असं बोलल्यामुळे भारतातील राष्ट्रवादी आणि देशभक्त मला जातीयवादी ठरवतील. मी त्याला घाबरत नाही. भारत हा एक त-हेवाइक देश आहे आणि तेथील राष्ट्रभक्त व देशभक्त असा आहे की जो आपल्या देशबांधवांना माणसापेक्षाही नीच वागणूक मिळत असतांना देखील उघड्या डोळ्यांनी पाहतो तो. परंतु त्याची मानवता त्याविरुद्ध कधीच निषेध व्यक्त करीत नाही. लोकांचा एक मोठा वर्ग सार्वजनिक उद्योगधंद्यात येऊ दिला गेला नाही अशी या राष्ट्रभक्ताला खात्रीने माहिती असते. पण त्याच्या न्यायरक्षणार्थ आणि त्याला न्याय्यसंधी देण्याकरिता त्याला त्याच्या कर्त्यव्याची जाणीव होत नाही. मानवाला आणि समाजाला हानिकारक अशा शेकडो दृष्ट रुढिंची त्याला जाणीव असते. परंतु त्याला या उद्वेग आणणा-या गोष्टींचा वीट आलेला नसतो. या देशभक्ताची, त्याला व त्याच्या वर्गाकरिता अधिकार आणि अधिक अधिकार ही एकच आरोळी असते. मला आनंद होत आहे की मी अशा देशभक्ततांच्या वर्गापैकी नाही. मी अशा वर्गापैकी आहे की जो स्वतः लोकशाहीचा पाठीराखा आहे आणि जो कोणत्याही आकारात आणि पद्धतीत असलेल्या एकाधिकारशाहिचा विध्वंसक आहे.
- डॉ बाबासाहेब आंबेडकर
डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड १८, भाग १