सोमवार, १४ जून, २०२१

गांधीवाद - २

गांधीवाद या भूमीचा कायदा झाला तर या व्यवस्थेत अस्पृश्यांची स्थिती काय होईल या प्रश्नाच्या उत्तरासाठी बुद्धीला फारसे कष्ट देण्याचे काहीही कारण नाही. जोपर्यंत हिंदुस्थानातील हिंदू समाजव्यवस्थेतील सर्वात खालचा वर्ग आणि अस्पृश्य या दोन्ही वर्गांना परंपरेने सर्व अधिकार नाकारले आहेत, हे एकाच वर्गात मोडतात तोपर्यंत अस्पृश्यांची स्थिती कनिष्ठ हिंदूपेक्षा चांगली असण्याची शक्यताच नाही. जर काही शक्यताच असेल तर ती त्याच्यापेक्षा अधिक वाईट होण्याचीच शक्यता जास्त आहे. 
अस्पृश्यांना स्पर्श केल्यानंतर हिंदूना स्नान करण्याची गरज नाही असे गांधींनी म्हटलेले नाही. जर गांधी, स्पर्शामुळे अपवित्र झाल्याने स्नान करुन शुद्धी करावी याला आक्षेप घेत नसतील तर मग अस्पृश्यांना स्पर्श करुन अस्पृश्यता कशी नष्ट होईल हे समजणे अवघड आहे. याचा अर्थ हिंदूंशी अस्पृश्यांचे सामजिक अभिसरण असा होतो काय? श्री. गांधी यांनी स्पष्टपणे असे घोषित केले की अस्पृश्यता निवारण याचा अर्थ अस्पृश्य आणि हिंदू यांच्यात रोटी बेटी व्यवहाराला अनुमती असा होत नाही. श्री. गांधी यांची अस्पृश्यता निवरणाची कल्पना म्हणजे अस्पृश्यांना अती शुद्राच्या वर्गातून काढून शुद्राच्या वर्गात त्यांना सहभागी करणे एवढया पुरतीच सीमित आहे.
 
हिंदूधर्मशास्त्रांनी अस्पृश्यांच्या शिक्षणावर लादलेली बंधने गांधीवादाला मान्य नाहीत हे सत्य आहे. गांधीवाद अस्पृश्यांनी कायदा शिकावा, वैद्यकीय शास्त्र शिकावी, अभियांत्रिकी शास्त्र शिकावे या मताचा, ज्यांची जी इच्छा असेल ते शिकावे या मताचा आहे. परंतू अस्पृश्यांना त्यांच्या शिक्षणाचा, ज्ञानाचा उपयोग करण्याचा अधिकार मिळणार आहे काय? 

अस्पृश्यांनी त्यांचा वडीलोपार्जित व्यवसाय केला पाहिजे. ते अस्वच्छ व्यवसायात आहेत म्हणून त्यांना या नियमातून वगळता येणार नाही. हे व्यवसाय या वर्गावर जबरदस्तीने लादण्यात आले आहेत. त्यांनी ते स्वेच्छेने स्वीकारले नाहीत, असे म्हणण्यात काही अर्थ नाही. गांधीवादाचा युक्तिवाद असा आहे की, एकदा जे ठरले ते ठरले. ते चुकीच्या मार्गाने ठरले असले तरीही त्याचे पालन झालेच पाहिजे. गांधीवादात अस्पृश्य हे अस्पृश्यच आहेत आणि कायमचे अस्पृश्यच राहणार आहेत. गांधीवादी अस्पृश्यतेच्या तुलनेत अस्पृश्य, सनातनी अस्पृश्य व्यवस्था अधिक पसंत करतील यात शंकाच नाही. ज्यात अस्पृश्यांवर अज्ञान अंधकारात राहण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे भंगीकाम कदाचित अधिक सुसह्य होईल. पण एका सुशिक्षित अस्पृश्याला गांधीवाद भंगीकाम करण्यास भाग पाडतो. केवढे हे क्रौर्य. गांधीवादात ज्याला वरदान मानले गेले, ख-या अर्थाने तो मोठा शापच ठरणार आहे. गांधीवादात अस्पृश्यता निवारणाचे कार्य म्हणून ज्याचा एवढा उदो उदो करण्यात आला आहे तो कार्यक्रम म्हणजे एक भ्रम आहे. त्यात तथ्य नाही. काहीही तथ्य नाही. 

अस्पृश्यतेविरुद्ध फसवे अभियान आरंभ करण्यापलीकडे गांधीवादाने काहीही केले नाही. गांधीवाद हा सनातन वादाचेच दूसरे साधे रूप आहे. गांधीवाद हे गत काळातील आक्रमक हिंदू सनातनवादाला आधुनिक काळात दिलेले नाव आहे. हिंदू सनातनवादात जे आढळणार नाही असे गांधीवादात नवीन काय आहे? हिंदुत्ववादात जातीव्यवस्था आहे. गांधीवादातही जातीव्यवस्था आहे. हिंदुत्ववाद वडीलोपार्जित व्यवसाय स्वीकारण्यावर भर देतो. गांधीवादही तेच सांगतो. हिंदुत्ववाद गाईची पूजा सांगतो. गांधीवादही तेच करा असे म्हणतो. हिंदुत्ववाद हा कर्मवादाचा सिद्धांत मानतो. या जन्मात, जगात मानवाच्या वाट्याला जे काही आले आहे ते पूर्व जन्मीच्या कृत्याचे फळ आहे असा कर्मवादाचा अर्थ आहे. याच वादावर गांधीवादाचाही विश्वास आहे. हिंदुत्ववाद शास्त्रांचा अधिकार मान्य करतो. गांधीवादही शास्त्रांचा अधिकार मान्य करतो. हिंदुत्ववाद देवांच्या अवतारावर विश्वास ठेवतो. गांधीवादही त्यावर विश्वास ठेवतो. हिंदुत्ववाद मूर्तीपूजा मानतो. गांधीवादही मूर्ती पूजकच आहे. 

गांधीवादाने काय केले असेल तर हिंदुत्वाच्या रुढींना आणि हिन्दुत्वाला तत्वज्ञानाचा आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. हिंदूधर्म हा नियम व बंधनांचा पुंजका आहे. आणि हे नियम आणि बंधने प्रथमदर्शनीच क्रूर आणि अप्रागतीक व्यवस्थेचे प्रतीक वाटतात. गांधीवादाने त्यांना तत्वज्ञानाचा आधार दिल्यामुळे त्यांचा चेहरामोहरा आता अधिक स्निग्ध वाटतो एवढेच. या तात्विक आधारामुळे त्यांना एक सन्मानित दर्जा व देखणेपणा प्राप्त झाला आहे. गांधीवादाने या नियमांचे रूप एवढे बदलून टाकले की, ते आता आकर्षक वाटू लागले आहेत. हिंदूधर्माची नग्नता झाकण्यासाठी कोणते तत्वज्ञान पुरस्कृत केले आहे. संक्षेपाने हे तत्वज्ञान अशाप्रकारे मांडता येईल. हिंदूधर्मात जे काही आहे उदात्त आहे असे सांगणारे हे तत्वज्ञान आहे. हिंदूधर्मात जे काही आहे ते लोककल्याणासाठी आवश्यक व उपयोगी आहे असेही हे तत्वज्ञान सांगते. पण या तत्वज्ञानाने हिंदू मात्र खुश आहेत. ते हिंदूच्या हिताचे आहे यात शंकाच नाही आणि म्हणूनच ते त्यांना योग्य ही वाटते. प्रामाणिकपणे त्यांना तसे वाटते म्हणून किंवा त्यांच्या आत्मस्तूतीच्या प्रवृत्तीचा स्वभावगुण म्हणून याची चौकशी करण्याकरता थांबण्याची गरज नाही. 

अशा स्थितीत गांधीवादापासून अस्पृश्यांना काय आशा आहेत? हिंदूधर्म हा अस्पृश्यांकरीता दुःखाचे कोठारच आहे. वेद, शास्त्र आणि स्मृती पवित्र आहेत आणि त्या कधीही चुकत नाहीत हा विश्वास, जातीव्यवस्थेचे कठोर नियम, कर्माचा ह्रदयहीन सिद्धांत आणि जन्माच्या आधारावर समाजात स्थान ही सर्व शस्त्रे अस्पृश्यांना पीड़ित करणारी शस्त्रे आहेत. ही शस्त्रे हिंदुधर्माने अस्पृश्यांविरुद्ध परजली आहेत. ही शस्त्रे अस्पृश्यांचे अंग भंग करणारी आहेत. ही शस्त्रे अस्पृश्यांचे जीवन उध्वस्त करणारी, त्यांचे जीवनरंग रसहीन करणारी असून गांधीवाद त्यांना तशीच्या तशीच धारदार ठेवू इच्छीतो. अशा स्थितीत गांधीवाद हा स्वर्ग आहे असे अस्पृश्य कसे म्हणू शकतील. त्यांना तर हिंदूधर्म दुःखाचे कोठारच वाटणार आहे. या संदर्भात अस्पृश्यांची एकमेव आणि स्वाभाविक प्रतिक्रिया म्हणजे स्वतःला गांधीवादापासून चार हात दूर ठेवा हीच आहे. 

हे सर्व जुन्या गांधीवादाला लागू पड़ते असे काही गांधीवादी म्हणू शकतील. त्यांच्यामते आता नवीन गांधीवाद उदयाला आला आहे. हा गांधीवाद जातीनिरपेक्ष आहे. 

प्रथम गोष्ट अशी की, श्री. गांधी यांनी फ़क्त एवढेच म्हटले की जातीव्यवस्था ही कालविसंगत आहे. त्यांनी जातीव्यवस्था ही विकृती आहे, पाप आहे असे कोठेही म्हटले नाही. ही एक धिक्कारणीय व्यवस्था आहे असे त्यांनी कोठेही म्हटले नाही. श्री. गांधी हे वर्णव्यवस्थेला अनुकूल नव्हते असाही समज होऊ शकतो. पण वर्णव्यवस्था हे श्री. गांधी यांनी जातीव्यवस्थेला दिलेले नवीन नाव आहे. वर्णव्यवस्थेत जातीव्यवस्थेच्या सर्व विकृती जशाच्या तशाच कायम आहेत. या आधारावर गांधीवाद अस्पृश्यांना स्वीकार्य होऊच शकत नाही. अस्पृश्यांना असेच म्हणावे लागेल की, "अरे देवा! काय हाच तो गांधी नावाचा माणूस आहे जो आमचा मुक्तिदाता होण्याचा दावा करतो." संदर्भ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर, 
काँग्रेस आणि गांधींनी अस्पृश्यांप्रती काय केले?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: