सावरकर-आंबेडकर वैचारिक संघर्ष
सावरकर हे प्रखर राष्ट्रवादी होते. त्यांचा मन:पिंड वैचारिक होता. ते क्रांतिकारक होते आणि त्यांच्या क्रांतिकारी प्रवृत्तिला वैचारिक अधिष्ठान होते. या देशाच्या हिनकस आणि टाकाऊ अशा सामाजीक आणि धार्मिक परंपराच्यावर जेवढी टिका सावरकरानी केली, हिंदूंच्या अंधश्रद्धांवर, जातिनिष्ठेवर व जातिश्रेष्ठत्वावर जेवढे घणाघाती घाव सावरकरानी घातले, तितके डॉ. आंबेडकरानीही घातले नसतील. सावरकरानी एकदा अत्यंत कळकळीने आपल्या अनुयायाना सांगितले होते की, मी समुद्रात उडी मारली आणि दहा मैल समुद्र कापला ही गोष्ट तुम्ही एखादे वेळी विसरली तरी चालेल, परंतु माझे सामाजिक विचार मात्र आपण विसरु नये. सामाजिक सुधारणासाठी आणि अस्पृश्योद्वारासाठी धडपडणारे सावरकरांचे मन ईथे दिसते. जातिसंस्थेवर प्रहार करतांना सावरकर लिहितात, 'जन्मजात जातिसंस्था हा अनुवंशशास्त्राचा प्रयोग आहे. पितृसावर्ण्य, मातृसावर्ण्य, अनुलोम व प्रतिलोम ह्या प्रथांमुळे कोठेही शुद्ध अनुवंश राहिलेला नाही. आजचा जातिभेद हा जन्मजात नसून पोथीजात आहे. अत्यंत आवश्यक असलेल्या सामाजिक क्रांतिस यशस्वी करण्यासाठी आजच्या जन्मजात जातिभेदाचा उच्छेद करुन सामाजिक विषमता आधी नष्ट केली पाहिजे'. (सावरकर समग्र वाङ्गमय-जात्युच्छेदक निबंध ३)
अशा विचारांमुळे अनेकदा स्वजातियांचा रोष सावरकरानी ओढ़वुन घेतला. कारण जातीनिष्ठा जोपासणाऱ्या समाजातच त्यांचा जन्म झाला होता. अस्पृश्यांना दिल्या जाणा-या वाईट वागणुकीबद्दल अनेकदा त्यांनी सवर्णांची कड़क शब्दात कानउघाडनी केली होती. मराठी संतांच्या भोंगळपणावर आणि निष्क्रियतेवर त्यांनी कडाडून हल्ले केले. अलाउद्दीन खिलजीची देवगिरिवर स्वारी झाली त्यावेळी (तेराव्या शतकातील) ज्ञानेश्वर एखाद्या जादुगाराप्रमाने भिंत चालविण्यामध्ये आनंद मानित होते. स्त्रियांच्यावरील अत्याच्यार आणि हिंदुंचे प्रचंड शिरकाण याकडे त्यांचे लक्ष नव्हते. त्यांच्या ज्ञानेश्वरित याचा उल्लेख येत नाही. याची सावरकराना खंत वाटली. दळण करणा-या जनाबाईला गुप्तपने येऊन मदत करणारा विठ्ठल भक्तांच्या मुसलमानाकडून होणा-या कत्तलीबद्दल अवाक्षर काढित नाही किंवा एखादा चमत्कार त्यासाठी करीत नाही, ही गोष्ट दुर्दैवाची होती असे सावरकरानी लिहिले आहे. हिंदुंची निष्क्रियता आणि देवभोळेपणा, जातीयवृत्ति यावर सावरकरानी आयुष्यभर कोरडे ओढले. आणि जातिविहीन समाजरचना व देशाचे स्वातंत्र्य यासाठी सारे जीवन वाहिले.
सावरकरांची दृष्टी अशी असताना देखील डॉ. आंबेडकरांच्याबरोबर त्यांचा संघर्ष का झाला? दोघानाही जातीयता नष्ट व्हावी असे वाटत होते. या देशाचे नुकसान जातीयवादामुळे झाले हे दोघांनाही मान्य होते. संतांच्या निष्क्रीयतेबद्द्ल दोघांचेही एकमत होते. एवढेच नव्हे तर डॉ. आंबेडकरानी केलेल्या समता-संघर्षाला निर्भयपने आणि मन:पूर्वक पाठिंबा सुरवातीला एकट्या सावरकरानी दिला होता. 'केवळ आपदधर्म म्हणून नव्हे तर न्याय म्हणून आपण आपल्या अस्पृश्य बांधवाना त्यांचे परिपूर्ण मानवी अधिकार परत देणे हे सर्व हिन्दुमात्रांचे कर्तव्य आहे'.(स्वातंत्र्यवीर सावरकर - धनंजय कीर, अनुवादक - खांबेटे, पृष्ठ १९४) असे स्पष्ट विचार सावरकरानी मांडले होते.
वास्तविक परिस्थिति अशी जरी असली तरी सामाजिक सुधारणांच्या बाबतीत सावरकरांच्या काही मर्यादा होत्या. डॉ. आंबेडकर स्वतः दलित म्हणून जन्माला आले होते आणि सर्वसामान्य अशा प्रत्येक अस्पृश्यांच्या नशीबी जे अपमानाचे जीणे होते ते आंबेडकरानी आपल्या आयुष्याच्या पूर्वार्धात अनुभवले होते. सावरकरांच्या पाठीशी या अनुभवांची मदार असणे शक्य नव्हते. तेव्हा या आणि अशा प्रकारच्या इतर अनेक कारणामुळे डॉ. आंबेडकर आणि सावरकर यांच्यामध्ये सामाजिक विचारांच्या संदर्भात अनेकदा संघर्ष उद्भवला.
डॉ. आंबेडकरानी अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशासाठी अनेक सत्याग्रह केले. नाशिक, पुणे आणि अमरावती हे यातील प्रमुख सत्याग्रह होते. स्पृश्य वर्गाबरोबर अस्पृश्यांचा हिंदू म्हणून समान हक्क प्रस्थापित करण्यासाठी हे सत्याग्रह होते. सावरकरानी या सत्याग्रहाना काही वेळा दुरुन पाठिंबा दिला. यापैकी कोणत्याच सत्याग्रहात त्यांनी स्वतः भाग घेतला नाही. त्यांना स्वतः भाग घेणे शक्य नाही म्हणून त्यांनी या सत्याग्रहात भाग घेण्यासाठी आपल्या अनुयायाना पाठविले असे देखील घडले नाही. हे सावरकरानी अपेक्षित केलेल्या हिंदू संघटनेच्या दृष्टीने दुर्दैवी होते. पण यातील खरी गोष्ट अशी की, सवर्ण माणसे आणि अस्पृश्य यांनी एकाच देवळात देवदर्शन घ्यावे ही गोष्ट सावरकराना फारशी रुचनारी नव्हती असे त्यांच्या कृतिवरुन स्पष्ट झाले आहे. कारण रत्नागिरीला केवळ अस्पृश्यांसाठी स्वतन्त्र असे 'पतितपावन' हे मंदिर त्यांनी बांधवुन घेतले. स्पृश्यसाठी असलेल्या सार्वजनिक मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी सावरकरानी कधीही संघर्ष केला नाही आणि 'पतितपावन' हे स्वतंत्र असे मंदिर अस्पृश्यांसाठी उभारण्याची योजना त्यांनी पूर्ण केली. हिंदुत्ववादी सनातनी ब्राम्हण व इतर सवर्ण आणि अस्पृश्य यांच्यामधला संघर्ष टाळण्यासाठी सावरकरानी हे केले असावे. सामाजिक समता प्रस्थापित करावयाची असेल तर संघर्ष अटळ असतो ही साधी गोष्ट सावरकराच्यासारख्या विचारवंताला समजली नव्हती असे म्हणता येईल का? आंबेडकर-सावरकरांच्या संघर्षाची ठिणगी पडली ती इथेच!
बहिष्कृत भारताच्या अग्रलेखात डॉ. आंबेडकरानी या अशी नवी देवळे ख़ास अस्पृश्यांसाठी उभारणा-या लोकांवर कडाडून टिका केली. ते लिहितात 'ज्यांच्या मनात नविन देवळे ख़ास अस्पृश्यांसाठी बांधावी ही कल्पना उद्भवली, त्यांना एक तर अस्पृश्य लोक हिंदूंच्या देवळात जाण्याचा इतका आग्रह का धरतात हे पुरतेपणी लक्षात आले नसावे किंवा नव्या धर्माची नवी देवळे बांधल्याने अस्पृष्यतेचा प्रश्न सोडविला जाईल असे त्यांना वाटत असले पाहिजे. अस्पृश्य लोक देवदर्शनावाचुन तड़फडत आहेत, म्हणून त्यांना तेथे प्रवेश पाहिजे आहे असे नाही, तर त्यांना हिंदू धर्मीय म्हणून तेथे प्रवेश हवा आहे. निराळी देवळे बांधणे हा नड भागविण्याचा मार्ग आहे. तो अस्पृश्यता निवारणाचा मार्ग नव्हे' (बहिकृत भारत, अग्रलेख, ३ जून १९२७)
सावरकरांच्यासारख्या प्रखर वैचारिक माणसाला ही गोष्ट समजू नये ही आश्चर्यकारक बाब होती. सावरकरानी आयुष्यभर अस्पृश्यता निवारणासाठी लोकांच्यामध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला होता. तरी परंतु जन्मजात हिंदुत्व, ब्राम्हण्य आणि त्यायोगे आलेली पारंपारिक प्रतिष्ठा यांची नाळ तोडून टाकण्यात सावरकर यशस्वी होऊ शकले नाहीत, ही गोष्ट इथे सिद्ध होते. अनादी काळापासून समाजात अस्पृश्यांच्या स्वतंत्र वस्त्या आहेत, त्यांच्या स्वतंत्र विहिरी, स्वतंत्र पानवठे आहेत आणि त्यांच्या वस्तीत स्वतंत्र अशी छोटी मोठी देवळेही आहेत. अस्पृश्यानी सवर्णाच्या देवळात प्रवेश मिळविण्यासाठी सत्याग्रह सुरु केला आणि सावरकरानी पुन्हा अस्पृश्यसाठी स्वतंत्र असे 'पतितपावन' हे मंदिर बांधले, ही अत्यंत विचित्र गोष्ट होती. दुर्दैवाने डॉ. आंबेडकरांची विचारधारा शेवटपर्यंत सावरकराना समजू शकली नाही.
आपल्या जातिभेदाविषयक निबंधात सावरकर लिहितात की, 'पोथीजात जातिभेदामुळे उच्च जाती नीच जातिवार जो अत्याचार करतात त्यांचा दोष सा-या जातिंकडे. ते पाप सा-या जातीचे. ते खापर ब्राम्हणांपासून भंग्यापर्यन्त सा-या जातीच्या माथ्यावर फोडले पाहिजे.केवळ ब्रामण क्षत्रियावर नव्हे'. (सावरकर समग्र वाङ्गमय, खंड ३,पृष्ठ १७८)
ब्राम्हण समाजाच्या दांभिकपणावर आणि सनातनी प्रवृत्तिवर डॉ. आंबेडकरानी केलेल्या टिकेमुळे सावरकर अनेक वेळा घायाळ होत असत. जातिभेदाच्या बाबतीत केवळ ब्राम्हणालाच वेठीला धरणे त्यांना अयोग्य वाटते. परंतु वास्तविक या देशाचा सामाजीक इतिहास हे स्पष्टपणे सांगतो की, व्यावहारिक पातळीवर आणि लिखित स्वरुपात जातिभेदाची मुळे मजबूत कोणी करुन ठेवली आहेत, तर ती शहाण्या-सुरत्या आणि लेखन-वाचन करणा-या ब्राम्हण वर्गानेच. या देशातले 'देव ब्राम्हण' काय म्हणतात तेच इतर सा-या समाजाने ऐकले. शिक्षणाची आणि धर्माची मक्तेदारी ही केवळ त्यांचीच होती. धर्मग्रंथ, तत्वज्ञान, वाङ्गमय या सर्व लेखन प्रकारात केवळ वर्णव्यवस्थाच नव्हे, तर विविध जातीची प्रतिष्ठा, स्थान कसे असावे याचे धर्मशास्त्र आणि दंडनीति ब्राम्हणांनीच लिहून ठेवली. मनुस्मुर्ति, विष्णुस्मुर्ती वगैरे स्मुर्तीवाङ्गमय, श्रुतिवागमय यांचे निर्माते बहुतांशी ब्राम्हणच होते. शिवाय या नियमाचे काटेकोर पालन समाजात होते किंवा नाही हे डोळ्यात तेल घालून त्यांनीच सदासर्वकाळ पाहिले आहे. प्राचीन काळात आणि मध्ययुगात क्षत्रिय राजांवर ब्राम्हणांचाच पगडा होता. छत्रपति शिवाजीने तर ब्राम्हणांच्या सांगण्यावरून एकदा नव्हे तर दोनदा राज्याभिषेक करुन घेतला आणि पेशव्यांचे राज्य तर खुद्द ब्राम्हणांचेच आणि या काळात जातीयवाद, अस्पृश्यता तर कळसास पोहोचली होती. सावरकर आणि त्यांच्या समविचारी लोकांना उत्तरे देण्यासाठी डॉ. आंबेडकरानी 'शुद्र पूर्वी कोण होते' हां ग्रंथ लिहिला आहे. आणि त्यामध्ये स्पष्ट केले आहे की, ब्राम्हण वर्गाने या देशातील जातिवादाची मुळे भक्कम पायावर उभी केली. जातिभेदांच्या दोषाचे खापर ब्राम्हणापासून भंग्यापर्यंत सा-या जातीच्या माथ्यावर फोडले पाहिजे, केवळ ब्राम्हणांच्या नव्हे, ही सावरकरांची विचारसरणी मतलबी, मुत्सद्देगिरीची आणि उडवाउडवीची आहे. सावरकर संस्कृतचे गाढ़े व्यासंगी, प्राचीन भारताच्या इतिहासाचे अभ्यासक होते. परंतु जातिभेदाच्या नीतिनियमानी आणि आचार धर्माने भरलेली पोथी-पुस्तके त्यांनी सोयीस्कररित्या दुर्लक्षित केली. परंतु केवळ ब्राम्हणांच्या सोयीसाठी असे दुर्लक्ष सावरकराना करता येणार नाही. सावरकरानी स्वतः अनेक ठिकाणी ब्राम्हणी प्रवृत्तिवर टिका केली आहे. परंतु त्यांच्यावर ते कधीही तुटून पडले नाहीत किंवा त्यांची टीका आग्रही स्वरूपाची कधीही नव्हती. त्यांनी जी टिका केली ती बेताबताने आणि सावधगिरीनेच केलेली आहे. अशा प्रकारच्या धोरणाने सामजिक सुधारणा कधीही होत नसतात. स्वकियाना न दुखावता समाजव्यवस्था बदलू पाहणा-या सावरकराना याच कारणाने सामाजिक क्षेत्रात अपयश आले. आणि शेवटी त्यांची प्रतिमा एक हिंदुत्ववादी म्हणूनच राहिली. सामाजिक संदर्भात ते 'क्रांतिवीर' कधीच होऊ शकले नाहीत आणि ब्राम्हण सोडले, तर सवर्ण हिंदू जातीतिल इतर लोकांनी त्यांचे अनुयायित्व कधीच पत्करले नाही.
देशातील भटशाही किंवा भिक्षुकशाहीवर काही वेळा ते स्वतः टिका करीत असत. परंतु इतरानी किंवा डॉ. आंबेडकरांच्यासारख्या व्यक्तिनी टिका केली, तर ती सावरकराना खपत नसे. वास्तविक असे व्हायला नको होते. भिक्षुकशाहीवर आंबेडकरांनी अनेकदा ताशेरे उडविले, समविचारी म्हणून सावरकरानी त्यांच्या विचारांचे स्वागत केले नाही. एका अस्पृश्य पुढां-याने आपल्या जातीवर टिका केली यामुळे ते बेचैन झाले असावेत. म्हणून ते एके ठिकाणी म्हणतात, 'भटशाही सर्वत्र आहे. भट म्हणताच जरी ब्राम्हण चटकन डोळ्यापुढे येतो तरी गुरव, गुरु, जंगम, फार काय महारात देखील महार भट आहेतच. ही सारी अब्राम्हण असली तरी भटशाहीच् आहे.' (सावरकर समग्र वाङ्गमय-खंड ३रा, पृष्ठ ७४)
वास्तविक भटशाही किंवा भिक्षुकशाही या शब्दाचा सावरकरानी काढलेला अर्थ हा मुद्द्याला बगल देणारा आहे. भट किंवा भटजी किंवा गुरव हे शब्दार्थाने पाहू गेल्यास देवाची रोज पूजा-अर्चा करणारे, देवाची मूर्ति व्यवस्थित ठेवणारे आणि जो काही नैवद्य, दक्षिणा त्यायोगे मिळेल ते घेत राहाणारे लोक. हे लोक आपले काम भले आणि आपण भले अशा मार्गाने राहाणारे असतात. परंतु डॉ. आंबेडकरानी ज्या भटशाहिवर कडाडून आणि चौफेर हल्ले केले ती ही भटशाही नव्हे. ज्या प्रकारच्या भिक्षुकशाहीवर किंवा भटशाहिवर डॉ. आंबेडकरांचा रोख होता त्या भिक्षुकशाहीचे स्वरूप आणि त्यावरील टिकेचा रोख सावरकरानी का लक्षात घेतला नाही आणि त्याला योग्य अशी उत्तरे का दिली नाहीत हे समजण्यास जागा नाही. या देशातील ब्राम्हण भिक्षुकशाही केवळ देवाची पूजा-अर्चा आणि मिळेल ती दक्षिणा घेणे या मर्यादेत राहिली असती,तर आज जे काही सामाजिक गुंते निर्माण झाले आहेत ते झाले नसते. परंतु या भिक्षुकशाहीने समाजातील अज्ञानी बहुजन समाजाला सर्व क्षेत्रात नागवले. ब्राम्हण भट निरनिराळ्या धार्मिक विधींच्या वेळी कशी प्रचंड दक्षिणा उपटतो, कश्या खोट्या-नाट्या गोष्टी सांगतो याचे सविस्तर वर्णन 'ब्राम्हणांचे कसब' या पुस्तकात फुल्यानी केले आहे. प्राचीन काळात आणि मध्ययुगीन भारतात या ब्राम्हण भिक्षुकशाहीचा राजकारणावर प्रचंड वरचष्मा होता. मौर्य काळातील शेवटचा राजा बृहद्रत यांचा खून आणि हिंदुत्ववादी शुंग घराण्याची स्थापना यामध्ये भिक्षुकशाहिचा सिंहाचा वाटा होता. शिवाजीला राज्यभिषेकाच्या वेळी शुद्र म्हणून नाडविण्यामध्ये भिक्षुकशाहिचा मोठा वाटा होता. कारण राज्याभिषेक हा धार्मिक विधि होता. पेशव्यांच्या काळात अनेक ग्रामण्याची प्रकरणे झाली. तेही भट-भिक्षुकांच्या दबावामुळेच. कोल्हापूरच्या वेदांत प्रकारणातही भटशाहिचाच वाटा होता. कोल्हापूरच्या शाहू राजांना शुद्र संबोधुन वेद-मंत्र म्हणण्यास नकार देणारा माणूस भटशाहिचाच प्रतिनिधि होता.
सावरकर म्हणतात त्याप्रमाणे ब्राम्हण भिक्षुकशाही किंवा भटशाही ही गुरव, जंगम किंवा महारभट यांच्या जोड़ीला बसविण्यासारखी नव्हती. बहुजन समाजातील गुरव जंगम किंवा महारभट यानी ब्राम्हण भटांच्याप्रमाने राजकारणात आणि समाजकारणात हैदोस घातला नाही. परंतु ब्राम्हण भटशाहीने या देशाच्या सामाजिक इतिहासावर दूरगामी परिणाम करुन ठेवले आहेत, त्याचे दुष्परिणाम आपण आजतागायत भोगीत आहोत. डॉ. आंबेडकरांचा विरोध धार्मिक विधिना नव्हता. परंतु हे भट राजकारणात आणि समाजकारणात लुडबुड करणारे होते. श्रेष्ठ-कनिष्ठपणा जपणारे होते. महाडचे तळे अस्पृश्यांनी बाटविले म्हणून त्यात पंचगव्य म्हणजे गाईचे शेण, मूत्र इत्यादि टाकणारे हेच भट होते. टिळकानी समुद्रपर्यटन केले म्हणून त्यांना प्रायश्च्चितासाठी शेणाचा गोळा खायला लावणारी हीच भटशाही होय. आणि अलीकडच्या काळातील जगजीवनराम नावाच्या अस्पृश्य मंत्र्याच्या हस्ते पुतळ्याचे उदघाटन झाल्यानंतर 'बाटलेला' पुतळा गंगेच्या पाण्याने धुवून काढणारी हीच भटशाही होय. तेव्हा या भटशाहिचा इतका ज्वलंत असा प्रतिगामीपणाचा इतिहास असताना सुद्धा याकडे सावरकरानी दुर्लक्ष केले ही खरोखरिच दुर्दैवाची बाब होय.
सावरकरानी डॉ. आंबेडकरांच्या धर्मांतरावर टिका केली. आणि त्या संदर्भात त्यांनी बौद्ध धर्मातील वैगुण्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी त्यांनी 'सन्यस्त खड:ग' हे नाटक सुद्धा लिहिले. आपल्या हिंदू बांधवाना बौद्ध तत्वज्ञानापासून सावध राहण्याचा इशारा देत असताना सावरकर म्हणतात, 'खरोखर बौद्ध धर्म हा विश्वव्यापक तत्वाचा धर्म होता. तरी देखील त्याला जगातील लोकांच्या अंत:करणातुन पाशवी मनोवृत्तिचि बीजे किंवा राजकीय आकांक्षा नष्ट करता आल्या नाहीत आणि हिंदुस्थानला बिनधोकपणे तलवारीच्या ऐवजी जपमाळ हाती धरता यावी अशी परिस्थिती निर्माण करता आली नाही'. (स्वातंत्र्यवीर सावरकर- लेखक धनंजय कीर, अनुवादक-खांबेटे, पृष्ठ २८३-२८४)
वास्तविक जी गोष्ट सावरकरांच्या प्राणप्रिय अशा हिंदू धर्माला सुद्धा साधता आली नाही किंवा जगातील अन्य धर्माला साधता आली नाही ती गोष्ट केवळ बौद्ध धर्माकडून सावरकर सावरकर अपेक्षित करतात यामध्ये त्यांचा बौद्ध धर्माबद्दल आकस दिसून येतो. जन्मत:च असणा-या माणसामधील पाशवी प्रवृत्तिवर नियंत्रण करण्याचे उदिष्ट प्रत्येक धर्माचे आहे. प्रत्येक माणसाला 'देव' करणे किंवा देवत्वाप्रत पोहचणे हे कोणत्याही धर्माचे ध्येय नसते. कारण ती गोष्ट सर्वथा अशक्य असते. माणसामधील पशुत्व पूर्णपणे नष्ट करुन त्याला हातात जपमाळ धरता यावी अशी परिस्थिति निर्माण करुन देण्यात जर धर्मशास्त्रे यशस्वी झाली असती तर 'एका गालावर मारले तर दूसरा गाल पुढे करावा' असे सांगणा-या ख्रिश्चन धर्माच्या अनुयायानी अनेक धर्मयुद्धे केली नसती. यूरोपात धर्माच्या नावावर जितके रक्त सांडले गेले तितके अन्य कोणत्याही कारणासाठी सांडले गेले नाही.
पाप, अनाचार आणि आक्रमण यांचा प्रतिकार करण्याची बुद्धीच् बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाने नष्ट होते आणि त्यामुळे क्षात्रतेज नाहीसे होते असे सावरकरानी प्रतिपादन केले आहे. वास्तविक उत्तर वैदिक काळात भारतात ब्राम्हण पुरोहित वर्गाने प्रचंड अनाचार माजविला होता. यज्ञात जिवंतपणे प्राण्याना जाळण्यात येत होते आणि याच पार्श्वभूमिवर बौद्ध तत्वज्ञानात अहिंसेचे अधिष्ठान निर्माण झाले आहे. परंतु बौद्ध तत्वज्ञानातील अहिंसा ही दुबळी आहे असे सावरकर म्हणतात. असे जर असते तर ज्या ज्या राजांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता, त्यांनी सर्वसंगपरित्याग करुन सन्यास घेतला असता व त्यांची राज्येच नष्ट झाली असती. सम्राट अशोकाने आपल्या धर्मांतरानंतर विनाकारण युद्ध करावयाचे नाही हे धोरण आपल्या समोर ठेवले होते, तरी सुद्धा त्याने क्षात्रवृत्ति अव्हेरली नाही. आपले सैन्य कमी केले नाही. उलट त्याचे राज्य प्रचंड विस्तारित झाले होते. बौद्ध राजा हर्षवर्धन तसेच कनिष्क आणि राजा मेनेंडर यानी बौद्ध धर्माच्या स्विकारानंतर अनेक लढाया केल्या आणि आपली राज्ये विस्तारित केली. सा-या आशिया खंडाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. म्हणून तेथील सारे देश दुबळे आणि क्षात्रतेजहीन झाले काय? जपानचा राष्ट्रीय धर्म हा बौद्ध धर्म आहे. परंतु पहिल्या आणि दुस-या जागतिक महायुद्धात अमेरिकेसारख्या प्रचंड देशाला मेटाकुटिस आणले. चीन देशावर बौद्ध धर्माचा प्रचंड प्रभाव, परंतु या देशात अनेक राजकीय क्रांत्या झाल्या. माओच्या क्रांतीमध्ये क्षात्रतेज नव्हते असे कोण म्हणू शकेल? परंतु सावरकरांचे हिंदुत्ववादी आग्रही मन हे मानण्यास तयार नाही. या देशाला ख-या अर्थाने दुबळे आणि तेजोरहित कोणी केले असेल तर या देशातील अंतर्गत हेवेदावे, प्रांतवाद, जातीयवाद आणि जातीयवादी हिंदूतत्वज्ञान यांनी, आपसातील फाटाफुटिमुळे या देशाला अनेक आघाड्यांवर पराभव पत्करावे लागले आहेत. संकुचित वृत्तिचे राजे, संस्थानिक, स्वार्थासाठी फंदफितूरी करणारे लोक, राजकारण आणि समाजकारण नासवणारी येथील भिक्षुकशाही यांनी ख-या अर्थाने या देशाला दुबळे केले व म्हणूनच देश अनेक परकीय आक्रमणाना बळी पडला. पेशवे क्षात्रतेजाचे होते, ते बौद्ध नव्हते मग त्यांचा पराभव पानीपतच्या तिस-या युद्धात का झाला? राजा पोरस, पृथ्वीराज चव्हाण, राणा संग्रामसिंह, राणा प्रतापसिंह, यांचा पराभव अनुक्रमे सिकंदर, महम्मद घोरी, बाबर आणि अकबर यांच्याकडून झाला, हे सारे क्षात्रतेजाचे हिंदू असताना सुद्धा का पराभव झाला? विजयनगरचे हिंदू राज्य मुसलमानानी का घुळीला मिळविले? तेव्हा सावरकरानी बौद्ध धर्मावर टिका करीत असताना या देशाचा इतिहास पुन्हा एकदा चळला असता तर बरे झाले असते. गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश म्हणजे क्षात्रतेजाचा उपदेश आहे, म्हणून सा-या हिंदुना क्षात्रतेजाने तळपणारी माणसे ठरविणे हास्यास्पद आहे ही गोष्ट आपण अनेक आक्रमणाना बळी पडलो यावरून सिद्ध होते.
पंजाब येथील जातपाततोड़क मंडळातर्फ ठरलेल्या व्याख्यानामध्ये आंबेडकरानी सांगितले होते की, या देशाचा इतिहास पराभवाचा इतिहास आहे. सावरकराना हे विधान अतिशय झोंबले, म्हणून त्यांनी 'विजयशील हिंदू राष्ट्र' नावाचा एक लेख लिहून आंबेडकराना उत्तर दिले. आणि पुढे त्यांनी याच विषयावर 'हिन्दुस्थानच्या इतिहासातील सहा सोनेरी पाने' हे पुस्तक लिहिले. हिन्दुस्थानला वैभवशाली आणि विजयाचा इतिहास आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. वास्तविक सावरकरांचे हे लेखन अट्टाहासाचे आणि हिंदुत्ववादी आग्रही भूमिकेचे होते. या देशावर झालेल्या सिकंदरच्या स्वारीपासून ते ब्रिटिश्यांच्या सत्तेपर्यंत शेकडो आक्रमकानी स्वा-या केल्या आणि त्यामुळे १९४७ पर्यन्त या देशातील लोकांना गुलामितच जीवन कंठावे लागले. हा या देशाचा शेकडो वर्षाचा इतिहास आहे. आपल्या देशावर ख़िलजी, गुलाम, तुग़लक़, लोदी आणि मोगल मुसलमानानी आठ-नाऊशे वर्षे निर्धास्तपणे राज्य केले. अर्धा अधिक देश मुसलमान केला. ब्रिटिशानी दिडशे वर्षे राज्य केले. असे असताना सुद्धा भारताला विजयशील हिंदू राष्ट्र म्हणणे हा हटवादीपणाचा भाग आहे.
संदर्भ - डॉ. आंबेडकरांचे विरोधक,
लेखक - डॉ. दिनकर हेरलेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
नवीन टिप्पण्या अनुमत नाहीत.