मा. गांधी यांना आपण देशातील सर्वच घटकांचे प्रतिनिधित्व करतो असे दाखवायचे होते. त्यामुळे मा. गांधींचे नेहमी म्हणणे असे की, मी सर्वांचे प्रतिनिधित्व करतो, याचाच अर्थ अस्पृश्यांचे नेतृत्व सुद्धा मीच करतो.
भलेही अस्पृश्य या गोष्टीस मानत नसले तरीही. तसाही सर्व मीडिया काँग्रेसच्या बाजूने होता. कांग्रेसकडे पैसाही भरपूर होता. सर्व उद्योगपती काँग्रेसशी संबंधित होते. त्यामुळे त्यांच्याकडून काँग्रेसला होणारी मदतही फार मोठी होती. या आर्थिक पाठबळावर आणि मिडियाच्या जोरावर मा. गांधीजींना जगासमोर आपले मोठेपण दाखवायचे होते.
यासाठीच मा. गांधीजींनी अस्पृश्यांना काँग्रेस फार मोठी मदत करते हा देखावा निर्माण करण्यासाठी 'हरिजन सेवक संघ' नावाची संस्था स्थापन केली. मुळात मा. गांधीजींना अस्पृश्य संघटित आणि शक्तीसंपन्न व्हावेत असे वाटत नव्हते. फ़क्त त्यांचा मुख्य हेतू हा होता कि, अस्पृश्यांच्या मनात आपल्या हिंदू मालकाविषयी मानसिक गुलामगिरीची मानसिकता विकसीत व्हावी.
अस्पृश्यांना ह्या गोष्टी समजून याव्यात म्हणून डॉ. आंबेडकरांनी, कृष्णाला आपल्या स्तनाग्रांना विष लावून दूध पाजून ठार मारण्याच्या उद्देशाने दाई बनून आलेल्या पूतना मावशीची कथा सांगितली. ते म्हणतात की, दूध पाजणारी दाई खुनी सुद्धा असू शकते.
सेवेचे नाव घेऊन हरिजन सेवक संघ अस्पृश्यांची स्वतंत्र प्रज्ञा मारून टाकण्यासाठी प्रयत्नशील होता. हरिजन सेवक संघाने अस्पृश्यांना छोटया मोठ्या सेवा बहाल करुन उपकराच्या ओझ्याखाली दबलेल्या अस्पृश्यांची एक फळीच उभारली होती आणि या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेल्या व्यक्तींवर मा. गांधी आणि हिंदू हे अस्पृश्यांचे मुक्तीदाते आहेत हे पटवून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. हरिजन सेवक संघाच्या कार्याचा सर्वात वाईट पैलू म्हणजे, संघाच्या वस्तीगृहात अस्पृश्य विद्यार्थ्यांची सोय करुन त्यांना केलेल्या मदतीचा त्यांच्या समजाविरुद्ध केलेला दुरुपयोग हा होय.
डॉ. आंबेडकरांचे म्हणणे होते की, अस्पृश्यांच्या नेमक्या काय अडचणी आहेत आणि त्या कशा सोडवायच्या याची जाण जेवढी अस्पृश्यांना आहे तेवढी गांधी आणि हिंदूंना नाही. त्यामुळे हरिजन सेवक संघाच्या व्यवस्थापन मंडळावर अस्पृश्यांना प्रतिनिधित्व द्यावे. जेणेकरुन अस्पृश्यांची सेवा करण्याच्या बहाण्याने अस्पृश्यांना हिंदूंचे मानसिक गुलाम बनवता येणार नाही. परंतू मा. गांधीजींनी यास ठाम नकार दिला. डॉ. आंबेडकर म्हणतात, या नकारासाठी महाधूर्त माणसालाही शोधता येणार नाहीत, अशी कारणे श्री. गांधी यांनी आपल्या नकाराच्या समर्थनार्थ दिली. मा. गांधीजींचा पहिला युक्तिवाद असा होता की, हरिजन सेवक संघ हा हिंदूंनी अस्पृश्यतेचे पालन करुन केलेल्या पापाच्या प्रायश्च्चित्तासाठी निर्माण केलेली संस्था आहे आणि ते प्रायश्चित्त त्यांनीच करावयाचे आहे. म्हणून अस्पृश्यांना संघाच्या व्यस्वस्थापनात सहभागी करुन घेता येणार नाही. त्यांचा दूसरा युक्तिवाद असा होता की, संघाच्या कार्यासाठी दिलेला पैसा हा हिंदूंनी दिलेला आहे. तो पैसा अस्पृश्यांनी दिलेला नाही म्हणून अस्पृश्यांना संघाच्या व्यवस्थापन मंडळावर प्रतिनिधित्व मागण्याचा अधिकार नाही. याचाच अर्थ असा होतो की, हिंदूंनी जमा केलेला पैसा अस्पृश्यांवर कसा खर्च करावयाचा हे हिंदूच ठरविणार. भलेही त्याने अस्पृश्यांचा फार काही फ़ायदा होवो किंवा न होवो. फ़क्त जगाला दिसले पाहिजे की आम्ही समाजसेवा करतोय. त्यांना फ़क्त अस्पृश्यांना हिंदूंचे मानसिक गुलाम बनवायचे होते आणि दुसरीकडे आपण कसे सेवाभावी लोक आहोत याची प्रसिद्धी जगासमोर करावयाची होती.
आणि एवढे करूनही अस्पृश्यांनी शेवटी संघाचा बहिष्कारच केला.
या वृत्तित अजूनही बदल झालेला आहे असे दिसून येत नाही. असे समाजसेवेचे ढोंग आजही अनेकजण करतांना दिसत आहेत. आजही काही जातीयवादी विचारसरणीशी संबंधित लोक एकीकडे अनुसूचित जाती, जमातींसारख्या वंचित घटकांसाठी वस्तीगृह, आश्रमशाळा, शाळा चालवितात तर दुसरीकडे त्याच लोकांच्या आरक्षणासारख्या सांविधानिक अधिकाराच्या विरुद्ध मोर्चे काढतात. हे ढोंगी लोक अनुसूचित जाती, जमातींना आरक्षण असून सुद्धा त्या जागा भरल्या जात नाहीत यासाठी सत्ताधा-यांना कधीही जाब विचारणार नाहीत किंवा त्यासाठी आंदोलन करुन आपली समाजसेवा दाखविणार नाहीत. अनुसूचित जाती, जमातीवर अनेक अत्याचार होतात. त्यांना पोलिसात साधी तक्रार नोंदवुन घेण्यासाठी कित्येक चकरा माराव्या लागतात. त्यासाठी त्यांना मोर्चे काढावे लागतात. अशा वेळेस हे ढोंगी समाजसेवक अत्याचारग्रस्तांसाठी आंदोलने करण्याऐवजी अत्याचारी व्यक्तीच्या समर्थनार्थ मोर्चे काढतात.
अट्रोसिटी कायद्यानुसार शिक्षा होण्याचे प्रमाण फ़क्त ४ टक्के आहे. म्हणजे शंभरातून ९६ आरोपींना शिक्षा होत नाही. काही जातीयवादी विचारणीच्या लोकांचे म्हणणे असते की, अट्रोसिटीच्या केसेस खोट्या असतात म्हणून आरोपींना शिक्षा होत नाही. याचा अर्थ असा होतो शंभरातून ९६ केसेस मध्ये अनुसूचित जाती, जमातीचे होणारे खून, बलात्कार खोटे असतात. म्हणजे अनुसूचित जाती, जमातींना आपल्याच लोकांचे खून, बलात्कार करुन इतरांना फसविणे याशिवाय दूसरे काही कामच नाही. डॉ. आंबेडकर अशा केसेस मध्ये आरोपी निर्दोष सुटण्याचे कारण असे सांगतात की, गुह्याचा तपास करणारे प्रशासकीय अधिकारी हे ज्या जातीयवादी समाजात लहानाचे मोठे होतात त्यांचे तेच जातीय पूर्वाग्रह घेऊन प्रशासकीय पदावर जात असतात. त्यामुळे त्यांच्याकडून होणा-या तपासात आरोपीला वाचविण्यात भूमिका मोठी असते. अनुसूचित जाती, जमातीचे अधिकारी असले तरीही त्यांचे प्रमाण अतिशय नगण्य असते आणि त्यांच्यावर त्यांच्या वरिष्ठांचा दबाव असतो. तर दुसरीकडे प्रशासन आणि राजकारणी मिळून अत्याचारग्रस्तावर दबाव आणून त्यांनाच खोटे पडतात.
हाथरसच्या घटनेत प्रशासकीय अधिकारी पीड़ित परिवाराला कसे धमकावत होते ते सा-या जगाने पाहिले आहे. आजकाल तर कोणता पोलिस अधिकारी कोणत्या राजकीय पक्षासाठी काम करतो, कोणाला काय टॉरगेट दिले आहे, त्याची विचारसरणी काय आहे, सेवेतून निवृत्तीनंतर तो कोणत्या पक्षात जाणार याबद्दल दिवसरात्र चर्चा सुरु आहे.
त्यामुळे अशा जातीयावाद्यांनी समजसेवेचे कितीही ढोंग केले तरी अनुसूचित जाती, जमाती यांच्यावर कधीही विश्वास ठेवत नाहीत.
त्यामुळे शेवटी यांच्यातले काहीजण समाजसेवेचे आपले ढोंग बाजूला ठेवून या समुहाना शिव्या देत आपले खरे रूप दाखवून देतातच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
नवीन टिप्पण्या अनुमत नाहीत.