सिद्धार्थ गौतमाने परिव्रज्या का ग्रहण केली?
सिद्धार्थ गौतमाने परिव्रज्या का ग्रहण केली किंवा गृहत्याग का केला ह्याचे पारंपारिक कारण असे देण्यात येते की त्यांनी एके दिवशी एक वृद्ध व्यक्ति, एक रुग्ण आणि एक मृत देह बघीतला. सिद्धार्थाला हे बघून अतिशय वाईट वाटले, सांसारिक जीवन निरर्थक वाटले म्हणून त्याने परिव्रज्या ग्रहण केली. खरं म्हणजे हे कारण अतिशय हास्यास्पद वाटते. ह्या शेकड्याने घडणा-या घटना आहेत. सिद्धार्थ गौतमाने वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी परिव्रज्या ग्रहण केली. वरील तिन दृश्य बघितली म्हणून जर त्याने परिव्रज्या ग्रहण केली असेल तर ही तिन दृश्ये त्यापूर्वी त्याला कधी कशी दिसली नाहीत. ह्या शेकड्याने घडणा-या घटना त्यापूर्वी सिद्धार्थाच्या नजरेस न येणे असंभाव्य वाटते.
मग परिव्रज्या ग्रहण करण्याचे कारण काय?
डॉ. बाबासाहेबांना आंबेडकरांनी आपल्या 'बुद्ध आणि त्याचा धम्म' या ग्रंथात याचे कारण दिलेले आहे.
शाक्यांचा एक संघ होता. वयाची विस वर्षे झाल्यावर प्रत्येक शाक्य तरुणास संघाची दीक्षा घेऊन संघाचे सभासद व्हावे लागत असे. नियमाप्रमाणे सिद्धार्थाच्या वयाला विस वर्षे पूर्ण झाल्यावर त्याला शाक्य संघाचा सभासद व्हावे लागले. संघाचा सभासद झालेल्या प्रत्येक व्यक्तिस तो कोणीही असला तरी संघाचे नियम, अटी पाळाव्या लागत होत्या. त्यात काही कसूर झाल्यास संघ जी शिक्षा देईल ती त्याला मान्य करावी लागत असे.
संघाचा सभासद झाल्यापासून आठव्या वर्षी एक घटना घडली. शाक्यांच्या सिमेला लागून कोलियांचे राज्य होते. या दोन राज्यांच्या मधून रोहिणी नदी वाहत होती. या नदीचे पाणी प्रथम कोणी घ्यावे म्हणून शाक्य आणि कोलिय या दोन राज्यात वाद झाला. त्यावेळी झालेल्या संघर्षात दोन्ही राज्यातील लोकांना दुखापती झाल्या. शाक्य आणि कोलिय यांच्यात युद्ध करुन हा प्रश्न कायमचा मिटवावा असे ठरले.
त्याप्रमाणे शाक्य संघाच्या सभापतीने युद्धाचा ठराव मांडला. परंतु सिद्धार्थाने युद्धाला विरोध केला. त्याच्या मते दोन्ही बाजूंच्या काही लोकांनी एकत्र येऊन हा प्रश्न सामोपचाराने सोडवावा.
परंतु युद्धाच्या बाजूने सभासदांचे बहुमत होते.
युद्धासाठी सैन्याची उभारणी करीत असतांना सिद्धार्थाने सैन्यात दाखल होण्यास नकार दिला. संघाच्या नियमाप्रमाणे संघाचे आदेश न पाळणा-यास संघ शिक्षा देऊ शकत होता. सिद्धार्थापुढे तिन पर्याय होते. एक सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे; दुसरा देहान्तशासन किंवा देशत्यागास संमती देणे; आणि तीसरा आपल्या कुटुंबीयांवर सामाजिक बहीष्कार ओढवून घेऊन कुटुंबाची जमीन आणि मालमत्ता जप्ती होऊन उपजीविकेचे साधन हिरावुन घेऊन उपासमारीस तयार होणे.
सिद्धार्थाचा पहिला पर्याय न स्वीकारण्याबद्दल निर्धार होता. तिस-या पर्यायामुळे त्याच्या अपराधामुळे कुटुंबीयांना त्रास झाला असता. त्यामुळे त्याने देहान्तशासन किंवा देशत्याग हा दूसरा पर्याय निवडला.
संघाचा सेनापती सिद्धार्थास म्हणाला की तू देहान्ताची किंवा देशत्यागाची शिक्षा भोगण्यास तयार झालास तरी कोशल राजास ही गोष्ट समजल्यास तो संघास जाब विचारील. त्यावर सिद्धार्थ म्हणाला की मी परिव्राजक होतो आणि हा देश सोडून जातो. त्याप्रमाणे सिद्धार्थाने आपल्या आई-वडिलांची आणि पत्नीची संमती मिळवूनच शेवटी देशत्याग (गृहत्याग) केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
नवीन टिप्पण्या अनुमत नाहीत.