मंगळवार, २६ एप्रिल, २०२२

ब्राम्हणेत्तर बहुजनांची मानसिकता

संघ-भाजपला शिव्या दिल्या म्हणजे बहुजन समाजातील धर्मांधता, जातीयवाद लपतो असे नाही. म्हणूनच बहुजन समाजाचे  काय चुकतयं यावर सुद्धा विचार झाला पाहीजे. डॉ. आंबेडकरांनी ब्राम्हण, ब्राम्हणेत्तर आणि अस्पृश्य (अनुसूचित जाती) अशी जातींची वर्गवारी केली होती. ब्राम्हण म्हणजेच सवर्ण उच्चजातींची संख्या १५% समजली जाते. या १५% लोकांनी मनात आणलं तरी काहीही होऊ शकत नाहीत जोपर्यंत ब्राम्हणेत्तर आणि अनुसूचित जाती-जमाती त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागणार नाहीत. ब्राम्हणेत्तर समाजातील प्रबळ जातींच्या हातात बराच काळ सत्ता राहिलेली आहे. अनुसूचित जातींच्या नेत्यांचं तसेही काही चालत नाही. कारण ब्राम्हण आणि ब्राम्हणेत्तरांनी त्यांच्या मर्जीने वागणारा अनुसूचित जातीचा उमेदवार निवडलेला असतो. परंतु बहुजन समाजाच्या नावावर प्रबळ जातींनी एवढ्या वर्षात केलेलं राजकारण संघाला पूरक आणि पोषकच होतं. धर्मनिरपेक्षतेचं तत्व होतं पण यांनी त्याचं पालन प्रामाणिकपणे कधीही केलं नाही. यांचा जोर फ़क्त फुले-शाहू-आंबेडकर नारा देण्यापुरताच. उदाहरणे बरेच देता येतील पण दोनतीन उदाहरणे देतो. ८० च्या दशकापर्यंत कान्हेंट शाळांचं प्रमाण अतिशय नगण्य होतं. ज्या काही शाळा होत्या त्या बहुतांशी सरकारी अनुदानित शाळा होत्या. त्यापैकी बहुतांश काँग्रेसी बहुजन नेत्यांच्या, आमदार खासदारांच्या होत्या. या सर्व शाळेत शुक्रवाराला सरस्वती पूजा व्हायची. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने व्हायची. अनेक शाळेत गणपती बसविला जायचा. ही कोणती धर्मनिरपेक्षता होती? हे संघाला पूरक वागणे नव्हते का? याचा संघाला फ़ायदा होणार नव्हता का? संघाला हेच पाहीजे होते. तेव्हा आपल्या बहुजन नेत्यांचं चुकत नव्हतं का? अनेक सरकारी कार्यालयात देवीदेवतांचे फोटो लावले जायचे. सरकारी बँकांच्या कैशियरच्या रुम मध्ये सुद्धा लक्ष्मीचा फोटो असायचा. मागे एका अधिका-याने सरकारी कार्यालयात देवीदेवतांचे फोटो लावता येणार नाही असे पत्रक काढले होते. त्याचा विरोध सर्वात आधी बहुजन समाजातील नेत्यांनीच केला होता. रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत ध्वनिक्षेपक वापरता येणार नाही असा कायदा झाला त्यावेळी या कायद्यातुन काही विशेष दिवस सूट मिळावी अशी मागणी सर्वप्रथम बहुजन नेत्यांनीच केली आणि तशी सूट मिळविली. हे वागणे संघाला पूरक नव्हते का? आपले चुकत असतांना कोणत्या तोंडाने फ़क्त संघाला शिव्या द्यायच्या? इतर धर्माच्या बाबतीत आपण पक्षपात करतोय हे यांना तेव्हा समजत नव्हतं का? की कोणी काही म्हणत नाही म्हणून कसेही वागायचे? गणपती विसर्जनाच्या दिवशी दिवसभर मुख्य रस्ता बंद राहायचा पण मुस्लिमांनी एकदा का रस्त्यावर नमाज पडला की यांनी रस्त्यावर महाआरती सुरु केली. हे बहुजन नेत्यांची साथ असल्याशिवाय शक्य आहे काय? गणपती ग, भटजी भ, यज्ञ य, क्षत्रिय क्ष एवढ्या वर्ष एकाच धर्माशी संबंधित शब्द शिकविले गेले. यावर एवढ्या वर्षात कोणत्याही बहुजन नेत्याने आक्षेप घेतला नाही. अल्लाचा अ, बुद्धाचा ब, येशुचा य शिकवू शकत नव्हते का? एवढ्या वर्ष संघ-भाजपचेच सरकार होते का? एवढे वर्ष हा पक्षपात इतर धर्मीय सहन करत होते तो राग कधी ना कधी बाहेर पड़णारच ना. आता तो व्यक्त करायची साधनं उपलब्ध झाली म्हणून तो व्यक्त होतोय. तर आता हे लोक इतरांना धर्मनिरपेक्षता वगैरे शिकवायला लागलेत. धर्मांधतेचं स्लो पायझन काँग्रेसच्या काळापासूनच देणे सुरु होते. त्याचाच फ़ायदा संघ-भाजपला झाला. आणि यांच्या ह्या असल्या दुटप्पी वागणुकीनेच संघ-भाजपाच सरकार येण्यात मदत झाली. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: