शनिवार, १२ जून, २०२१

अहिंसा

मी सुद्धा स्वतः अहिंसा तत्वाला शिरोधार्य मानणारा माणूस आहे. परंतु अहिंसा आणि लीनता यामध्ये मी फरक करतो. लीनता म्हणजे दुर्बलता आणि स्वतःच स्वतःवर दुर्बलता लादून घेणे हा काही सद्गुण नव्हे. एका उपनिषदामध्ये एका कोकराची एक गोष्ट आहे. ते देवाजवळ गेले आणि त्याने तक्रार केली की, "देवा, तू सर्व प्राणिमात्रांचा बाप असल्यामुळे सर्व प्राणी भाऊ-भाऊ आहेत परंतु असे असले तरी प्रत्येक प्राणी हे सर्व बंधुप्रेम विसरून जाऊन मला खाऊ की गिळू असे करीत आहेत. हे असे काय म्हणून?" कोकराने देवाला विचारले. देवाच्या तोंडी घातलेले उत्तर मोठे विचार करण्यासारखे आहे. देव म्हणाला, "तू इतका लीन व लुसलुशित दिसतोस की तुला खाऊन टाकावे असा मलासुद्धा मोह होत आहे." या गोष्टीतील कोकराप्रमाणेच् आपली बरीचशी स्थिती आजपर्यन्त होती आणि म्हणूनच प्रत्येकजण आपणाला खाऊ की गिळू असा धाक घालित होता. मी अहिंसेवर श्रद्धा ठेवणारा आहेच पण - 

'दया तिचे नाव भूतांचे पाळण । 
आणिक निर्दाळण कंटकांचे ।।' 

या तुकाराम महाराजांच्या अहिंसेच्या व्याख्येतील अर्थाने. तुकारामाने अत्यंत समर्पकपणे दोन गोष्टींमध्ये अहिंसा असल्याचे सांगितले आहे. एक सर्व प्राणीमात्रासंबंधी प्रेम व दया आणि दोन दृष्ट लोकांचा नाश. अहिंसेच्या व्याख्येतील या दुस-या भागाकडे बहुधा दुर्लक्ष होते व या नजरचुकीमुळेच अहिंसेचे तत्व हास्यास्पद होते. दृष्टांचा विनाश करणे हा अहिंसा तत्वातील महत्वाचा घटक आहे. त्याच्याशिवाय अहिंसा म्हणजे केवळ टरफल, फ़क्त कल्पनारम्य सुख. व्यवहारात वापरण्याजोगे तत्व म्हणून ते उरतच नाही. जोपर्यंत दुस-याला दुःख देण्याची दृष्ट इच्छा आपण बाळगीत नाही आणि जोपर्यंत केवळ सर्व दृष्टांचा नाश करण्याच्या सिमेपर्यंतच आपण मर्यादा घालून घेऊ तोपर्यंत शक्तीची उपासना करण्याविरुद्ध व शक्ति संघटनेविरुद्ध कोणीही कोल्हेकुई करू शकत नाही. शिलाने नियंत्रित केलेली शक्ति आमचा आदर्श आहे. अविचाराने कोणालाही दुःख देण्याचे टाळा. संदर्भ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग २,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: