शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०२१

स्वतंत्र मतदारसंघ आणि संयुक्त राखीव मतदारसंघ

मुस्लिम, शिख, ख्रिश्चन, आंग्लो-इंडियन यांना पूर्वीपासून स्वतंत्र मतदारसंघ होते परंतु १९३२ मध्ये गोलमेज परिषदेतील डॉ. आंबेडकरांच्या प्रयत्नामुळे अस्पृश्यांना पहिल्यांदा स्वतंत्र मतदारसंघ मिळाले होते. यांचा अर्थ केंद्रीय आणि प्रांतीय विधानमंडळात अस्पृश्यांचे जे प्रतिनिधि निवडून जातील त्यांना फ़क्त अस्पृश्य मतदारच मत देऊ शकत होते. म्हणजेच जोनेता अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी जिवापाड मेहनत करेल त्यांनाच अस्पृश्य मतदार  आपले मत देणार होते.

परंतु सवर्ण हे अस्पृश्यांच्या बाबतीत कितीही कळवळा दाखवित असले तरी तो फ़क्त वरवरचा देखावा असतो हे गांधीजींनी आपल्या वागणुकीने दाखवून दिले. डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघ सोडावेत म्हणून गांधीजींनी आयुष्यातले प्रथम आणि शेवटचे आमरण उपोषण केले. याला कोणी गांधीजींची अहिंसा म्हणत असले तरी ही एकप्रकारे हिंसाच होती. कारण मी चूक असलो तरी माझे म्हणणे तुम्ही मान्य करावे नाहीतर मी माझ्या जीवाचे काही बरेवाईट करेन आणि माझ्या जीवाला काही झाल्यास माझे समर्थक अस्पृश्यांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार करतील अशाप्रकारची ही अप्रत्यक्ष धमकीच होती. शेवटी काही तडजोड करुन डॉ. आंबेडकरांना स्वतंत्र मतदारसंघ सोडून द्यावे लागले. ही तडजोड म्हणजे संयुक्त मतदारसंघात राखीव जागा ही होती. यामध्ये प्राथमिक आणि संयुक्त असे दोन वेळा अस्पृश्य उमेदवारास निवडणुकीत मत द्यावे लागत होते. प्राथमिक निवडणुकीत फ़क्त अस्पृश्य मतदारच अस्पृश्य उमेदवाराला मत देऊ शकत होते तर संयुक्त निवडणुकीत अस्पृश्य आणि सवर्ण असे दोन्ही मतदार अस्पृश्य उमेदवारास मत देऊ शकत होते.  प्राथमिक निवडणुकित फ़क्त अस्पृश्य त्यांच्या मताने चार उमेदवारांची निवड करीत असत. सहाजिकच प्रथम पसंतीच्या क्रमांकाचा उमेदवार अस्पृश्यांचा सर्वात जास्त आवडता उमेदवार असे. त्या तुलनेत दूसरा कमी आवडता, तीसरा त्यापेक्षा कमी आणि चौथा त्यापेक्षा कमी. प्राथमिक निवडणुकीत अस्पृश्यांची पहिली पसंती डॉ. आंबेडकरांच्या पक्षाने उभ्या केलेल्या अस्पृश्य उमेदवाराला असायची. कारण हे नेते अस्पृश्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झटणारे खरे नेते असायचे. याउलट काँग्रेसतर्फे जे अस्पृश्य उमेदवार उभे रहायचे ते तिस-या किंवा चौथ्या क्रमांकावर असत.
याचा अर्थ तिस-या किंवा चौथ्या क्रमांकावर असणा-या काँग्रेसच्या अस्पृश्य उमेदवारास अस्पृश्य लोक काँग्रेसला विकला गेलेला किंवा काँग्रेसचा दलाल समजत असत. परंतु ज्यावेळेस संयुक्त मतदारसंघात अस्पृश्यांच्या प्राथमिक निवडणुकीद्वारे निवडलेले चार उमेदवार उभे राहत तेव्हा त्या उमेदवारांना अस्पृश्यांसोबतच ब्राम्हण, ब्राम्हणेत्तर सवर्ण हिंदू सर्वच मत देऊ शकत. अस्पृश्यांची लोकसंख्या कमी याउलट सवर्ण हिंदू बहुसंख्य असल्यामुळे सवर्ण हिंदू प्राथमिक निवडणुकीत अस्पृश्यांनी प्रथम पसंतीने निवडलेल्या अस्पृश्य उमेदवारास मत न देता जो नेता काँग्रेसच्या सवर्ण ब्राम्हण बनियास विकला गेला असेल अशा अस्पृश्य उमेदवारास आपल्या बहुसंख्य मताद्वारे निवडून आणत. १९३२ च्या पुणे कराराचा गर्भित अर्थ हा होता की, काँग्रेस पक्षाने अस्पृश्य उमेदवार निवडणुकीत राखीव जागेवर उभे करु नये. परंतु पुढे काँग्रेसने हा करार पाळला नाही. त्यामुळे १९४६ मध्ये पुणे करार रद्द करावा अशी डॉ. आंबेडकारांनी मागणी केली होती.

अस्पृश्यांना राखीव जागा फ़क्त अस्पृश्य उमेदवार निवडून जावा यासाठी नव्हत्या तर त्यांच्या उन्नतीसाठी काम करणारे त्यांचे खरे नेते निवडून जावेत यासाठी होत्या. ज्या देशात पराकोटिचा जातीयवाद आहे तिथे अल्पसंख्य अस्पृश्यांचे उमेदवार राखीव जागेवरुन त्यांचे खरे नेते म्हणून निवडून जाऊ शकतात काय?

प्राथमिक निवडणुकीची पद्धत बंद झाली असली तरी अनुसूचित जाती, जमातीसाठी राखीव जागेची ही पद्धत आजही सुरु आहे. जेंव्हा की डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या हयातितच याला विरोध केला होता. कारण काँग्रेसतर्फे निवडून जाणारे उमेदवार अस्पृश्यांच्या कोणत्याही फायद्याचे नव्हते. डॉ. आंबेडकरांनी काँग्रेसच्या या अस्पृश्य उमेदवारास Tools (हत्यार) हा शब्द वापरलेला आहे. हे अस्पृश्य उमेदवार म्हणजे सवर्ण ब्राम्हण बनियांच्या हातातले अस्पृश्यांच्या पक्षाविरुद्ध वापरावयाचे हत्यार होते. आजही तेच सुरु आहे.

मग अस्पृश्यांचा कळवळा दाखविणा-या गांधींच्या या वागणुकीने कोणाचा फ़ायदा झाला?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.