ता. २८ ऑगस्ट १९३७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वांद्रे, मुंबई येथील म्युनिसिपल हॉलमध्ये दिलेले भाषण.
हिंदू धर्माप्रमाणे आपण जे पाळीत होतो ते सर्व धार्मिक सण-वार सोडून दिले पाहिजेत. हे सोडून देण्याचे कारण आज जे मी सांगणार आहे ते मात्र निराळे आहे. हिंदू धर्माप्रमाणे जे काही विधी करतात ते धर्माच्याच नव्हे तर नीतीच्या दृष्टीने रास्त असतात काय याचा आपण विचार केला पाहिजे. काही विधीत तर अतिशय बाष्कळपणा भरलेला असतो. उदाहरणार्थ, शंकराच्या नावाने लोक सोमवारी उपवास करतात व शंकराच्या पिंडीची बहुतप्रकारे पूजा करतात. परंतु शंकराची पिंडी ही काय वस्तू आहे, याचा कोणी विचार केला आहे? ती दुसरे तिसरे काहीही नसून पुरुष-स्त्रीच्या संभोगक्रियेची प्रतिमा आहे. अशा बिभत्स प्रतिमेचे गोडवे आपण गावे का ? रस्त्यावर श्वानाप्रमाने जर नर-नारी वाह्यतगिरी करू लागले तर आपण त्यांची फुलाने पुजा करायची की जोड्याने? मग पार्वती-शंकर यांच्या त्याच क्रियेच्या प्रतिमेला म्हणजे देवाच्या बिभत्सपणाला आपण पूजावे काय?
गणपतीचासुद्धा तसलाच प्रकार ! गणपतीची कथा अशी आहे की एकदा पार्वती नग्न स्नान करीत होती. त्यावेळी शंकर कोठेतरी दुसरीकडे गेला होता. म्हणून पार्वतीने आपणास कोणापासून उपसर्ग पोहोचू नये म्हणून आपल्या अंगावरचा मळ काढून त्याचा राक्षणकर्ता गणपती बनविला. तेव्हा मळातुन उत्पन्न झालेल्या अमंगळाला देव कसे मानावयाचे? ईश्वर निष्कलंक, मूर्तिमंत, पवित्र असावयास पाहिजे. परंतु हिंदू धर्मातील देव मोठे विचित्र आहेत ! म्हणून त्यांची पुजा करू नये. अशी माझी प्रामाणिक समजूत आहे.
तिसरी गोष्ट दत्तात्रेयाची. अत्री ऋषीची बायको अनसुया ही महान पतिव्रता आहे. असे ब्रम्हा, विष्णु व महेश या तीन देवांच्या बायकांना नारद सांगत गेला. आपल्यापेक्षा कोणी स्त्री अधिक पतिव्रता असावी हे त्यांना पाहावेना. तेव्हा या तिन्ही बायकांनी आपापल्या नव-याना अनसुयेचे पातिव्रत्य हरण करण्यास सांगितले व बायकांचे म्हणणे ऐकून हे तिघे वीरही त्या कामास तयार झाले. हे तिघे अनसुयाच्या घरी गेले. तिच्या नव-याला काही कारण सांगून दुसरीकडे पाठविले व आपण अनसुयेच्या सहवासात राहु लागले. या अवस्थेत तिने एका मुलाला जन्म दिला आणि या बालकाचे जनकत्व कोणाकडे हा विचार पडल्यामुळे त्या तिघांवर सारखीच जबाबदारी टाकण्याकरिता त्याला तिन तोंडे लावली व तोच हा दत्तात्रेयाचा अवतार!
संदर्भ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग २,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे, भाग २, १९३७ ते १९४५ (पेज नं. ४६, ४७)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
नवीन टिप्पण्या अनुमत नाहीत.