१) कथक संहिता आणि मैत्रयाणी संहिता - "अग्निहोमासाठी ज्या गाईच्या दुधाचा उपयोग करावयाचा आहे, ते दूध शुद्राला मिळू देऊ नये."
२) शतपथ ब्राम्हण, मैत्रयाणी संहिता आणि पंचवीस ब्राम्हण - "यज्ञ करीत असता शूद्रांशी बोलू नये आणि यज्ञाच्या वेळी शुद्राने उपस्थित होऊ नये."
३) शतपथ ब्राम्हण आणि कथक संहिता - "सोमरस पिण्याच्या वेळी शुद्राला जवळ येऊ देऊ नये. सोमरस पिऊ देऊ नये."
४) ऐतरेय ब्राम्हण आणि पंचवीस ब्राम्हण - "शुद्र हा दुस-यांचा नोकर आहे. (आणि नोकराच्या कामाशिवाय त्याला कोणतेही काम करता येणार नाही)"
५) आपस्तंब धर्मसूत्र - शुद्र व जातिबहिष्कृत माणूस या दोघांना स्मशान भूमिप्रमाणे समजावे.
वेदाभ्यासी विद्यार्थी आणि शुद्र वा स्त्री यांची सहज नजरभेट झाली तरी त्या विद्यार्थ्याने वेदघोष बंद केले पाहिजेत.
अस्वच्छ ब्राम्हण किंवा इतर द्विज जातीतील अस्वच्छ माणूस यांनी अन्नाला स्पर्श केला तर ते अन्न अस्वच्छ होते, पण ते खाण्यास अयोग्य होत नाही. परंतु अस्वच्छ शुद्राने काहीही आणलेले असो - मग त्याला त्याचा स्पर्श झालेला असो वा नसो - ते कदापिही खाऊ नये.
एखाद्याला शुद्राचा स्पर्श झाला तर त्याने जेवण घेऊ नये.
६) विष्णुस्मृती - शूद्रांनी द्विज जातीतील मृत मनुष्याला, मग तो मृत मनुष्य जरी त्या शुद्राचा बाप असला तरी, उचलून स्मशानात नेऊ नये.
७) वसिष्ठ धर्मसूत्र - सुतार, परीट,कुलाल, हेर आणि पायताणे शिवणारा चांभार यांनी दिलेले अन्न खाऊ नये. त्याचप्रमाणे, शुद्राने दिलेले अन्न खाऊ नये.
दृष्ट शुद्रवंश ही स्मशानभुमी होय हे उघड़ आहे. म्हणून शूद्रांच्या सानिध्यात वेदघोष कधीही करु नये.
काहीजण विद्याभ्यास करुन व काही घोर तपस्या करुन दान स्वीकारण्यास योग्य झाले. परंतु ज्याच्या पोटात शुद्राने दिलेले अन्न गेलेले नाही, असा ब्राम्हण दान स्वीकारण्यास सर्वांपेक्षा योग्य होय.
शुद्राने दिलेले अन्न पोटात असता जर ब्राम्हण मेला तर पुढच्या जन्मात तो एखाद्या गावातील डुक्कर म्हणून जन्मेल; किंवा ज्या शुद्राचे अन्न त्याच्या पोटात होते त्या शुद्राच्या कुटुंबात तो ब्राम्हण पुढील जन्म घेईल.
कारण शूद्रांचे अन्न खाल्ल्यामुळे त्या अन्नाची सत्वे ब्राम्हणाच्या रक्तमांसात मिसळलेली असतील, अशा स्थितीत त्याने वेदमंत्रांचा घोष दररोज केला किंवा त्याने दररोज अग्नीची पूजा केली किंवा परमेश्वराची प्रार्थना केली, तरी तो स्वर्गाच्या मार्गाला जाऊ शकणार नाही.
परंतु, जर ब्राम्हण शुद्राचे अन्न खाल्ल्यानंतर सजातीय पत्नीबरोबर रममाण झाला व त्यापासून त्याला मुलगे झाले तर ते मुलगे शुद्र जातीचे मानण्यात येतील; व अशा त-हेच्या ब्राम्हणाला स्वर्गप्राप्ती होणार नाही.
८) मनुस्मृति - शुद्रांचे राज्य किंवा अधार्मिक लोकांनी चालविलेले राज्य, अथवा धर्मलंड लोकांनी हल्ला करुन घेतलेले राज्य किंवा हलक्या कुळात जन्मलेल्या लोकांनी काबिज केलेले राज्य यात ब्राम्हणाने वास्तव्य करु नये.
जो ब्राम्हण शूद्रांसाठी यज्ञकर्म करतो त्याला श्राद्धविधिसाठी आमंत्रण देऊ नये. श्राद्धाच्या जेवणापासून जे काही फायदे होणार असतील ते अशा ब्राम्हणांच्या उपस्थितिमुळे नष्ट होतील.
शुद्राचे प्रेत गावाच्या दक्षिण वेशीतून स्मशानाकडे न्यावे; परंतु द्विजांची प्रेते अनुक्रमे पश्चिम, उत्तर व पूर्व वेशीतून स्मशानाकडे न्यावीत.
९) आपस्तंब धर्मसूत्र - उजवा हात पुढे करुन व तो कानांच्या समांतर रेषेत धरून ब्राम्हणाने नमस्कार करावा. उजवा हात छातीच्या पुढे आडवा धरून क्षत्रियाने नमस्कार करावा. उजवा हात कमरेच्या समांतर रेषेत करुन वैश्याने नमस्कार करावा. दोन्ही हात जोडून व खाली लववून व पुढे करुन शुद्राने नमस्कार करावा.
ब्राम्हणाच्या घरी शुद्र पाहुणा म्हणून आला तर पहिल्यांदा त्या शुद्र पाहुण्याला काहीतरी काम करावयास लावावे व त्यानंतर वाटल्यास जेवण द्यावे. शुद्राकडून काही काम करुन न घेता त्याला जर ब्राम्हणाने जेवण दिले तर ब्राम्हणाने त्या शुद्राचा आदरसत्कार केला असे होईल.
अथवा ब्राम्हणाच्या घरात जे चाकर असतील त्यांनी राजकोठारातून तांदूळ आणावेत व त्या शुद्र पाहुण्याला पक्वान्न घालून त्याचे आदरातिथ्य करावे.
१०) विष्णुस्मृती - आपल्या घरी एखाद्या शुद्राचा जो आदरसत्कार करील किंवा जो देवासाठी तयार केलेले हवनपदार्थ अथवा श्राद्धाचे अन्न एखाद्या धार्मिक तपस्व्याला देईल त्याला १०० पण दंड भरावा लागेल.
११) मनुस्मृति - ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य यांना संपत्ती, नातेवाईक, वयोमान, धर्मपंथ व ज्ञान या पाच कारणांनी समाजात आदर मिळतो. शेवटचे कारण हे अत्यंत महत्वाचे आहे. परंतु एखाद्या शुद्राजवळ संपत्ती व ज्ञान याचे केवढेही भांडार असले तरी तो केवळ त्या कारणामुळे आदरास पात्र ठरत नाही. शुद्र आपल्या वयोमानाने मात्र आदरास पात्र होतो; मात्र तो जेव्हा १०० वर्षाचा होतो तेव्हाच, त्यापूर्वी नाही.
ब्राम्हणाच्या घरात जर क्षत्रिय, वैश्य अगर शुद्र राहिला तर त्या ब्राम्हणाचा तो पाहुणा किंवा मित्र किंवा नातेवाईक अथवा गुरु म्हणून होत नाही. (म्हणजे फ़क्त ब्राम्हण दुस-या ब्राम्हणाच्या घरात पाहुणा होतो. दुस-या कोणाला पाहुणा होता येत नाही.)
ब्राम्हणाच्या घरचे जेवण आटोपल्यावर त्या घरात जर एखादा क्षत्रिय पाहुणा म्हणून आला तर सदर ब्राम्हणाने त्याला त्याने मागितले तर अन्न द्यावे.
जर वैश्य अगर शुद्र ब्राम्हणाच्या घरी पाहुणा म्हणून आला तर त्या ब्राम्हणाने पाहुण्याला आपल्या नोकरांच्या हस्ते अन्न द्यावे व गोड बोलावे.
१२) एखाद्याने क्षत्रियाला ठार मारले तर त्याने पापक्षालनार्थ ब्राम्हणास एक हजार गाई द्याव्यात.
एखाद्याने वैश्याला ठार मारले असेल तर त्याने पापक्षालनार्थ ब्राम्हणाला शंभर गाई दान द्याव्यात.
एखाद्याने जर शुद्राला ठार मारले असेल तर त्याने पापक्षालनार्थ ब्राम्हणाला दहा गाई द्याव्यात.
१३) गौतम धर्मसूत्र - क्षत्रियाने ब्राम्हणाला शिवीगाळ केली तर त्या क्षत्रियाला शंभर पणांचा दंड करावा.
क्षत्रियाने ब्राम्हणाला मारहाण केली तर त्याला दोनशे पणांचा दंड करावा.
वैश्याने ब्राम्हणाला शिवीगाळ केली तर त्या वैश्याला दीडशे पणांचा दंड करावा.
परंतु ब्राम्हणाने क्षत्रियाला शिवीगाळ केली तर ब्राम्हणाला पन्नास पणांचा दंड करावा.
ब्राम्हणाने वैश्याला शिवीगाळ केली तर ब्राम्हणाला पंचवीस पणांचा दंड करावा.
ब्राम्हणाने शुद्राला शिवीगाळ केली तर त्याला कोणत्याही प्रकारची शिक्षा करु नये.
१३) बृहस्पती धर्मसूत्र - ब्राम्हणाने क्षत्रियाला शिवीगाळ केली तर त्या ब्राम्हणाला पन्नास पणांचा दंड करावा; त्याने जर वैश्याला शिवीगाळ केली तर त्याला पंचवीस पणांचा दंड करावा; अणि त्याने शुद्राला शिवीगाळ केली तर त्याला साडेबारा पणांची शिक्षा करावी.
जो शुद्र आपल्या धर्मानुसार वर्तन करतो त्याला जर ब्राम्हणाने शिवीगाळ केली तरच या बाबतीत सांगितलेली शिक्षा ब्राम्हणाला देता येते. पण जर तो शुद्र शुद्धाचरणी नसेल तर अशा शुद्राला ब्राम्हणाने शिवीगाळ केली तर तो ब्राम्हणाचा गुन्हा होत नाही.
१४) मनुस्मृति - क्षत्रियाने ब्राम्हणाला शिवीगाळ केली तर क्षत्रियाला शंभर पणांचा दंड केला पाहिजे. वैश्याने ब्राम्हणाला शिवीगाळ केली तर वैश्याला अडीचशे पणांचा दंड करावा. परंतु शुद्राने ब्राम्हणाला शिवीगाळ केली तर शुद्राला देहदंडाची शिक्षा दिली पाहिजे.
ब्राम्हणाने क्षत्रियाचा अपमान केला तर ब्राम्हणाला पन्नास पणांचा दंड करावा. ब्राम्हणाने वैष्याचा अपमान केला तर ब्राम्हणाला पंचवीस पणांचा दंड करावा. ब्राम्हणाने शुद्राचा अपमान केला तर त्याला बारा पणांचा दंड करावा.
ब्राम्हणाने ब्राम्हणाला ठार मारले तर त्याचे सर्व तप:सामर्थ्य नष्ट झाले असे समजावे. ब्राम्हणाने क्षत्रियाला ठार मारले तर त्याचे एक चतुर्थांश तप:सामर्थ्य नष्ट झाले असे समजावे. ब्राम्हणाने वैश्याला ठार मारले तर त्याचे एक अष्टमांश तप:सामर्थ्य नष्ट झाले असे समजावे. ब्राम्हणाने शुद्राला ठार मारले तर, तो जर शुद्धाचरणी असेल तर त्या ब्राम्हणाचे एक सोलांश तप:सामर्थ्य नष्ट झाले असे समजावे.
परंतु जर ब्राम्हणाने क्षत्रियाला अनैछीकपणे ठार केले तर पापक्षालनार्थ त्या ब्राम्हणाने एक हजार गाई व बैल यांचे दान (वाटल्यास) करावे.
१५) विष्णुस्मृती - खालच्या जातीचा माणूस वरच्या जातीच्या माणसाचा जर अपमान करील अगर त्याला इजा करील तर यासाठी खालच्या जातीचा माणूस आपल्या ज्या अवयवाचा उपयोग करील ते अवयव राजाने तोडून टाकले पाहिजेत.
जर खालच्या जातीचा माणूस वरच्या जातीच्या माणसाबरोबर समानतेच्या भावनेने बसला तर त्याच्या ढुंगणावर डाग देऊन त्याला हद्दपार करावे.
खालच्या जातीचा माणूस जर वरच्या जातीच्या माणसाच्या अंगावर थुंकला तर खालच्या जातीच्या माणसाचे दोन्ही ओठ कापून टाकावेत.
खालच्या जातीचा माणूस जर वरच्या जातीच्या माणसाकडे घाण वारा सोडेल तर त्याचे कुल्ले कापून टाकावेत.
जर त्याने शिवीगाळ (वरच्या जातीच्या माणासाबद्दल) केली तर त्याची जीभ छाटून काढावी.
नीच जातीत जन्मलेला माणूस वरिष्ठ जातीत जन्मलेल्या माणसाला त्याच्या कर्तव्याबद्दल उपदेश करु लागला तर राजाने त्या नीच जातीतील माणसाच्या तोंडात कढत तेल ओतण्याची शिक्षा द्यावी.
वरिष्ठ वर्गातील एखाद्या मनुष्याच्या नावाचा किंवा जातीचा एखाद्या शुद्राने चेष्टेने उल्लेख केला तर तापवून लालबुंद झालेली लोखंडाची सळई त्या शुद्राच्या तोंडात दहा अंगुळे कोंबावी.
१६) जो शुद्र धार्मिक तत्वांची शिकवण दुस-याला देईल किंवा वेदमंत्रांचा उच्चार करील, अथवा एखाद्या ब्राम्हणाचा अपमान करील त्याची जीभ कापून टाकली पाहिजे.
१७) गौतम धर्मसूत्र - एखादा शुद्र जर स्वेच्छेने वेदमंत्रांचा घोष ऐकत राहिला तर कथिल व लाख यांचे तापविलेले रस त्याच्या कानात ओतावे.
तो जर वेद वाचू लागला तर त्याची जीभ छाटून टाकावी.
वेद जर त्याला मुखोद्गगत झाले असतील तर त्याला माधोमध उभे चिरून टाकावे.
१८) मनुस्मृति - जो पैसे घेऊन विद्या शिकवितो, त्याचप्रमाणे जो पैसे देऊन शिकतो, जो शुद्र शिक्षकाचा पेशा करतो व जो शुद्रापासून शिकतो, अशा माणसाला देव पितृ यांच्या सन्मानार्थ जे विधि करतात त्या विधिला उपस्थित राहण्याचे आमंत्रण देऊ नये.
शुद्राला कोणी सल्लामसलत देऊ नये किंवा त्याला देवाला वाहून उरलेले अन्न अथवा लोणीही देऊ नये.
शुद्राला कायदेकानून कोणी शिकवू नये किंवा त्याला धार्मिक विधि करण्याबद्दलची माहिती कोणी देऊ नये. ही आज्ञा जो पाळणार नाही तो त्या शुद्राबरोबर असमव्रत्त नावाच्या नरकाच्या घोर अंधारात खितपत पडेल.
१९) मनुस्मृति - मनात कोणत्याही प्रकारचा किंतु न आणता ब्राम्हणाने शुद्राच्या वस्तु आपल्या ताब्यात घ्याव्यात. कारण स्वतःची चिजवस्तू शुद्राला असते. तो गुलाम आहे व त्याची जी काही चिजवस्तू असेल तिच्यावर त्याचा हक्क नसतो, तर त्याच्या धन्याचा असतो.
शुद्र धनसंचय करण्यास समर्थ असला तरी त्याने संपत्ती कमवू नये. कारण शुद्राजवळ असलेली संपत्ती पाहिल्याबरोबर ब्राम्हणाच्या चित्ताला वेदना होतात.
२०) मनुस्मृतिचा राजाला उपदेश - स्वतःच्या जन्माच्या आधारे जो आपल्याला ब्राम्हण म्हणवून घेतो किंवा जो स्वतःला कोणत्याही गोष्टीचा आधार न घेता ब्राम्हण म्हणवून घेतो, तो राजाची इच्छा असेल तर, कायदेकानूनची घोषणा करील. शुद्राला असली घोषणा करण्याचा कधीही अधिकार नसतो.
शुद्र न्यायनिवाडा करीत असता राजा जर नुसता पाहात राहील तर दलदल चिखलात गाय जशी बुडते तसे त्या राजाचे राज्य दुर्दैवाच्या खाईत बूडन जाईल.
ज्या राज्यात शूद्रांचा प्रामुख्याने भरणा आहे आणि ज्यात धर्मलंड लोकांचा बुजबूजाट झालेला आहे व ज्यात द्विज वर्णाचा एकही माणूस नाही, असले राज्य दुष्काळ आणि निरनिराळ्या रोगांच्या साथी यांच्या ताडाख्यांनी समूळ नष्ट होईल.
२१) आपस्तंभ धर्मसूत्र - पवित्र धार्मिक आदेश पाळण्याच्या बुद्धीने जे घोर तपश्चरणे करतात, ब्राम्हणांचे पाय घुवून जे शुद्र आपले जीवन घालवितात आणि जे आंधळे, मुके, बहिरे आणि व्याधिग्रस्त आहेत अशा लोकांना सरकारी कर माफ़ असावा. त्रैवर्णिकांची सेवाचाकरी करणे हे शास्त्राने विहित केलेले आहे. शुद्र जसजशी उच्च जातीतील माणसांची सेवाचाकरी करील तसतशी त्याला उच्च दर्जाची पुण्याई लाभेल.
त्रैवर्णिकातील एखाद्या माणसाने शुद्र जातीच्या स्त्रिशी व्यभिचार केला तर त्याला हद्दपार करावे.
एखाद्या शुद्राने त्रैवर्णिक स्त्रीशी व्यभिचार केला तर त्याला देहांताची शिक्षा केली पाहिजे.
२२) गौतम धर्मसूत्र - एखाद्या शुद्राने आर्य स्त्रीशी जर जबरी संभोग केला असेल तर त्याचे लिंग तोडून टाकावे आणि त्याची मालमत्ता जप्त करावी.
ज्या आर्य स्त्रीबरोबर शुद्राने जबरी संभोग केला असेल, तिला जर कोणी पालक असेल तर त्या शुद्राला प्रथम उपरनिर्दिष्ट शिक्षा द्यावी व त्यानंतर त्याला ठार मारावे.
२३) मनुस्मृति - एखाद्या शुद्राने सर्वात वरिष्ठ जी जात आहे त्याच जातीतील मुलीच्या (ब्राम्हण मुलीच्या) प्रेमाची याचना केली तर त्याला देहांताची शिक्षा द्यावी.
२४) वसिष्ठ धर्मसूत्र - वाईट वासना करणे, मत्सर करणे, असत्य बोलणे, ब्राम्हणांबद्दल वाईट रितीने बोलणे, पाठीमागे निंदा करणे आणि क्रौर्य ही शूद्रांची लक्षणे होत.
२५) विष्णूस्मृति - ब्राम्हणाच्या मुलाला जे नाव ठेवावयाचे ते मंगलकारक असावे; क्षत्रियाच्या मुलाला जे नाव ठेवावयाचे ते अधिकारदर्शक असावे; वैश्याच्या मुलाला जे नाव ठेवावयाचे ते संपत्तीदर्शक असावे आणि शुद्राच्या मुलाला जे नाव ठेवावयाचे ते तिरस्कारदर्शक असावे.
२६) गौतम धर्मसूत्र - फ़क्त एकदाच जिच्यामध्ये मनुष्याचा जन्म होतो अशा चवथ्या जातीत शुद्राचा जन्म होतो. तो वरिष्ठ जातीची सेवाचाकरी करतो. सेवाचाकरीचा मोबादला जो वरिष्ठ जातीकडून मिळेल त्यावर त्याने गुजराण करावी. वरिष्ठ जातीतील लोकांनी वापरून टाकलेले जोड़े त्याने घालावेत. वरिष्ठ जातीतील लोकांनी खाऊन जे अन्न शिल्लक राहिले असेल तेच अन्न त्याने खावे.
दृष्ट बुद्धीने शिव्या देऊन त्रैवर्णिक जातीतील लोकांची जाणूनबुजून हेटाळणी करणे किंवा दृष्ट बुद्धीने त्यांना हाणमार करणे, असे वर्तन जे शुद्र करतात त्यांचे अवयव (सदर वर्तन करतांना वापरलेले अवयव) छाटून टाकावेत.
द्विज जातीत जन्मलेल्या माणसाबरोबर समानतेच्या भावनेने बसणे, झोपणे, संभाषण करणे किंवा रास्त्याने चालणे, असले वर्तन जो शुद्र करतो त्याला ठार मारावे.
२७) मनुस्मृति - एखाद्या शुद्राला, मग तो शुद्र गुलाम म्हणून विकत घेतलेला असो वा नसो, एखाद्या ब्राम्हणाने गुलामाचे काम करावयास भाग पाडले तर त्या ब्राम्हणाला कोणतीही शिक्षा करु नये. कारण ब्राम्हणांची सेवा करण्यासाठीच स्वयंभू परमेश्वराने शुद्राला जन्माला घातले आहे.
धन्याने शुद्राला स्वतःच्या नोकरीतून मोकळे केले असले तरी तो शुद्र आपल्या गुलामगिरीतुन मुक्त होऊ शकत नाही. कारण गुलामगिरी ही त्याच्या जन्माची सोबतीण आहे. मग त्याच्यापासून तिला कोण मुक्त करु शकेल?
नावलौकिक कमावलेले, वेदांचा अर्थबोध जाणणारे आणि कुटुंबवाले जे ब्राम्हण आहेत त्यांची आज्ञा पाळणे हेच शूद्रांचे श्रेष्ठतम कर्तव्यकर्म होय. हे कर्तव्यकर्म करण्यानेच शुद्र आपल्या कल्याणाची तरतूद करुन ठेवतो.
जो शुद्र वरिष्ठ जातीतील लोकांची आज्ञा पालन करील आणि ब्राम्हणांशी सदैव नम्रतेने वागेल तो पुढील जन्मी उच्च जातीत जन्म घेईल.
ज्या शुद्राला जीवनाचे संगोपन आणि स्वर्ग प्राप्ती याची इच्छा असेल त्याने ब्राम्हणाची चाकरी करावी. कारण तो चाकरी करतांना त्याच्या कडून "ब्राम्हण" हा शब्द वेळोवेळी उच्चारला जाईल आणि त्यामुळे त्या शुद्राला जे काही कर्तव्य करावयाचे आहे त्याची पूर्ति झाली असे होईल.
ब्राम्हणाची सेवा करणे हाच शुद्राचा उत्तमोत्तम धंदा होय. कारण त्याव्यतिरिक्त त्याने दूसरा धंदा केला तर त्यामुळे त्याचा काही फ़ायदा होणार नाही.
घरात शिल्लक राहिलेले अन्न, जूने कपडे, कुजके धान्य आणि जूनी लाकड़ी आसने ही ब्राम्हणांनी आपल्या शुद्र नोकरास द्यावीत.
ब्राम्हणाचे मंगलसूचक, क्षत्रियाचे सत्तासुचक, वैश्याचे संपत्तीसूचक आणि शुद्राचे तिरस्कारदर्शक असे प्रत्येकाचे नाव असावे.
द्विज जातीत जन्मलेल्या माणसाची अत्यंत घाणेरडया शब्दांनी जो विटंबना करतो त्याची जीभ कापून टाकावी कारण विटंबना करणारा कनिष्ठ जातीचा समजला पाहिजे.
जर तो द्विज जातीचा उल्लेख अत्यंत अपमानकारक रीतीने करीत असला तर तापवून लाल केलेली लोखंडाची दहा बोटे लांबीची सळी त्याच्या तोंडात खुपसावी.
जो माणूस अहंकाराच्या भरात पुरोहिताला त्याच्या कर्तव्य कर्माबद्दल जर काही सूचना देऊ लागला तर राजाने अशा माणसाच्या कानात व तोंडात कड़क तापविलेले तेल ओतवावे.
जर एखादा माणूस आपल्या अवयवाने वरिष्ठ जातीतील माणसाला दुखापत करील तर त्या माणसाचा तो अवयव कापून टाकावा हा मनुचा दंडक आहे.
जर तो माणूस वरिष्ठ जातीतील माणसावर हात अगर काठी उगारील तर त्याचा हाट छाटून टाकावा आणि रागाने तो जर वरिष्ठ जातीतील माणसाला लाथेने मारील तर त्या माणसाचे दोन्ही पाय छाटून टाकावेत.
कनिष्ठ जातीत जन्मलेला माणूस वरिष्ठ जातीत जन्मलेल्या माणसाबरोबर बसला तर त्याच्या ढुंगणावर डाग देऊन त्याला हद्दपार करावे, किंवा राजाने त्याचे ढुंगण कापवावे.
कनिष्ठ जातीतील माणूस वरिष्ठ जातीतील माणसावर जर मगरुरपणाने थुंकला तर राजाने त्याचे दोन्ही ओठ कापावेत. त्याने जर वरिष्ठ जातीच्या माणसावर लघवी केली तर त्याच्या शिस्नाचा पुढचा भाग कापवावा, आणि वरिष्ठ जातीच्या माणसाकडे घाण वारा सोडला तर त्याचे गुदद्वार कापवावे.
कनिष्ठ जातीतील माणसाने जर वरिष्ठ जातीच्या माणसाचे केस पकडून धरले तर राजाने काही विचार न करता त्याचे दोन्ही हात कापवावेत; जर त्याने वरिष्ठ जातीच्या माणसाचे पाय, दाढ़ी, मान किंवा अंडकोष पकडले तर त्याचे दोन्ही हात कापवावेत.
२८) नारद स्मृति - शुद्र जातीत जन्मलेल्या लोकांनी द्विज जातीत जन्मलेल्या आर्य लोकांविरुद्ध जर खोटे आरोप केले तर सरकारी अधिका-यांनी त्या शुद्र लोकांच्या जीभा माधोमध चिराव्यात आणि त्यांना खोडयात बसवावे.
एखाद्या शुद्राने द्विज जातीतील माणसाचा जर घाणेरडया शब्दांनी अपमान केला तर त्याची जीभ छाटून टाकावी. कारण तो जन्मत:च कनिष्ठ दर्जाचा आहे.
जर एखादा शुद्र वरिष्ठ जातीतील लोकांची नावे किंवा जाती यांचा उल्लेख तिरस्कारदर्शक शब्दांनी केला तर तापवून लालबुंद केलेली दशांगुले लांबीची लोखंडाची कांब त्याच्या तोंडात कोंबावी.
जर तो ब्राम्हणांना त्यांच्या कर्तव्यकर्माबद्दल आढ़यतेने धड़े शिकवू लागला तर राजाने कड़क तापविलेले तेल त्याच्या तोंडात व कानात ओतवावे.
आपल्या ज्या अवयवाने शुद्र ब्राम्हणाला त्रास देईल त्याचा तो अवयव कापून टाकावा.
जो शुद्र वरिष्ठ जातीतील माणसाबरोबर त्याच आसनावर बसतो त्याच्या ढुंगणावर डाग द्यावेत व त्याला हद्दपार करावे किंवा राजाने त्याचे ढुंगण कापवावे.
जो शुद्र अहंकाराच्या भरात वरिष्ठ जातीतील माणसाच्या अंगावर थुंकतो त्याचे दोन्ही ओठ राजाने कापवावेत. त्याने जर वरिष्ठ जातीच्या माणसाकडे घाण वारा सोडला तर त्याचे कुल्ले कापवावेत.
वर सांगितलेल्या प्रकारचे कायदेकानून शूद्रांच्या विरुद्ध ब्राम्हणांनी तयार केले होते. त्याचा सारांश खालील प्रमाणे देता येईल.
१) सामाजिक रचनेत शूद्रांचा शेवटचा दर्जा ठरविण्यात आला.
२) शुद्र हा घाणेरडा असल्यामुळे त्याला दिसेल किंवा ऐकू जाईल अशा रितीने कोणतेही पवित्र कार्य करु नये.
३) इतर जातीतील लोकांना ज्या आदराने वागविण्यात येते तसला आदर शुद्राबद्दल दाखवू नये.
४) शुद्राचे प्राण म्हणजे क:पदार्थ. शुद्राला कोणीही ठार मारावे. त्याबद्दल त्याला कोणीही नुकसानभरपाई मागणार नाही. नुकसान भरपाई देण्याची वेळ आली तर ती इतकी अल्पशी असावी की ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य यांना ठार मारल्यानंतर जी नुकसान भरपाई घेण्यात येते तिच्या पासंगालाही ती पुरणार नाही.
५) शुद्राने ज्ञान संपादन करु नये. त्याला शिक्षण देणे हे पाप आहे. तसेच तो गुन्हा होतो.
६) शुद्राने स्थावरजंगम मालमत्ता जमवू नये. ब्राम्हणाला इच्छा होईल तेव्हा तो शुद्राची मालमत्ता आपल्या ताब्यात घेऊ शकतो.
७) शुद्र कोणत्याही दर्जाचा अधिकारी होऊ शकत नाही.
८) वरिष्ठ वर्गातील लोकांची सेवाचाकरी करणे हेच शुद्राचे कर्तव्यकर्म आहे व त्यामुळेच त्याला मोक्ष मिळतो.
९) वरिष्ठ जातीतील लोकांनी शूद्रांशी मिश्रविवाह करु नये. तथापि शुद्र स्त्रीला रखेली म्हणून ठेवण्याची मुभा आहे. परंतु शुद्राने वरिष्ठ जातीतील स्त्रीच्या अंगाचा स्पर्श केला तर तो घोर शिक्षेस पात्र होतो.
१०) शुद्र गुलामगिरीत जन्मतो व त्याला मरेपर्यंत गुलामगिरीतच ठेवले पाहिजे.