समाजात आपला दर्जा सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि समाजात अपणासाठी ख़ास हक्क, अधिकार व सवलतीही राखून ठेवलेल्या आहेत असे ब्राम्हणांचे म्हणणे होते. श्रेष्ठ दर्जा, ख़ास हक्क, अधिकार व सवलती यांच्यासंबंधी जेव्हा ब्राम्हण तंटे उपस्थित करीत असत तेव्हा तेव्हा त्यांचे वर्तन इतरांना अत्यंत त्रासदायक आणि असह्य होऊ लागले.
ब्राम्हणांचा श्रेष्ठ दर्जा, ख़ास हक्क, अधिकार आणि सवलती दर्शविणारी यादी खाली दिली आहे. यादीतील सारांशरूप माहिती काणे यांचे धर्मशास्त्र भाग २ (१) पान १३८-१५३ या पुस्तकात दिलेल्या जंत्रीवरुन तयार केलेली आहे.
१) ब्राम्हण माणूस ब्राम्हण जातीत जन्मला केवळ एवढ्याच कारणासाठी सर्वानी त्या ब्राम्हणाला सर्व वर्गाचा गुरु मानले पाहिजे.
२) सर्व वर्गाची कर्तव्यकर्मे कोणती, त्या वर्गाने कसे राहावे व वागावे आणि त्यांच्या उपजीविकेची साधने कोणती असावीत हे सर्व ठरविण्याचा ख़ास हक्क ब्राम्हणाचा आहे. ब्राम्हण जसा उपदेश करतील त्याप्रमाणे वागणे हे सर्व वर्गाचे कर्तव्यकर्म आहे. ब्राम्हण जशी सल्लामसलत देतील त्याप्रमाणे राज्यकारभाराचा गाड़ा राजाने चालविला पाहिजे.
३) राजाचे वर्चस्व ब्राम्हणांवर चालू शकत नाही. ब्राम्हण लोक वगळून बाकीच्या सर्व लोकांवर राजाचे वर्चस्व चालू शकते.
४) अ) फटके मारण्याची शिक्षा ब) हातापायात बेडया घालणे क) दंड करणे ड) हद्दपार करणे इ) निंदा करणे आणि फ) त्याग करणे या शिक्षा ब्राम्हणांना माफ़ आहेत.
५) जो ब्राम्हण श्रोत्रिय वेदामध्ये पारंगत आहे त्याला कर माफ़ आहेत.
६) ब्राम्हणाला भूमीत जो पैसा सापडेल त्या सर्व पैशावर त्याचा मालकी हक्क ठरतो. असला पैसा राजाला सापडला तर त्याने त्यातील अर्धा हिस्सा ब्राम्हणांला द्यावा.
७) मालमत्ता राजाकडे देऊ नये. ती मालमत्ता क्षत्रियांमध्ये किंवा ब्राम्हणांमध्ये वाटावी.
८) रस्त्याने राजा जात असतांना त्याला श्रोत्रिय किंवा ब्राम्हण भेटला तर त्यांना प्रथम वाट द्यावी.
९) सर्वानी ब्राम्हणांना प्रथम नमस्कार करावा.
१०) ब्राम्हणाला मारण्याची धमकी देणे किंवा त्याला मारणे किंवा त्याच्या शरीरातून रक्त बाहेर काढणे हे गुन्हे समजले पाहिजेत.
११) ब्राम्हण व्यक्ती पवित्र आहे. ब्राम्हणाने खून जरी केला असला तरी त्याला फाशीची शिक्षा देऊ नये.
१२) काही गुह्यांच्या बाबतीत, त्या गुह्यासाठी इतर वर्गातील गुन्हेगारांना जी शिक्षा देतात त्या शिक्षेपेक्षा कमी शिक्षा ब्राम्हणांना दिली पाहिजे.
१३) ज्या खटल्यात ब्राम्हण पक्षकार नाही त्या खटल्यात राजाने ब्राम्हण साक्षीदार म्हणून बोलावू नये.
१४) एखाद्या स्त्रीला पूर्वीचे काही ब्राम्हणेत्तर नवरे जरी असले तरी अशा स्त्रीबरोबर जर ब्राम्हणाने लग्न केले तर फ़क्त ब्राम्हण त्या स्त्रीचा नवरा ठरतो. तिचा पुर्विचा क्षत्रिय, वैश्य किंवा शुद्र नवरा हा ब्राम्हणाने तिच्याशी विवाह केल्यानंतर नवरा ठरू शकत नाही. (हा क्रमांक काणे यांनी उल्लेखिलेला नाही. परंतु तो अथर्ववेद ५-१७, ८-९ यामध्ये सापडतो)
वर सांगितलेले ब्राम्हणांचे ख़ास हक्क व सवलती यांचे विवेचन केल्यानंतर श्री. काणे यांनी आपले विचार खालीलप्रमाणे प्रदर्शित केलेले आहेत. (काणे धर्मशास्त्र, भाग २, पा. १५३-५४)-
"ब्राम्हणांना जे आणखी सवलती हक्क देण्यात आले होते ते म्हणजे भिक्षा मागण्यासाठी दुस-यांच्या घरात निर्वेधपणे प्रवेश, सर्पण व फुले गोळा करणे, पाणी आणणे आणि यासारखी इतर कामे जर ब्राम्हणांनी केली तर ती कामे चोरीच्या सदरात मानू नयेत. दुस-यांच्या बायकांबरोबर संभाषण करण्याचा ब्राम्हणांना हक्क आहे आणि स्त्रियांशी ब्राम्हण संभाषण करीत असता ब्राम्हणांना कोणी दुस-यांनी मध्येच अडथळा उत्पन्न करु नये. नावेत मोफत बसून नदीपार इतरांच्या अगोदर जाणे हा ब्राम्हणांचा हक्क आहे. ब्राम्हण व्यापारासाठी नावेचा उपयोग करीत असतील तर त्यांना त्या नावेसाठी कर माफ़ असावा. जो ब्राम्हण प्रवासाला चालला आहे व थकला-भागलेला आहे आणि त्याच्याजवळ खाण्यास काही नाही अशा ब्राम्हणाने जर उसाच्या मळ्यातून दोन उस घेतले किंवा शेतात काही कांदे किंवा भुईमुंगांच्या शेंगांच्या डहाळ्या उपटुन घेतल्या तर त्या ब्राम्हणाच्या हातून काही अपराध होत नसतो."
या सवलती - हककांची संख्या कालमानाने वाढत वाढत गेली. असले सवलती हक्क सच्छिल, स्वाभिमानी असलेल्या कोणत्याही माणसाचे डोके भडकून टाकतील याबद्दल तिळमात्र संशय नाही.
- शुद्र पूर्वी कोण होते?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
आज लोकशाहीत सुद्धा ब्राम्हण आणि तत्सम सवर्ण उच्चजातीला मिळणारे विशेष अधिकार आणि सवलती कायम आहेत फ़क्त काळानुसार त्यात बदल झाले असे वाटत नाही का?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
नवीन टिप्पण्या अनुमत नाहीत.