गुरुवार, २४ मे, २०१८

हिंदुत्ववाद्यांचा सवता सुभा

डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली घडून आलेला महाडचा सत्याग्रह हा अस्पृश्यांनी हिंदू म्हणून केलेला होता. त्यावेळी ते बौद्ध नव्हते. आम्हीही हिंदू आहोत. म्हणून आम्हालाही सार्वजनिक तळ्यात पाणी भरण्याचा अधिकार असला पाहिजे. अशी एक साधी माणुसकीची त्यांची मागणी होती, परंतु अखिल भारतातील सर्व हिंदुंचे धर्माच्या नावाखाली संघटना करू इच्छीणारे हे हिंदुत्ववादी संघाचे लोक हा सत्याग्रह लांबुन न्याहाळत होते. या संघवाल्यांपैकी कोणीही या सत्याग्रहात सामिल झाले नाहीत किंवा त्यांनी अस्पृश्यांना मदत केली नाही, उलट अनेक हिंदुत्ववादी सनातनी लोकांनी या सत्याग्रहावर दगडांचा वर्षाव करुन त्यांना रक्तबंबाळ करून सोडले.

त्याचप्रमाणे अस्पृश्यांनी डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली अनेक ठिकाणी मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केले. परंतु अस्पृश्यांनी हिंदूच राहावे असे म्हणणा-या संघवाल्यांनी त्यांना कोणतीही सहानुभूति दाखविली नाही. हिंदुंची संघटना व्हावी, अस्पृश्यता नष्ट व्हावी. असे सतत भूंकत राहणा-या या हिंदुत्ववाद्यांना मदत करण्यासाठी अस्पृश्यांचे हे सत्याग्रह म्हणजे एक सुवर्ण संधि होती. परंतु ही सारी मंडळी ख-या अर्थाने धर्मसंरक्षक नसून जातसंरक्षक असल्यामुळे हे घडणे शक्य नव्हते.

१९२० सालापर्यंत राष्ट्रीय लढ्यात टिळकांच्या सारख्या ब्राम्हण पुढा-यांचे नेतृत्व होते. टिळक हे हिंदुत्ववादी आणि त्याचप्रमाणे आपल्या ब्राम्हण्यांचा अभिमान बाळगणारे होते. म्हणूनच महाराष्ट्रातील या पिढितील अनेक पुढारी आणि क्रांतिकारक ब्राम्हण होते. या सा-यांनाच पेशव्यांचे म्हणजे स्वजातियांचे राज्य गेल्याचे दुःख होते. परंतु ही जात हुशार असल्यामुळे तसे उघडे बोलून दाखवित नसत. १९१६ साली लखनऊ कराराला टिळकांनी संमती दिली आणि त्यावेळेपासुन मुसलमान समाज वेगळा फेकला गेला, त्यावेळी ख-या अर्थाने फाळणीची बीजे पेरली गेली. कारण या करारानुसार त्यांना स्वतंत्र मतदार संघ मिळाले. पुढे म्हणजे १९२० च्या टिळकांच्या मृत्युनंतर गांधींच्याकडे नेतृत्व आल्यानंतर हिंदू-मुस्लिमांचे ऐक्य करण्याचा प्रयत्न गांधीनी केला. म्हणजे टिळकांनी जी जातीयवादाची बीजे पेरली ते निस्तरण्याचे काम गांधीनी केले. आणि मुसलमानांना राष्ट्रीय प्रवाहात समाविष्ट करुन घेण्याच्या या प्रयत्नामुळेच हिंदुत्ववाद्यांच्या गोळीला ते बळी पडले. गांधी-नेहरूंच्या नेतृत्वाखाली देशाच्या स्वातंत्र्यासाठी १९२० ते १९४७ या काळात प्रचंड आंदोलन झाले. हे देशव्यापी आंदोलन राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठीच होते. परंतु या अतिरेकी हिंदुत्ववाद्यानी या आंदोलनात भाग घेतला नाही. हे संघवाले धर्माभिमानी या राष्ट्रव्यापी चळवळीपासून दुरच राहिले. कारण टिळकांचे हिंदुत्ववादी, ब्राम्हणी परंपरा श्रेष्ठ मानणारे नेतृत्व आता उरले नव्हते. नेतृत्व अब्राम्हण, गुजराथी गांधींच्याकडे गेले ही गोष्ट या संघवाल्यांना फारशी बरी वाटली नाही.
अस्पृश्याता नष्ट व्हावी असा उद्धघोष करीत राहणे हां या लोकांचा एक मतलबाचा, फसवेगिरिचा भाग आहे. हिन्दुत्ववाद सांभाळण्यामध्ये आपोआप जातवारी सांभाळली जाते, हे या हुशार लोकांना चांगले माहीत आहे. आणि जातवारी सांभाळण्यामध्ये ब्राम्हण्य आपोआपच सुरक्षित राहते हे उघडच् आहे. अस्पृश्यता नष्ट व्हावी म्हणुन या संघवाल्यांनी कसलीही चळवळ किंवा सत्याग्रह केला नाही. प्रा. नरहर कुरुंदकर या संदर्भात लिहितात, 'ख्रिस्ती धर्मियांनी शाळा चालविल्या, दवाखाने काढले, अनाथलये चालविली, अशा भव्य परंपरा चालविल्या. परंतु जनतेची अशी सेवा परंपरा हिंदुत्ववाद्यांना कधीच नव्हती. शंकराचार्याचे मठ संस्कृत पाठशाळाही धड़ चालवु शकले नाही. हिंदू राज्य हे या लोकांचे आदर्श राज्य म्हणून ते नेपाळच्या हिन्दू नरेशाचे कौतुक करतात. परंतु कोल्हापुराचे शाहुराजे, ज्यांनी समाजकार्याचा मोठा आदर्श घालून दिला. ते हिन्दू असूनही, हिन्दू परंपरा पाळणारे असूनही, या हिन्दुत्ववाद्यांनी त्यांचा द्वेष केला.'

हिन्दुत्ववाद्यांनी शाहू महाराजांचा द्वेष केला, कारण ते समाजातील ब्राम्हणी वर्चस्वाविरुद्ध होते, या संघटनेसाठी 'हिन्दुत्ववादाची' बेगडी ढाल पुढे करणा-या संघवाल्यांना शाहूनी केलेला ब्राम्हण्यावरील हल्ला सहन झाला नाही. कारण त्यांचा हिन्दुत्ववादाचा शिंपला आतील ब्राम्हणी वर्चस्वाचा मोती सुरक्षित ठेवण्यासाठी होता, ही गोष्ट स्पष्ट आहे. उद्या नेपाळ च्या नरेशानी सुद्धा ब्राम्हणी वर्चस्वाविरुद्ध बंड पुकारले तर हेच हिन्दुत्ववाले, संघवाले त्याला शिविगाळ करण्यास सुरवात करतील.

हिन्दवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी या लोकांना फार प्रिय. कारण ते म्हणे गोब्राम्हण प्रतिपालक होते. त्यांच्या अष्टप्रधान मंडळातील एक हंबीरराव मोहिते सोडले तर बाकीचे सर्व ब्राम्हण होते. आणि ब्राम्हणी विचारधारेनुसार रामदास हे त्यांचे गुरु होते. या हिन्दुत्ववाद्यांनी शिवाजीला राज्यभिषेकाच्या वेळी शुद्र म्हणून त्यांची हेटाळनी केली. म्हणजे जातीश्रेष्ठत्वाचा ज्या ज्या वेळी प्रश्न उभा राहिला त्या त्या वेळी या लोकांनी धर्म गुंडाळून ठेवला, असा इतिहास आहे. म्हणजे मुसलमानी आक्रमणापासून हिंदुंचे, ब्राम्हणांचे, त्यांच्या सुंदर स्त्रियांचे संरक्षण केले. त्याबद्दल ह्या लोकांनी कधीही कृतज्ञता दाखविली नाही.

ब्राम्हणांची दगलबाजी, विश्वासघात आणि कृतघ्नपना भयानक स्वरूपाचा होता. शिवाजीचा गुरु म्हणून रामदासाला ज्या ब्राम्हण इतिहासकारानी शिवाजीच्या डोक्यावर बसविले व् राजवाड्यांची जातीय दृष्टीची परंपरा चालविली, तो रामदास शिवाजीच्या राज्यभिषेकाच्या वेळी कुठेतरी दडून बसला होता. कारण ब्राम्हण शिवाजीला शुद्र मानत होते. ते रामदासाच्या ब्राम्हणी श्रेष्ठत्वाच्या अहंकाराला पोषकच होते. शिवाजी धर्मसंरक्षक होता. ब्राम्हणांचेही त्याने संरक्षण केले. परंतु जातिश्रेष्ठत्वाचा प्रश्न ज्यावेळी उभा राहिला त्यावेळी धर्म आणि धर्मसंरक्षक या दोहोनाही पायदळी तुडवीणारी ब्राम्हणी परंपरा या रामदासाने तंतोतंत पाळली.

बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा या हिन्दुत्ववाद्यांनी आयुष्यभर त्रास दिला. अस्पृश्यतानिवारणाच्या चळवळीला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विरोध केला. मंदिर प्रवेशाला अप्रत्यक्षपणे विरोध केला. केसरी कंपुने स्व:ता लेख न लिहिता दुस-याचे लेख आंबेडकर विरोधात छापले. हिन्दू म्हणून हिन्दू मंदिरात देवदर्शन घेऊ पाहणा-या अस्पृश्यांना रक्तबंबाळ केले आणि ते बौद्ध झाले, त्यावेळी हे राष्ट्रांतर आहे असे ओरडू लागले. हिंदुत्ववाद्यांच्या या विरोधाला आयुष्यभर तोंड देत देतच आंबेडकरांनी अस्पृश्योंद्धाराची चळवळ चालविली.
संदर्भ - डॉ . आंबेडकरांचे विरोधक
- डॉ. दिनकर हेरलेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: