे लोक, राजकारण आणि समाजकारण नासवणारी येथील भिक्षुकशाही यांनी ख-या अर्थाने या देशाला दुबळे केले व म्हणूनच देश अनेक परकीय आक्रमणाना बळी पडला. पेशवे क्षात्रतेजाचे होते, ते बौद्ध नव्हते मग त्यांचा पराभव पानीपतच्या तिस-या युद्धात का झाला? राजा पोरस, पृथ्वीराज चव्हाण, राणा संग्रामसिंह, राणा प्रतापसिंह, यांचा पराभव अनुक्रमे सिकंदर, महम्मद घोरी, बाबर आणि अकबर यांच्याकडून झाला, हे सारे क्षात्रतेजाचे हिंदू असताना सुद्धा का पराभव झाला? विजयनगरचे हिंदू राज्य मुसलमानानी का घुळीला मिळविले? तेव्हा सावरकरानी बौद्ध धर्मावर टिका करीत असताना या देशाचा इतिहास पुन्हा एकदा चळला असता तर बरे झाले असते. गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश म्हणजे क्षात्रतेजाचा उपदेश आहे, म्हणून  सा-या हिंदुना क्षात्रतेजाने तळपणारी माणसे ठरविणे हास्यास्पद आहे ही गोष्ट आपण अनेक आक्रमणाना बळी पडलो यावरून सिद्ध होते.
 
           पंजाब येथील जातपाततोड़क मंडळातर्फ ठरलेल्या व्याख्यानामध्ये आंबेडकरानी सांगितले होते की, या देशाचा इतिहास पराभवाचा इतिहास आहे. सावरकराना हे विधान अतिशय झोंबले, म्हणून त्यांनी 'विजयशील हिंदू राष्ट्र' नावाचा एक लेख लिहून आंबेडकराना उत्तर दिले. आणि पुढे त्यांनी याच विषयावर 'हिन्दुस्थानच्या इतिहासातील सहा सोनेरी पाने' हे पुस्तक लिहिले. हिन्दुस्थानला वैभवशाली आणि विजयाचा इतिहास आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. वास्तविक सावरकरांचे हे लेखन अट्टाहासाचे आणि हिंदुत्ववादी आग्रही भूमिकेचे होते. या देशावर झालेल्या सिकंदरच्या स्वारीपासून ते ब्रिटिश्यांच्या सत्तेपर्यंत शेकडो आक्रमकानी स्वा-या केल्या आणि त्यामुळे १९४७ पर्यन्त या देशातील लोकांना गुलामितच जीवन कंठावे लागले. हा या देशाचा शेकडो वर्षाचा इतिहास आहे. आपल्या देशावर ख़िलजी, गुलाम, तुग़लक़, लोदी आणि मोगल मुसलमानानी आठ-नाऊशे वर्षे निर्धास्तपणे राज्य केले. अर्धा अधिक देश मुसलमान केला. ब्रिटिशानी दिडशे वर्षे राज्य केले. असे असताना सुद्धा भारताला विजयशील हिंदू राष्ट्र म्हणणे हा हटवादीपणाचा भाग आहे.
 
संदर्भ - डॉ. आंबेडकरांचे विरोधक,
         लेखक - डॉ. दिनकर हेरलेकर