गुरुवार, २४ मे, २०१८

बुद्धाच्या वेदांवरील हल्ल्यामुळेचशूद्रांचा सेवाधर्म जावून ते राज्यकर्ते झाले

वेद हे इश्वरनिर्मित आहेत, अपौरुष आहेत, त्यांची आज्ञा मानावी, असे सांगण्यात येते. पण त्याला इतिहासात कोठे पुरावा नाही. ब्राम्हणांखेरीज कोणीच वेदाला प्राधान्य दिलेले नाही व आपला धर्मग्रंथ म्हणून कधीच मानलेले नाही. वेदाला प्रमाण मानणे ही ब्राम्हणांनी मागाहून आणलेली पद्धती 'थिअरी' आहे. याचा पुरावा आश्वलायन गृह्य सूत्रातून भरपूर मिळतो. त्यावेळी ब्राम्हणही वेदाला प्रमाण मानित नव्हते, याचा स्पष्ट उल्लेख आहे. सामाजिक मुल्ये निर्माण करण्यापूर्वी जनता पंचायतीचा निर्णय ग्राह्य मानित असत. त्यावेळी वेदाला चौथे किंवा पाचवे स्थान असे. शबर स्वामीनी जनमेजयाची सूत्रे घेऊन त्यावर भाष्य केले आहे. त्यात पूर्वपक्ष व उत्तरपक्ष मांडले आहे. शबर स्वामीनी ब्राम्हण वेद मानित नव्हते, असेच म्हटले असून वेद निर्मिति म्हणजे मुर्खाचे व वेडयांचे कार्य होय असा दावा मांडला आहे. बुद्धानी वेद प्रमाणभूत कधीच मानले नाहीत. वेदप्राणित धर्मास बुद्धधर्माने धक्का दिला. हा बुद्धधर्म शूद्रांचा होता व तो वेदप्रामाण्य कधीच मानीत नव्हता.

मी गीता न वाचता टिका करतो अशी टिका केली जाते. पण ती टिका खोटी आहे. गेली पंधरा वर्षे गीतेचा अभ्यास केल्यावरच माझी मते मांडण्यास मी सुरवात केली.
 
गीतेत विशेष असे काही नाही. तीत प्रामुख्याने तिन गोष्टी सांगितल्या आहेत. मरणे, मारणे, हिंसा करणे पाप आहे काय, वर्णाश्रम धर्माची महती व भक्तीने मोक्ष मिळेल, ह्या त्या तिन गोष्टी होत. गीतेचा अभ्यास करताना निव्वळ गीता पुस्तकावर अवलंबून गीतेचा अर्थ कळणार नाही तर त्या कालीन इतर वांगमयाचाही अभ्यास करुन गीतेचा अर्थ लावला पाहिजे.
 
या देशाचा पुर्विचा इतिहास ध्यानात घेतला म्हणजे जवळजवळ दोन हजार वर्षे ब्राम्हणवर्ग व बुद्धधर्म यांचा वाद चालु होता. या वादात जे वाङ्गमय निर्माण झाले ते धार्मिक स्वरूपाचे नसून राजकीय स्वरूपाचे आहे. देशातील सत्ताकेंद्रावर आपली हुकूमत चालावी म्हणुन गीता ग्रंथाचा जन्म झाला.

वेदातील थोडाफार अनुवाद गीता ग्रंथात करण्यात करण्यात आला आहे. परंतु वेदात तरी असे कोणते ज्ञान साठविले आहे? मी वेद किती तरी वेळा वाचले आहेत. त्यात समाजाच्या किंवा मानवाच्या उन्नतीसाठी व नितिमत्तेस पोषक असे काही सांगितलेले नाही. अथर्ववेदात, बायको प्रेम करीत नसली तर काय करावे, दुस-याची बायको कशी वश करावी, द्रव्यहरण कसे करावे हे सांगितले असून जारण मारणादी गोष्टींचाही उल्लेख आहे. वास्तविक वेदांसारख्या ग्रंथात या विषयांची काय जरुरी होती? यातील पुरुष सुक्तात ब्राम्हणांपासून शूद्रांपर्यंत कोणी कसे वागावे हे दिले आहे. बुद्धाचा याचबाबत कटाक्ष होता व त्याच दृष्टीने चातुरवर्णयाबद्दल त्यांनी टिका केली आहे. क्षत्रियानी मारणे हे त्यांचे कर्तव्य आहे, असे सांगितले आहे. एकाने दुस-याला मारणे हे जरूरीही असू शकेल, पण कर्तव्य ठरणार नाही. गीतेच्या दुस-या अध्यायात १८ ते ३९ श्लोकात वेदांताचा आधार घेऊन आत्मा अविनाशी आहे, देह जरेने किंवा अन्य कारणाने नाहिसा होणारच, असेच विवरण केलेले आढळेल. परंतु विचार करा की एखाद्या खुनी खटल्यात वकिलाने जज्जास असे सांगितले की, 'साहेब आत्मा अविनाशी आहे, तेव्हा खुनाबद्दल आरोपीस का शिक्षा करता?' तर हे वकिलाचे म्हणणे कसे दिसेल?
 
बुद्ध धर्माच्या तत्वज्ञानापुढे हां पुरावा टिकने शक्य नव्हते. बुद्ध तत्वाने सामाजिक, मानसिक व राजकीय क्रांती करुन शुद्राना उच्चपद प्राप्त करुन दिले. त्याकाळी अनेक शुद्र राजे झाल्याचे दाखले आहेत. आपल्या हातातील सत्ता गेल्यामुळे ब्राम्हणांनी पुन्हा चातुर्वर्ण्य पद्धतिचा पाया घालून भगवद्गितेच्याद्वारे ते काम केले व देशाची आपल्या हातून गेलेली सत्ता पुन्हा परत आपल्या हातात आणली.

वर्णाश्रम धर्माचा गीतेपूर्वी काय पाया होता तो जैमिनीने आपल्या पूर्वमीमांसा ग्रंथात दिला आहे. वेदावर बुद्धानेच नव्हे तर चार्वाक वगैरे विद्वानांनीही टिका केलेली आहे. बुद्धाच्या वेदावरील हल्ल्यामुळेच शूद्रांचा सेवाधर्म जावून ते राज्यकर्ते झाले.

सांख्य तत्वज्ञानावर श्रीकृष्णाने चातुर्वर्णयाची चौकट निर्माण केली. सांख्यकारानी त्रिगुणाला मान्यता दिलेली आहे आणि गीताकारानी चार गुण, चार वर्ण यांची सांगड घातलेली आहे. आतापर्यंत एकाही विद्वानाने सांख्यकारांच्या व गिताकारांच्या या तफावतीचा मेळ बसविलेला नाही. श्रीकृष्णाच्या भगवद्गितेने चातुर्वर्णास आधार दिला म्हणूनच आज चातुर्वर्ण टिकून राहिला आहे.
 
भगवदगीतेचा ऐतिहासिक दृष्टीने अभ्यास करताना मला या पुस्तकात चार ठिगळे बसविल्याचे आढळून आले. माझे मत असे आहे की प्रथम हा एक कृष्ण वर्णनाचा त्याच्या जातभाईनी म्हणजे सातवतानी गवळ्यानी, अर्जुन हतवीर्य झाला असताना कृष्णाने त्याला युद्धप्रवण केले म्हणून कृष्णाचे गुणगान करण्यासाठी रचलेला पोवाडा होता. त्यात धर्म अगर तत्वज्ञान नव्हते. त्यावेळी फ़क्त ६० श्लोक असावेत. नंतर हे लोक जेव्हा कृष्णाला ईश्वर मानु लागले त्यावेळी त्यांनी गायिलेली स्तुती म्हणजे भक्तिमार्ग झाला व अशारीतिने कृष्णाला देव बनविला. नंतर पुढे गितेचे असेच रूपांतर होऊन ती आजच्या स्वरुपात आली, यात मला कोणाला दोष द्यावयाचा नाही, परंतु जोपर्यंत तुम्ही हे ग्रंथ प्रमाण म्हणून मानाल तोपर्यन्त जगात तुमचा उद्धार होणार नाही. या पुस्तकातून शूद्रांची निंदा व अवहेलना करण्यात आली आहे. त्यांच्यावर निरनिराळे आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होईल, ते कायमचे दलित राहतील, अशी योजना करण्यात आली आहे. ती पुस्तके जर तुम्ही आम्हाला धर्मग्रंथ म्हणून प्रमाणभूत माना अशी सक्ती करीत असाल तर ते मी कधीही मान्य करणार नाही. हे माझे एक जीवन कार्य आहे. खालच्या वर्गातील लोकांना नि:संतान करण्याचा, त्यांना कायमचे पायदळी ठेवण्याचा व त्यांना रासातळाला नेण्याकरिता पद्धतशिर प्रयत्न करणारा असा एखादा विशिष्ट वर्ग जगातील इतर कोणत्याही देशात आढळणार नाही.
संदर्भ - डॉ.बाबासाहेब आंबेडकर
लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग २
पेज नंबर ४८२, ४८३, ४८४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: